Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

42 ते गेरुथ किम्हाम येथे रहात असताना योहानान व होशायाचा मुलगा यजन्या यिर्मया संदेष्ट्याकडे गेले. त्यांच्याबरोबर सर्व सेनाधिकारीही होते. सर्वजण राजापासून रंकापर्यंत यिर्मयाकडे गेले. ते सर्वजण यिर्मयाला म्हणाले, “यिर्मया, कृपया आमची विनंती मान्य कर. यहूदाच्या कुळातील वाचलेल्या सर्व लोकांसाठी परमेश्वराकडे तुझ्या परमेश्वराकडे प्रार्थना कर. यिर्मया, आमच्यापैकी फारच थोडे वाचले आहेत, हे तुला दिसतेच आहे. एकेकाळी आम्ही संख्येने जास्त होतो. यिर्मया, आम्ही कोठे जावे व काय करावे हे तुझ्या परमेश्वर देवाने आम्हाला सांगावे म्हणून तू प्रभूचा, तुझ्या देवाचा धावा कर.”

मग संदेष्टा यिर्मया म्हणाला, “तुमची विनंती मी ऐकली तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी प्रभूची, तुमच्या देवाची करुणा भागीन. देवाचे सर्व म्हणणे मी तुम्हाला सांगीन. मी तुमच्यापासून काहीही लपविणार नाही.”

मग ते लोक यिर्मयाला म्हणाले, “जर परमेश्वर देव तुझ्याकडून जसे सांगतो तसे आम्ही वागलो नाही, तर तुझा परमेश्वर देवच आमच्याविरुद्धचा खरा व प्रामाणिक साक्षीदार असेल. आम्हाला त्याचा संदेश आवडला का नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही परमेश्वराची, आमच्या देवाची, आज्ञा पाळू. त्याच्याकडून संदेश आणण्यासाठी आम्ही तुला पाठवीत आहोत. तो सांगेल ते आम्ही ऐकू. मग आमचे कल्याण होईल खरंच, आम्ही परमेश्वराची आमच्या देवाची आज्ञा पाळू.”

दहा दिवसानंतर यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. मग यिर्मयाने कारेहचा मुलगा योहानान, त्याच्याबरोबर असलेले सेनाधिकारी व राजापासून रंकापर्यंत सर्व लोक यांना एकत्र केले. मग तो त्यांना म्हणाला, “परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव काय म्हणतो पाहा तुम्ही मला त्याच्याकडे पाठविले तुम्ही मला केलेली विनंती मी त्याला सांगितली. परमेश्वर असे म्हणतो: 10 ‘जर तुम्ही यहूदात राहिलात, तर मी तुमचा नाश करणार नाही. उलट मी तुम्हाला सामर्थ्यशाली करीन. मी तुम्हाला रुजवीन, उपटून टाकणार नाही. मी असे करण्याचे कारण म्हणजे तुमच्यावर मला आणाव्या लागलेल्या वाईट प्रसंगामुळे मला वाईट वाटते. 11 सध्या तुम्ही बाबेलच्या राजाला भीत आहात. पण त्याला भिऊ नका. बाबेलच्या राजाची अजिबात भीती बाळगू नका.’ हा परमेश्वराचा संदेश आहे. ‘कारण मी तुमच्याबरोबर आहे. मी तुमचे रक्षण करीन. मी तुमची सुटका करीन. त्याचे हात तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. 12 मी तुमच्यावर कृपा करीन आणि बाबेलचा राजाही तुमच्याशी दयाळूपणाने वागेल. तो तुम्हाला तुमच्या देशात परत आणील.’ 13 पण कदाचित् ‘आम्ही यहूदात राहणार नाही.’ असे तुम्ही म्हणाल. तुम्ही असे म्हणाल्यास, तुम्ही परमेश्वराची, तुमच्या देवाची अवज्ञा केल्यासारखे होईल. 14 तुम्ही कदाचित् असेही म्हणाल ‘नाही, आम्ही मिसरमध्ये जाऊन राहू. तेथे युध्द आम्हाला दिसणार नाही किंवा रणशिंगाचा आवाज ऐकू येणार नाही तेथे आमची उपासमार होणार नाही.’ 15 तुम्ही असे म्हणत असाल तर यहूदातील वाचलेल्या लोकांनो, परमेश्वराचा संदेश ऐका. सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांना देव म्हणतो, ‘तुम्ही मिसरमध्ये जाऊन राहण्याचे निश्र्चित केल्यास पुढील गोष्टी घडतील. 16 ज्या तलवारीची तुम्हाला भीती वाटत आहे, ती तुमचा तेथे पराभव करील. ज्या उपासमारीची तुम्ही काळजी करीत आहा, ती तेथे तुम्हाला गाठील. तुम्ही मिसरमध्ये मराल. 17 जो कोणी मिसरमध्ये जाऊन राहण्याचे निश्र्चित करील, तो युद्धात, वा उपासमारीने किंवा भयंकर रोगराईने मरेल. मिसरमध्ये जाणारा एकही जण वाचणार नाही. मी घडवून आणणार असलेल्या भयंकर संकटातून कोणीही वाचणार नाही.’

18 “मग सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव पुढे म्हणतो, ‘मी यरुशलेमवरचा माझा राग व्यक्त करुन दाखविला. यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांना मी शिक्षा केली. त्याचप्रमाणे मिसरमध्ये जाणाऱ्या प्रत्येकावर मी राग प्रकट करीन. दुसऱ्यांना शाप देताना लोक उदाहरण म्हणून तुमचे नाव घेतील. तुम्ही म्हणजे जणू शिवी व्हाल. लोकांना तुमची लाज वाटेल, लोक तुमचा अपमान करतील, तुम्हाला पुन्हा कधीही यहूदा दिसणार नाही.’

19 “यहूदातील वाचलेल्या लोकांनो, ‘मिसरला जाऊ नका.’ असे परमेश्वराने तुम्हाला सांगितले आहे, मी आताच तुम्हाला ताकीद देतो. 20 तुम्ही तुमच्या मृत्यूला कारण होईल, अशी चूक करीत आहात तुम्ही मला परमेश्वराकडे, तुमच्या देवाकडे, पाठविले तुम्ही मला म्हणाला, ‘आमच्यासाठी आपल्या परमेश्वराकडे प्रार्थना कर. परमेश्वराने करायला सांगितलेली प्रत्येक गोष्ट आम्हाला सांग आम्ही परमेश्वराचे ऐकू.’ 21 म्हणून आज मी तुम्हाला परमेश्वराचा संदेश सांगितला आहे. पण तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाची आज्ञा पाळली नाही. परमेश्वराने ज्या गोष्टी तुम्ही कराव्या हे सांगण्यासाठी मला तुमच्याकडे पाठवले होते, त्या गोष्टी तुम्ही केल्या नाहीत. 22 तुम्ही मिसरमध्ये जाऊन राहू इच्छिता. पण मग तुम्ही युद्धात वा उपासमारीने अथवा भयंकर रोगराईने मराल. ह्या गोष्टी तुमच्याबाबत घडतील, ह्याची खात्री बाळगा.”