A A A A A
Bible Book List

यिर्मया 22 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

पापी राजांविरुद्ध निवाडा

22 परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, राजवाड्यात जा आणि यहूदाच्या राजाला हा संदेश आवर्जून सांग: ‘यहुदाच्या राजा, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐक. तू दावीदच्या सिंहासनावर बसून राज्य करतोस म्हणून हे ऐक, राजा, तू आणि तुझ्या अधिकाऱ्यांनी माझे म्हणणे ऐकलेच पाहिजे. यरुशलेमच्या प्रवेशद्वारावरुन जाणाऱ्या सर्व लोकांनी माझा संदेश ऐकलाच पाहिजे. परमेश्वर म्हणतो, फक्त योग्य व न्याय्य गोष्टीच करा. लुटल्या जात असलेल्या लोकांचे लुटारुपासून रक्षण करा. अनाथ मुलाशी अथवा विधवांशी वाईट वागू नका अथवा त्यांना दुखवू नका. निरपराध्यांना मारु नका. तुम्ही माझ्या ह्या आज्ञा पाळल्यात, तर काय होईल? दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे यरुशलेममध्ये, त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर व लोकांबरोबर, रथांतून आणि घोड्यावर स्वार होऊन आत येत राहतील. पण जर तुम्ही आज्ञा पाळल्या नाहीत, तर परमेश्वर काय म्हणतो पाहा, मी, परमेश्वर, वचन देतो की राजवाड्याचा नाश होऊन येथे दगडविटांचा ढिगारा होईल.’”

यहूदाचा राजा राहत असलेल्या राजावाड्याबद्दल परमेश्वराने पुढील उद्गार काढले.

“गिलादच्या जंगलाप्रमाणे वा
    लबानोनच्या पर्वताप्रमाणे राजवाडा उंच आहे.
पण ती त्याला वाळवंटाप्रमाणे करीन.
    निर्जन शहराप्रमाणे तो ओसाड होईल.
मी राजवाड्याचा नाश करण्यास माणसे पाठवीन.
    त्या प्रत्येकाच्या हातात शस्त्र असेल.
त्यांचा उपयोग ते राजवाडा नष्ट करण्यासाठी करतील.
    ही माणसे, गंधसरुपासून बनविलेल्या भक्कम व सुंदर तुळया कापून जाळून टाकतील.

“अनेक राष्ट्रांतील लोक या नगरीजवळून जाताना एकमेकांना विचारतील ‘यरुशलेम ह्या भव्य नगरीच्या बाबतीत परमेश्वराने असे भयंकर कृत्य का केले?’ ह्या प्रश्र्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे असेल: ‘यहूदातील लोक परमेश्वर देवाबरोबर झालेल्या कराराप्रमाणे वागले नाहीत. त्यांनी अन्य दैवतांना पूजले आणि त्यांची सेवा केली, म्हणून देवाने यरुशलेमचा नाश केला.’”

राजा यहोआहाज (शल्लूम) ह्याच्याविरुद्ध निवाडा

10 मेलेल्या राजाकरिता [a] रडू नका.
    त्याच्यासाठी शोक करु नका.
पण हे ठिकाण सोडून जावे लागणाऱ्या
    राजासाठी मात्र मोठ्याने रडा [b]
कारण तो परत येणार नाही.
    यहोआहाज त्याची जन्मभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही.

11 योशीयाचा मुलगा शल्लूम (यहोआहाज) ह्याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो: (राजा योशीया यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शल्लूम यहूदाचा राजा झाला) “यहोआहाज यरुशलेम सोडून दूर गेला आहे. तो पुन्हा यरुशलेममध्ये येणार नाही. 12 मिसरच्या लोकांनी यहोआहाजला पकडून नेले आहे. तो तेथेच मरेल. त्याला परत ही भूमी दिसणार नाही.”

राजा यहोयाकीमविरुद्ध निवाडा

13 राजा यहोयाकीमचे वाईट होईल.
    तो वाईट गोष्टी करीत आहे.
    आपला महाल तो बांधू शकेल.
    लोकांना फसवून त्यावर माड्या चढवू शकेल.
    तो लोकांना काहीही न देता त्यांच्याकडून काम करवून घेतो, त्यांना कामाची मजुरी देत नाही.

14 यहोयाकीम म्हणतो,
    “मी माझ्यासाठी मोठा वाडा बांधीन.
    त्याला खूप मोठे मजले असतील.”
तो मोठ्या खिडक्या असलेले घर बांधतो.
    तो तक्तपोशीसाठी गंधसरु वापरतो आणि तक्तपोशीला लाल रंग देतो.

15 यहोयाकीम, तुझ्या घरात खूप गंधसरु आहे
    म्हणून त्यामुळे काही तू मोठा राजा होत नाहीस.
तुझे वडील योशीया अन्नपाण्यावरच समाधानी होते.
    त्यांनी फक्त योग्य व न्याय्य गोष्टीच केल्या.
    त्यांच्या ह्या कृत्यांमुळे त्यांच्याबाबतीत सर्व सुरळीत झाले.
16 योशीयाने गरीब व गरजू अशा लोकांना मदत केली.
    त्यामुळे त्यांचे सर्व व्यवस्थित झाले.
यहोयाकीम, “देवाला ओळखणे ह्याचा अर्थ काय?”
ह्याचा अर्थ योग्य रीतीने जगणे व न्यायीपणाने वागणे.
    मला ओळखणे ह्याचा अर्थ हाच होय.
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

17 “यहोयाकीम, तुला फक्त तुझा फायदाच दिसतो.
    तू तुझ्यासाठी जास्तीत जास्त मिळविण्याचाच फक्त विचार करतोस.
निरापराध्यांना ठार मारण्यात व
    दुसऱ्याकडून वस्तू चोरण्यातच तुझे मन जडले असते.”

18 योशीयाचा मुलगा राजा यहोयाकीम ह्यास परमेश्वर असे म्हणतो की
    “यहोयाकीमसाठी यहूदातील लोक राहणार नाहीत.
‘हे माझ्या बंधू, मला यहोयाकीमबद्दल वाईट वाटते.’
    असे ते एकमेकांना म्हणणार नाहीत.
यहोयाकीमबद्दल ते शोक करणार नाहीत.
    ‘हे स्वामी! हे राजा!
    मला खूप वाईट वाटते! मला खूप दु:ख होते!’
असे ते म्हणणार नाहीत.
19 एखाद्या गाढवाला पुरावे तसे यरुशलेममधील लोक यहोयाकीमचे दफन करतील.
    ते त्याचा मृत देह फरपटत नेऊन यरुशलेमच्या वेशीबाहेर फेकून देतील.

20 “यहूदा, लबानोनच्या डोंगरावर जाऊन मोठ्याने ओरड.
    बाशानच्या डोंगरात तुझा आवाज ऐकू जाऊ देत.
अबारीमच्या डोंगरात तुझा आवाज ऐकू जाऊ देत.
    अबारीमच्या डोंगरात जाऊन मोठ्याने ओरड.
    का? कारण तुझ्या सर्व ‘प्रियकराचा’ नाश केला जाईल.

21 “यहूदा, तुला सुरक्षित वाटले.
    पण मी तुला इशारा दिला होता.
    पण तू माझे ऐकण्याचे नाकारलेस.
तू तरुण असल्यापासून अशीच वागत आलीस.
तू तरुण असल्यापासून माझ्या
    आज्ञा पाळल्या नाहीस, यहूदा!
22 म्हणून मी दिलेली शिक्षा झंझावाताप्रमाणे येईल.
    ती तुझ्या सर्व मेंढपाळांना लांब उडवून देईल.
तुला वाटले की दुसरी राष्ट्रे तुला मदत करतील.
पण त्या राष्ट्रांचाही पराभव होईल.
    मग खरोखरच तू निराश होशील.
तू केलेल्या वाईट गोष्टींची तुला लाज वाटेल.

23 “राजा, तू तुझ्या उंच डोंगरावरच्या गंधसरुच्या लाकडापासून बनविलेल्या वाड्यात राहतोस!
    म्हणजेच जणू काही जेथून हे लाकूड येते त्या लबानोनमध्येच राहतोस तुला वाटते की तू सुरक्षित आहेस!
कारण तू उंच डोंगरावर मोठ्या घरात राहतोस पण तुला शिक्षा झाल्यावर तू खरोखर विव्हळशील.
    तुला प्रसूतिवेदनांप्रमाणे वेदना होतील.”

राजा यहोयाकीन (कोन्या) याच्याविरुध्द निवाडा

24 “मी निश्र्चितपणे आहे म्हणूनच हे तुझ्याबाबत घडेल” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, “यहोयाकीन, यहोयाकीमच्या मुला, यहूदाच्या राजा, जरी तू माझ्या उजव्या हातातील मुद्रा असलास, तरीही मी तुला उखडून टाकले असते. तुझ्याबाबतीत असेच घडेल. 25 यहोयाकीन, मी तुला बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व खास्दी लोक ह्यांच्या हवाली करीन. तू त्या लोकांना घाबरतोस. ते तुला ठार मारु इच्छितात. 26 तुझी व तुझ्या आईची जन्मभूमी नसलेल्या देशात, मी, तुला व तुझ्या आईला फेकून देईन. तेथेच तुम्ही दोघे मराल. 27 यहोयाकीन, तू ह्या भूमीत परत यायला बघशील. पण तुला येथे परत येऊ दिले जाणार नाही.”

28 कोणीतरी फेकून दिलेल्या, फुटक्या भांड्याप्रमाणे कोन्या (यहोयाकीन) आहे.
    कोणालाही नको असलेल्या भांड्याप्रमाणे तो आहे.
यहोयाकीन व त्याची मुले ह्यांना बाहेर का फेकले जाईल?
    परक्या देशात त्यांना का फेकून देण्यात येईल?
29 यहूदाच्या हे भूमी, भूमी, भूमी,
    परमेश्वराचा संदेश ऐक!
30 परमेश्वर म्हणतो, “यहोयाकीनबद्दल हे लिहून घे.
    तो नि:संतान आहे,
‘तो त्याच्या आयुष्यात यशस्वी होणार नाही.
    त्याचा कोणताही मुलगा दावीदच्या सिंहासनावर बसणार नाही
कोणताही मुलगा यहूदावर राज्य करणार नाही.’”

Footnotes:

  1. यिर्मया 22:10 मेलेला राजा म्हणजे इ.स. पूर्वी 609 मध्ये मिसर देशाविरुद्धच्या युद्धात मारला गेलेला राजा योशीया.
  2. यिर्मया 22:10 हे ठिकाण … राजासाठी रडा हा राजा म्हणजे योशीयाचा मुलगा यहोआहाज. योशीयाच्या मृत्यूनंतर तो राजा झाला. त्याचे दुसरे नाव शल्लूम. मिसरचा राजा नेको याने योशीयाचा पराभव केला. त्याने यहोआहाजला यहूदाच्या गादीवरुन उतरविले व कैदी म्हणून मिसरला नेले.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes