Add parallel Print Page Options

43 अशा रीतीने यिर्मयाने परमेश्वराकडून, त्यांच्या देवाकडून आलेला संदेश लोकांना सांगितला. परमेश्वराने लोकांना सांगण्यास सांगितलेली प्रत्येक गोष्ट यिर्मयाने लोकांना ऐकविली.

होशायाचा मुलगा अजऱ्या, कारेहचा मुलगा योहानान व इतर काही लोक गर्विष्ठ व दुराग्रही होते. ते सर्व यिर्मयावर रागावले. ते यिर्मयाला म्हणाले, “यिर्मया, तू खोटे बोलत आहेस. ‘तुम्ही मुळीच मिसरला जाऊन राहू नये.’ असे सांगण्यासाठी आमच्या परमेश्वर देवाने तुला आमच्याकडे पाठविले नाही. यिर्मया, नेरीयाचा मुलगा बारुख तुला आमच्याविरुद्ध भडकावीत आहे असे आम्हाला वाटते. आम्हाला खास्द्यांच्या हाती देण्याची त्याची इच्छा आहे त्यांनी आम्हाला मारावे अथवा कैदी म्हणून बाबेलला न्यावे म्हणून तो तुझ्यामार्फत असे सांगत आहे.”

म्हणून योहानान, सेनाधिकारी व इतर सर्व लोक ह्यांनी परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन केले परमेश्वराने त्यांना यहूदात राहण्याची आज्ञा दिली होती. पण परमेश्वराचे ऐकण्याऐवजी, योहानान व सेनाधिकारी वाचलेल्या लोकांना इतर देशांत नेले होते. पण ते यहूदाला परत आले होते. आता, योहानान व सेनाधिकारी यांनी, पुरुष, स्त्रिया व मुले ह्यांना गोळा करुन मिसरला नेले. ह्या लोकांत राजकन्याही होत्या (नबूजरदानने गदल्याला ह्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले होते. बाबेलच्या राजाच्या खास रक्षकांचा नबूजरदान प्रमुख होता) योहानानने संदेष्टा यिर्मया व नेरीयाचा मुलगा बारुख ह्यांनाही बरोबर नेले. त्या लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही, ते सर्व लोक मिसरला गेले, ते तहपन्हेस येथे गेले.

तहपन्हेस येथे यिर्मयाला परमेश्वराचा पुढीलप्रमाणे संदेश मिळाला: “यिर्मया, काही मोठे धोंडे घे. ते तहपन्हेस येथील फारोच्या कचेरीसमोरच्या विटामातीच्या पादचारीमार्गावर पुर. तू यहूदातील लोक पाहत असताना, कर. 10 मग हे सर्व पाहत असलेल्या यहूदी लोकांना सांग ‘सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, मी बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सर, यास येथे पाठवीन, तो माझा सेवक आहे. मी पुरलेल्या ह्या दगडांवर मी त्याचे सिंहासन ठेवीन, तो ह्या दगडावर त्याचे छत्र उभारील. 11 नबुखद्नेस्सर येथे येईल व मिसरवर चढाई करील. ज्यांचे मरण आहे, त्यांना तो ठार मारील. ज्यांना कैद व्हायची आहे, त्यांना तो कैद करील. ज्यांचे मरण तलवारीने आहे, त्यांना तो तलवारीने ठार करील. 12 तो मिसरच्या दैवतांच्या देवळांना आग लावील. तो देऊळे जाळील व मूर्ती काढून नेईल. मेंढपाळ ज्याप्रमाणे त्याच्या कपड्यावरील पिसवा व काटे ओढून काढून आपले कपडे स्वच्छ करतो, त्याप्रमाणे नबुखद्नेस्सर मिसर साफ करील. मग तो निर्धास्तपणे मिसर सोडून जाईल. 13 तो मिसरमधील सूर्य देवतेच्या देवळातील स्मृती शिलांचा नाश करील आणि तेथील दैवतांची देऊळे जाळून टाकील.’”