A A A A A
Bible Book List

यहोशवा 22 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

तीन वंशाचे लोक स्वस्थानी परततात

22 यहोशवाने मग रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक यांना एकत्र बोलवले. त्यांना तो म्हणाला, “परमेश्वराचा सेवक मोशे याने तुम्हाला जे जे सांगितले त्याप्रमाणे तुम्ही वागलात. माझ्याही सर्व आज्ञा तुम्ही पाळल्यात. आजपर्यंत तुम्ही आपल्या इस्राएल बांधवांनाही पाठिंबा दिलात. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काटेकोरपणे पाळल्या आहेत. सर्व कठीण प्रसंगातून शांतता देण्याचे तुमच्या परमेश्वर देवाने इस्राएल लोकांना वचन दिले होते. आणि परमेश्वराने आपला शब्द खरा केला आहे. तेव्हा आता तुम्ही आपल्या घरी जाऊ शकता. यार्देनच्या पूर्वेकडील प्रदेश परमेश्वराचा सेवक मोशेने तुम्हाला दिला आहे. तेथे तुम्ही आता जाऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मोशेचे नियम पाळत चला. परमेश्वर देवावर प्रेम करा आणि त्याच्या आज्ञा पाळा. परमेश्वराच्या मार्गाने जा आणि मनोभावे त्याची सेवा करा.”

एवढे बोलून यहोशवाने त्यांना निरोप दिला आणि ते निघाले. ते आपल्या घरी परतले बाशानची भूमी मोशेने मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिली होती. उरलेल्या दुसऱ्या अर्ध्या वंशाला यार्देनच्या पश्चिमेकडील काही जमीन यहोशवाने दिली. त्यांना आशीर्वाद देऊन यहोशवाने निरोप दिला. तो म्हणाला, “तुम्हाला सर्व ऐश्वर्य मिळाले आहे. भरपूर गुरेढोरे आहेत सोने, रुपे, मौल्यवान दागदागिने तुमच्याकडे आहेत. सुंदर, तलम वस्त्रे आहेत. शत्रूच्या लुटीतील अनेक वस्तू तुम्ही घेतल्या आहेत. त्यांची आपापसात वाटणी करुन आता आपापल्या ठिकाणी परत जा.”

तेव्हा रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या वंशातील लोक यांनी इस्राएल लोकांचा निरोप घेऊन प्रस्थान केले. ते कनान देशातील शिलो येथे होते. तेथून निघून ते गिलाद कडे गेले. मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जो प्रांत त्यांना द्यायला सांगितला होता तेथे म्हणजेच आपल्या वतनाकडे ते परत गेले.

10 रऊबेन, गाद आणि मनश्शे या वंशातील लोक गालिलोथ ठिकाणी आले. कनान देशातील यार्देन नदीच्या जवळ हे आहे. या ठिकाणी त्यांनी एक मोठी वेदी बांधली. 11 या तीन वंशांच्या लोकांनी ही वेदी बांधल्याची बातमी शिलो येथे असलेल्या इतर इस्राएल लोकांनी ऐकली. कनान देशाच्या सीमेजवळ गलिलोथ येथे ही वेदी बांधल्याचे त्यांच्या कानावर आले. इस्राएलांच्या भागात यार्देन नदी जवळ हे ठिकाण होते. 12 या बातमीने क्रुध्द होऊन सर्व इस्राएल लोकांनी एक होऊन या तीन वंशांच्या लोकांवर चढाई करण्याचे ठरवले.

13 इस्राएल लोकांनी रऊबेन, गाद व मनश्शे यांच्या वंशजांशी बोलणी करण्यास काही जणांना पाठवले. एलाजार याजकाचा मुलगा फिनहास हा त्यांचा प्रमुख होता. 14 त्याखेरीज, शिलो येथे असलेल्या इस्राएलांच्या प्रत्येक कुळातून एक अशा दहा जणांनाही पाठवले. हे दहाजण आपापल्या कुळाचे प्रमुख होते.

15 अशी अकरा माणसे गिलाद येथे गेली. रऊबेन, गाद आणि मनश्शेच्या वंशातील लोक यांच्याशी बोलणी करताना ते म्हणाले, 16 “सर्व इस्राएल लोकांची विचारणा आहे की. परमेश्वराविरुद्ध असलेली ही गोष्ट तुम्ही का केलीत? तुम्ही हे बंड का केलेत? परमेश्वराच्या शिकवणी विरूध्द ही वेदी तुम्ही का बांधलीत? 17 पौराला काय झाले ते आठवते ना? त्या पापाचे फळ आपण अजून भोगत आहोत. त्या भंयकर पापाची शिक्षा म्हणू आपल्यावर आजारपण ओढवले. त्यातून आपण अजूनही पूर्णतः बरे झालो नाही. 18 आणि तरी तुम्ही तेच करतात! हे परमेश्वराविरुद्ध बंड आहे. तुम्ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देणार आहात काय? तुम्ही हे थांबवले नाहीत तर सर्व इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप होईल.

19 “परमेश्वराच्या उपासनेला तुमची भूमी तुम्हाला चांगली वाटत नसेल तर आमच्या भागात या. आमच्या भागात परमेश्वराचे निवासस्थान आहे आमच्या वाट्याची थोडी जमीन घेऊन हवे तर राहू शकता. पण परमेश्वराच्या शिकवणुकी विरुद्ध वागू नका. आता आणखी वेदी बांधू नका. परमेश्वर देवाच्या निवासमंडपात आमच्या येथे एक वेदी आहेच.

20 “जेरहाचा मुलगा आखान आठवतो का? त्याने, नष्ट करुन टाकायच्या वस्तू विषयीची आज्ञा पाळायचे नाकारले. देवाची आज्ञा त्याने एकट्याने मोडली पण शिक्षा मात्र सर्व इस्राएल लोकांना झाली. आखान, त्याच्या पापामुळे मेला पण आणखीही बरीच माणसे मरण पावली.”

21 तेव्हा रऊबेन गाद आणि मनश्शेच्या वंशातील लोक यांनी या अकरा जणांना उत्तर दिले. ते म्हणाले, 22 “परमेश्वर हाच आमचा देव आहे. [a] परमेश्वर हाच आमचा समर्थ परमेश्वर आहे. आणि आम्ही हे का केले हे देवाला माहीत आहे. तुम्हीही समजून घ्या. आम्ही केले ते उचितच आहे हे तुमच्या लक्षात येईल. आम्ही चुकलो अशी तुमची खात्री पटली तर आम्हाला जिवंत ठेवू नका. 23 आम्ही देवाचा नियम मोडला असेल तर परमेश्वरानेच आम्हाला शिक्षा करावी. 24 आम्ही ही वेदी होमार्पण धान्यार्पण किंवा शांति-अर्पण करण्यासाठी बांधली असे तुम्हाला वाटते का? नाही, आम्ही ती त्यासाठी बांधली नाही. मग का बांधली बरे? उद्या कदाचित् तुमचे वंशज आम्हाला आपल्यापैकीच एक म्हणून ओळखणार नाहीत अशी आम्हाला भीती वाटली. तुम्ही कोण इस्राएल लोकांच्या परमेश्वर देवाची आराधना करणारे? असे कदाचित् ते विचारतील. 25 देवाने आम्हाला यार्देनच्या पलीकडच्या तीरावरची जमीन दिली आहे. नदीमुळे आपण वेगळे पडलो आहोत. उद्या तुमची मुले मोठी होऊन तुमच्या प्रदेशावर सत्ता गाजवू लागली की, आम्हीही तुमच्यापैकीच आहोत हे ती विसरतील मग ते म्हणतील, ‘हे रऊबेन आणि गाद इस्राएलांपैकी नव्हेत’ आणि तुमचे वंशज आमच्या वंशजांना परमेश्वराची आराधना करायला प्रतिबंध करतील.

26 “म्हणून ही वेदी बांधायचे ठरवले. पण यज्ञार्पणे किंवा होमार्पणे करण्याच्या हेतूने ती बांधली नाही. 27 तुमचा आणि आमचा परमेश्वर एकच आहे हे दाखवणे हा वेदी बांधण्यामागचा उद्देश होता. तुम्हा आम्हाला व पुढच्या पिढ्यांना ही वेदी साक्ष राहील की हा आपला परमेश्वर आहे. आम्ही परमेश्वराला यज्ञार्पणे, अन्नार्पणे, शांतिअर्पणे करु. तुमच्याप्रमाणेच आम्हीही इस्राएल लोकांपैकी आहोत हे तुमच्या वंशजांना कळावे अशी आमची इच्छा आहे. 28 आम्ही इस्राएल नाही असे उद्या तुमची मुले म्हणाली तर आमची मुले म्हणतील, ‘ही पाहा आमच्या वाडवडिलांनी बांधलेली वेदी. ही वेदी तंतोतंत परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानामधील वेदीसारखीच आहे. ही आम्ही यज्ञासाठी वापरत नाही. आम्ही ही इस्राएलचाच एक भाग आहोत याची ही साक्ष आहे.’

29 “परमेश्वराविरुद्ध बंड करावे असे खरोखरच आम्हाला वाटत नाही. त्याच्या मार्गाने जायचे आम्ही थांबवणार नाही. परमेश्वराच्या निवासस्थानासमोरची वेदी हीच खरी हे आम्हाला माहीत आहे. तीच परमेश्वर देवाची आहे.”

30 रऊबेनी, गादी आणि मनश्शेचे लोक काय म्हणाले ते फिनहास याजक व त्याच्या बरोबर आलेले इतर प्रमुख यांनी ऐकले. त्यांना ते पटले. या लोकांचे म्हणणे खरे आहे असे त्यांचे समाधान झाले. 31 तेव्हा फिनहास याजक त्यांना म्हणाला, “परमेश्वराची आपल्याला साथ आहे हे आता आपण जाणतो. तुम्ही त्याच्याविरुध्द बंड केले नाही हे आम्हाला कळले. आता परमेश्वर इस्राएल लोकांना शिक्षा करणार नाही, म्हणून आम्हाला आनंद वाटतो.”

32 मग फिनहास आणि सर्व प्रमुख आपल्या घरी परतले. रऊबेनी आणि गादी यांना गिलाद मध्ये सोडून कनान येथे आले. त्यांनी इस्राएल लोकांना सर्व हकीकत सांगितली. 33 इस्राएल लोकांचेही त्याने समाधान झाले. आनंद वाटून त्यांनी परमेश्वराचे आभार मानले. रऊबेनी, गादी आणि मनश्शे या लोकांविरुद्ध चढाई न करण्याचे त्यांनी ठरवले. ते लोक जेथे राहात होते तो प्रदेश नष्ट न करण्याचे त्यानी ठरवले.

34 रऊबेनी आणि गादी यांनी या वेदीला नाव दिले, ते असे, “परमेश्वर हाच देव आहे असा आमचा विश्वास आहे ह्याची ही साक्ष.”

Footnotes:

  1. यहोशवा 22:22 परमेश्वर … आमचा देव आहे किंवा “याव्हे खरा देव आहे! याव्हे खरा देव आहे!” शब्दश; “एल-एलोहिम याव्हे! एल-एलोहिम याव्हे!”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes