A A A A A
Bible Book List

याकोब 1 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

देवाचा आणि प्रभु येशू ख्रिस्ताचा सेवक, याकोब याजकडून,

देवाच्या लोकांचे “बारा वंश” जे जगभर विखुरलेले आहेत त्यांना सलाम!

विश्वास आणि शहाणपण

माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतील तेव्हा तुम्ही स्वतःला अत्यंत सुदैवी समजा, कारण तुम्हांला माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे धीर निर्माण होतो. आणि त्या धीराला परिपूर्ण काम करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे व्हावे.

म्हणून जर तुमच्यातील कोणी शहाणपणात उणा असेल तर त्याने ते देवाकडे मागावे. जो सर्व लोकांना उदार हस्ते देतो, आणि जो दोष शोधीत नाही, असा देव ते त्याला देईल. पण त्याने विश्वासाने मागितले पाहिजे व संशय धरू नये. कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे इकडेतिकडे हेलकावणाऱ्या समुद्रातील लाटेसारखा आहे. 7-8 अशा मनुष्यांने असा विचार करू नये की, प्रभूपासून त्याला काही प्राप्त होईल. कारण तो द्विधा आहे आणि तो जे करतो त्या सर्वांत तो अस्थिर आहे.

खरी संपत्ती

गरिबीत असलेल्या बंधूने, देवाने त्याला आध्यात्मिक संपत्ती दिलेली आहे याविषयी अभिमान बाळगावा. 10 आणि श्रीमंत बंधूने देवाने त्याला दीनतेत आणले याचा अभिमान बाळगावा. कारण तो एखाद्या रानफुलासारखा नाहीसा होतो. 11 सूर्य त्याच्या प्रखर उष्णतेसह वर येतो आणि झुडपे वाळून जातात. मोहोर गळून पडतो व त्याचा लोभसवाणा पेहराव नाहीसा होतो. त्याचप्रमाणे श्रीमंत मनुष्यदेखील त्याच्या उद्योगात असताना नाहीसा होईल.

परिक्षा देवापासून येत नाही

12 धन्य तो पुरूष जो त्याच्या परीक्षेत टिकतो, कारण जेव्हा ती परीक्षा तो उत्तीर्ण होईल, तेव्हा त्याला विजेत्याचा मुगूट मिळेल. तो मुगुट देवाने जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना देण्याचे अभिवचन दिले आहे. 13 कोणीही, जेव्हा तो परीक्षेत पडतो, तेव्हा असे म्हणू नये की, “हे संकट देवाने माझ्यावर आणले.” कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही. 14 तर प्रत्येक जण त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार मोहात पडतो. तो आकृष्ट केला जातो व मोहात पडतो. 15 मनात वासना निर्माण झाली की, तिच्या पोटी पापाचा जन्म होतो व पापाची जेव्हा पूर्ण वाढ होते तेव्हा ते मरणाला जन्म देते.

16 माझ्या प्रिय बंधूंनो, स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका. 17 प्रत्येक उत्तम व परिपूर्ण देणगी वरून येते. स्वर्गीय प्रकाश ज्याने निर्माण केला त्या पित्यापासून ती येते. आणि ज्याच्यावर तारांगणाच्या हालचालीचा काहीही परिणाम होत नाही, अशा पित्यापासून ती देणगी येते. 18 सत्याच्या संदेशाद्वारे आपण त्याची मुले व्हावे ही त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली निवड केली आहे. पित्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींमध्ये आपण “प्रथम फळ” व्हावे यासाठी त्याने असे केले.

ऐकणे आणि आज्ञा पाळणे

19 माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा: प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागावण्यात मंद असावा. 20 कारण मनुष्याच्या रागामुळे देव ज्या नीतीमत्त्वाची अपेक्षा करतो ते निर्माण होत नाही. 21 म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगऴ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या. आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्विकारा.

22 देवाची शिकवण काय सांगते त्याप्रमाणे नेहमी करा व फक्त ऐकूच नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता. 23 जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले नैसर्गिक तोंड पाहणाऱ्यासारखा आहे. 24 तो मनुष्या स्वतःकडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो. 25 पण देवाचे परिपूर्ण व लोकांना स्वतंत्र बनविणारे जे नियम आहेत, त्यांच्याकडे जो बारकाईने पाहतो, सतत अभ्यास करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल.

देवाच्या उपासनेचा मार्ग

26 जर एखादा मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो आणि तरी स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवीत नाही, तर तो स्वतःला फसवितो. त्या व्यक्तीची धार्मिकता निरर्थक आहे. 27 अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो, व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष ठरते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes