A A A A A
Bible Book List

यहोशवा 21 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

याजक आणि लेवी यांच्यासाठी नगरे

21 मग लेवी घराण्याचे प्रमुख हे एलाजार याजक नूनाचा पुत्र यहोशवा आणि इस्राएल लोकांच्या वेगवेगळ्या वंशाचे प्रमुख यांच्याशी बोलायला आले. ही भेट कनान देशातील शिलो येथे झाली. लेवी प्रमुख त्यांना म्हणाले, “आम्हाला राहण्यासाठी नगरे आणि आमच्या गुराढोरांना चरण्यासाठी कुरणे द्यावीत अशी आज्ञा परमेश्वराने मोशेला केली आहे.” तेव्हा इस्राएल लोकांनी ही परमेश्वराची आज्ञा पाळली. त्यांनी पुढील नगरे आणि गायराने लेवींना दिली.

कहाथी हे लेवी वंशातील एक कूळ, त्याच्यातील अहरोन याजकाच्या वंशजांना यहूदा शिमोन आणि बन्यामीन यांच्या वाटणीच्या प्रदेशातील तेरा नगरे मिळाली.

एफ्राईम, दान आणि मनश्शाचा अर्धा वंश यांच्या मालकीच्या प्रदेशातील दहा नगरे उरलेल्या कहाथी कुळांना मिळाली.

इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशानमधील मनश्शेचा अर्धा वंश यांच्या भूभागातून गेर्षोनच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.

मरारीच्या वंशजांना रऊबेन गाद आणि जबुलून यांच्या वाटच्या प्रांतांतून बारा नगरे मिळाली.

परमेश्वराने मोशेला दिलेली आज्ञा इस्राएल लोकांनी पाळली व लेवी लोकांना पुढील नगरे व त्याभोवतालची शिवारे दिली.

यहूदा आणि शिमोनच्या वाटच्या प्रदेशातील नगरे दिली त्यांची नावे पुढे दिली आहेत. 10 चिठ्ठ्या टाकल्या त्यात पहिली चिठ्ठी कहाथी कुळातील लेवींची निघाल्यामूळे ही नगरे त्यांची. 11 किर्याथ-आर्बा त्यांना मिळाले (म्हणजेच हेब्रोन. अनाकचा पिता आर्बा याचे नाव या नगराला मिळाले होते.) त्याच्या आसपासची थोडी जमीनही गायरान म्हणून त्यांना मिळाली. 12 पण किर्याथ-आर्बांच्या भोवतालची शेते व खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याची होती. 13 तेव्हा त्यांनी हेब्रोन नगर अहरोनच्या वंशजांना दिले. (हेब्रोन हे आश्रयाचे नगर होते.) त्याखेरीज लिब्ना 14 यतीर, एष्टमोवा, 15 होलोन, दबीर, 16 अईन, युट्टा, आणि बेथ-शेमेश ही नगरे व गुरांसाठी शिवारे दिली. अशाप्रकारे ही नउ नगरे त्या दोन वंशांना दिली.

17 बन्यामीनच्या प्रदेशातील नगरे अहरोनच्या वंशजांना मिळाली. ती म्हणजे, गिबोन, गेबा, 18 अनाथोथ, अलमोन ही चार नगरे व भोवतालची गायराने. 19 अहरोनच्या वंशातील याजकांना त्यांनी ही तेरा नगरे व शिवारे दिली.

20 एफ्राईमच्या वाटच्या जमिनीतील नगरे कहाथी वंशातील उर्वरित लोकांना मिळाली. ती अशी: 21 एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम हे आश्रयाचे नगर, गेजेर, 22 किबसाईम व बेथ-होरोन ही चार नगरे व भोवतालची गायराने.

23 दानच्या हिश्श्यातून एल एतके. गिब्बथोन, 24 अयालोन, गथ-रिम्मोन ही चार गावे व गुरांसाठी शिवार दिले.

25 मनश्शाच्या अर्ध्या वंशाच्या मालकीच्या प्रदेशातून तानख व गथ-रिम्मोन ही दोन नगरे व शिवारे दिली.

26 कहाथी वंशाला अशी एकंदर दहा नगरे व आसपासची गायराने मिळाली.

27 लेवी वंशातील गेर्षोन कुळाला ही काही नगरे मिळाली. ती अशी:

मनश्शाच्या अर्ध्या वंशातील लोकांनी त्यांना बाशान मधील गोलान दिले (गोलान हे आश्रयस्थान होते.) बैश्तरा देखील दिले. म्हणजेच एकंदर दोन नगरे व शिवार दिली.

28 इस्साखारच्या वंशजांनी किश्शोन, दाबरथ 29 यर्मूथ, एलगन्नीम चार नगरे भोवतालची शिवारे दिली.

30 आशेरच्या वंशाजांनी मिशाल, अब्दोन, 31 हेलाकाथ, रहोब, ही चार नगरे गुरांसाठी भोवतालचे थोडे गायरान दिले.

32 नफतालीच्या कुळातील लोकांनी गालील मधले केदेश दिले. (केदेश हे आश्रयाचे नगर) नफतालींनी हम्मोथ दोर आणि कर्तान ही ही दिली. म्हणजे एकंदर तीन नगरे व गुरांना चरण्यासाठी भोवतालची शिवारे दिली.

33 गेर्षोन वंशजांना अशी एकंदर तेरा नगरे व गायराने मिळाली.

34 मरारी हे लेवी वंशातील एक कूळ, त्यांना मिळालेली नगरे अशी; जबुलूनच्या वंशजांनी यकनाम, कर्ता 35 दिम्ना नहलाल ही चार नगरे व शिवार दिली. 36 रऊबेनींनी बेसेर, याहस 37 कदेमोथ, मेफाथ ही चार नगरे व गायराने दिली. 38 गाद वंशातील लोकांनी गिलादमधील रामोथ (हे आश्रयाचे नगर) दिले. शिवाय महनाईम, 39 हेशबोन, याजेर अशी एकंदर चार नगरे व शिवारे दिली.

40 अशाप्रकारे मरारी या लेवी वंशातील शेवटच्या कुळाला बारा नगरे मिळाली.

41 म्हणजे लेवी वंशाजांना सर्व मिळून अठ्ठेचाळीस नगरे व गुरांना चारायला शिवारे मिळाली. इस्राएल लोकांमधील इतर सर्व वंशांच्या लोकांच्या मालकीतील ही शहरे आणि जमीन होती. 42 प्रत्येक गावाला गायरान होते. सर्वच नगराच्या बाबतीत हे खरे होते.

43 अशाप्रकारे इस्राएल लोकांना दिलेला शब्द परमेश्वराने खरा केला. कबूल केल्याप्रमाणे सर्व जमीन त्याने लोकांना दिली. लोकांनी ती ताब्यात घेतली व ते तेथे राहू लागले. 44 तसेच परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांना शब्द दिल्याप्रमाणे, सगळीकडे सर्वत्र शांतता नांदू लागली. यांना कोणताही शत्रू नामोहरण करु शकला नाही. उलट परमेश्वराच्या करणीने शत्रूच इस्राएल लोकांच्या हाती आला. 45 अशाप्रकारे परमेश्वराने दिलेले प्रत्येक वचन पुरे झाले. काहीही पुरे व्हावयाचे शिल्लक राहिले नाही. प्रत्येक शब्द प्रत्यक्षात आला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes