Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

फुटलेले मडके

19 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, जा आणि कुंभाराकडून एक मातीचे मडके विकत घे. खापराच्या प्रवेशद्वाराजवळच्या बेन हिन्नोनच्या दरीकडे जा. काही वडीलधाऱ्यांना नेत्यांना आणि याजकांना तुझ्या बरोबर घे. मी तुला सांगतो त्या गोष्टी तेथे तू त्यांना सांग. तुझ्याबरोबर असलेल्या लोकांना सांग, ‘यहूदाच्या राजांनो आणि यरुशलेमच्या लोकांनो, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका. सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएल लोकांचा देव म्हणतो, मी ह्या ठिकाणी लवकरच काहीतरी भयंकर घडवून आणिन हे ऐकणारा प्रत्येकजण विस्मित होईल व घाबरुन जाईल. यहूदातील लोकांनी मला अनुसरायचे सोडल्यामुळे मी हे घडवून आणीन. त्यांनी ही जागा परक्या दैवतांना दिली. त्यांनी येथे दुसऱ्या दैवतांना होमबली अर्पण केले. पूर्वी हे लोक त्या दैवतांना पूजत नव्हते. त्यांच्या पूर्वजांनीही ह्या दैवतांची पूजा केली नाही. हे दुसऱ्या देशातून आलेले दैवते आहेत. यहूदाच्या राजाने हे ठिकाण अश्राप बआलकांच्या रक्ताने भिजवून टाकले आहे. यहूदाच्या राजाने बआल दैवतासाठी उच्चासने बांधली. लोक ह्या जागांचा उपयोग आपल्या मुलांना अग्नीत जाळण्यासाठी करतात. बआल दैवताला होमबली अर्पण केल्याप्रमाणे ते आपली मुले जाळतात. मी त्यांना असे करायला सांगितलेले नाही. मी तुमच्याजवळ तुमच्या मुलांचे बळी मागितलेले नाहीत. अशा गोष्टी कधीही माझ्या मनातही आल्या नाहीत. हल्ली हिन्नोनच्या दरीला तोफेत म्हणतात. पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की अशी वेळ येईल की, हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, त्या वेळी ह्या दरीला लोक कत्तलीची दरी म्हणून ओळखतील. येथेच मी यहूदातील व यरुशलेममधील रचलेले बेत हाणून पाडीन. त्या लोकांचा शत्रू पाठलाग करतील. मी ह्या ठिकाणी यहूदातील लोकांना तलवारीच्या घावांनी मरु देईन. त्यांची प्रेते गिधाडे व वन्य पशू ह्यांचे भक्ष्य होईल. ह्या नगरीचा मी पूर्णपणे नाश करीन. यरुशलेम जवळून जाताना लोक निराशेने माना हलवतील व सुस्कारे सोडतील अशा तऱ्हेने नगरीचा नाश झालेला पाहून त्यांना धक्का बसेल. नगरीला शत्रूसैन्याचा वेढा पडेल. ते सैन्य नगरीची रसद तोडेल. मग नगरीतील लोकांची उपासमार सुरु होईल. लोकांना एवढी भूक लागेल की ते स्वतःच्याच मुलांना खातील आणि एकमेकांना खायला लागतील.’

10 “यिर्मया, ह्या गोष्टी तू लोकांना सांग आणि लोक पाहत असतानाच हे मडके फोड. 11 त्या वेळी पुढील गोष्टी सांग: ‘सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, कोणीतरी मातीचे मडके फोडावे त्याप्रमाणे मी यहूदा व यरुशलेमला फोडीन; हे मडके परत जोडता येणार नाही. यहूदाच्या बाबतही असेच होईल. तोफेतमध्ये इतक्या मृतांना पुरण्यात येईल की आणखी प्रेतांना पुरण्यास तेथे जागाच राहणार नाही. 12 मी हे ह्या लोकांच्या बाबतीत ह्याच जागेवर घडवून आणीन. मी ह्या नगरीला तोफेतप्रमाणे करीन.’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 13 ‘यरुशलेममधील घरे तोफेतप्रमाणे अपवित्र होतील. राजांचे राजवाडे पण तोफेतप्रमाणेच होतील. का? कारण लोकांनी त्या घराच्या छपरांवर खोट्या देवांची पूजा केली. त्यांनी ताऱ्यांना पूजले आणि त्यांच्याबद्दल आदर दाखविण्यासाठी हवी अर्पण केले. दैवतांना त्यांनी पेयेही अर्पण केली.’”

14 परमेश्वराने यिर्मयाला ज्या जागी प्रवचन देण्यास सांगितले होते ती जागा म्हणजे तोफेत यिर्मयाने सोडली. तो मग परमेश्वराच्या मंदिराकडे गेला आणि मंदिराच्या प्रांगणात उभा राहिला. यिर्मया सर्व लोकांना म्हणाला, 15 “सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव काय म्हणतो पाहा: ‘मी यरुशलेमवर आणि त्याच्या आजूबाजूच्या खेड्यांवर खूप अरिष्टे आणीन. लवकरच मी हे घडवून आणीन. का? कारण लोक फार हट्टी झाले आहेत. ते माझे ऐकत नाहीत आणि माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारतात.’”