A A A A A
Bible Book List

यहेज्केल 34 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

इस्राएल मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे आहे

34 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, “मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या मेंढपाळांविषयी (नेत्यांविषयी) बोल. माझ्यासाठी त्यांच्याबरोबर बोल. त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो. ‘तुम्ही इस्राएलचे मेंढपाळ स्वतःच फक्त चरत आहात. त्यामुळे तुमचे वाईट होईल. तुम्ही कळपाला खायला का घालत नाही? तुम्ही धष्टपुष्ट मेंढ्या खाता, त्यांच्या लोकरीचा उपयोग स्वतःला कपडे करण्याकरिता करता. तुम्ही धष्टपुष्ट मेंढ्या मारता. पण कळपाला खायला घालीत नाही. तुम्ही दुर्बळांना सबळ केले नाही. तुम्ही आजारी मेंढ्यांची काळजी घेतली नाही. जखमींना मलमपट्टी केली नाही. काही मेंढ्या भरकटल्या पण तुम्ही जाऊन त्यांना परत आणले नाही. तुम्ही त्यांना शोधायला गेला नाहीत. नाही! तुम्ही फारच दुष्ट आणि निष्ठुर होता. आणि मेंढ्यांनाही तुम्ही दुष्टपणाने व निष्ठुरतेनेच वागविण्याचा प्रयत्न केला.

“‘आणि कोणीच मेंढपाळ नसल्याने मेंढ्या आता विखुरल्या आहेत. त्या हिंस्र पशूंचे भक्ष्य झाल्या आहेत, कारण त्या पसरल्या गेल्या. माझा कळप सर्व डोंगरांतून व सर्व टेकड्यांवरुन भटकला, जगाच्या पाठीवरील प्रत्येक ठिकाणी विखुरला आणि त्याचा शोध घेण्यास कोणीही नव्हते.’”

म्हणून, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो. हिंस्र पशूंनी माझ्या मेंढ्या पकडल्या. खरंच! माझ्या मेंढ्या वन्य प्राण्यांचे भक्ष्य झाल्या. का? कारण त्यांना खरा मेंढपाळ नव्हता. माझ्या मेंढपाळांनी माझ्या कळपावर लक्ष ठेवले नाही. नाही! त्यांनी फक्त मेंढ्या मारल्या व स्वतःची पोटे भरली. त्यांनी माझ्या कळपाला खाऊ घातले नाही.”

तेव्हा, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. 10 परमेश्वर म्हणतो, “मी त्या मेंढपाळांच्याविरुद्ध आहे. मी माझ्या मेंढ्या त्यांच्याकडून परत मागीन. मी त्यांच्यावर तोंडसुख घेईन. ह्यापुढे ते माझे मेंढपाळ असणार नाही. मग ते स्वतःच्या तुंबड्या भरु शकणार नाहीत. आणि त्यांच्यापासून मी माझ्या कळपाला वाचवीन. मग माझ्या मेंढ्या त्यांचे भक्ष्य होणार नाहीत.”

11 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी स्वतःच त्यांचा मेंढपाळ होईन. मी माझ्या मेंढ्यांचा शोध घेईन. मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. 12 मेंढपाळ जर मेंढ्यांबरोबर असेल, तर त्या भरकटू लागताच, तो त्यांचा शोध घेईल, त्याचप्रमाणे, मी करीन. मी माझ्या मेंढ्यांना वाचवीन. त्या अंधाऱ्या व ढगाळ दिवशी, त्या जेथे जेथे विखुरल्या असतील, तेथून तेथून मी त्यांना परत आणीन. 13 त्या त्या राष्ट्रांतून मी त्यांना परत आणीन. निरनिराळ्या देशांतून मी त्यांना एकत्र आणीन. मी त्यांना त्यांच्या भूमीत परत आणीन. मी त्यांना इस्राएलच्या डोंगरांवर, झऱ्यांकाठी आणि लोक राहत असलेल्या सर्व ठिकाणी चरु देईन. 14 मी त्यांना चांगल्या कुरणांत नेईन. इस्राएलच्या डोंगरावरील उंच ठिकाणी त्या जातील. तेथे चांगल्या डोंगरावरील उत्तम हिरवळीवर त्या चरतील. 15 हो! मी माझ्या कळपाला खायला घालीन. आणि त्यांना विश्रांतीच्या जागी घेऊन जाईन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

16 “हरवलेल्या मेंढ्यांचा मी शोध घेईन. भटकलेल्यांना मी परत आणीन. जखमी झालेल्या मेंढ्यांना मी मलमपट्टी करीन. दुर्बलांना मी सबळ करीन. मी त्या लठ्ठ व मत्त मेंढपाळांचा मात्र नाश करीन. त्यांना योग्य अशीच शिक्षा मी देईन.”

17 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, तू माझ्या कळपा “मी माझ्या कळपातील मेंढ्या-मेंढ्यात, एडका व बोकड ह्यांच्यात न्यायनिवाडा करीन. 18 सुपीक जमिनीवर वाढणारे गवत तुम्ही खाऊ शकता. मग इतर मेंढ्यांचे गवत तुम्ही का चिरडून टाकता? तुम्ही भरपूर शुद्ध पाणी पिऊ शकता. मग तुम्ही इतरांचे प्यायचे पाणी का ढवळता? 19 तुमच्या पावलांनी, चिरडलेले गवत आणि ढवळलेले पाणी, माझ्या कळपाने प्यायलेच पाहिजे.”

20 म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, त्यांना म्हणतो, “मी स्वतः लठ्ठ मेंढी आणि बारीक मेंढी ह्यांच्यात निवाडा करीन. 21 तुम्ही बाजूने व खांद्याने ढकलता. तुमच्या शिंगांनी तुम्ही दुर्बळ मेंढ्यांना खाली पाडता. तुम्ही, त्यांना ढकलून दूर घालवून देता. 22 म्हणून, मी माझ्या कळपाला वाचवीन. यापुढे हिंस्र पशू त्यांना पकडणार नाहीत. मी मेंढ्या-मेंढ्यात न्यायनिवाडा करीन. 23 मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन. माझा सेवक दावीद, ह्याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन. तो त्यांना खायला घालील व त्यांच्या मेंढपाळ होईल. 24 मग मी, परमेश्वर व प्रभू, त्यांच्या देव होईन. माझा सेवक, दावीद राजा म्हणून त्यांच्यात राहील हे माझे परमेश्वराचे शब्द आहेत.

25 “मी माझ्या मेंढ्यांबरोबर एक शांततेचा करार करीन. मी अपायकारक प्राण्यांना या भूमीतून दूर करीन. मग मेंढ्या वाळवंटातही सुरक्षित राहू शकतील आणि रानात सुरक्षितपणे झोपू शकतील. 26 माझ्या टेकडी (यरुशलेम) भोवतालच्या जागा आणि मेंढ्या ह्यांना मी आशीर्वाद देईन. योग्य वेळी मी पाऊस पाडीन. ते आशीर्वादांच्या वर्षावात न्हाऊन निघतील. 27 शेतांत वाढणारी झाडे फळतील. पृथ्वीवर सुगीचा मोसम येईल. त्यामुळे मेंढ्या त्यांच्या बळापासून मी त्यांना वाचवीन. मग त्यांना कळेल की मीच परमेश्वर आहे. 28 यापुढे इतर राष्ट्रांकडून ते प्राण्याप्रमाणे पकडले जाणार नाहीत. हिंस्र पशू त्यांना खाणार नाहीत. ते सुखरुप राहतील. त्यांना कोणीही घाबरिणार नाही. 29 जी सुंदर आणि प्रसिद्ध होईल, अशी जमीन मी त्यांना देईन. मग त्या देशात त्यांची उपासमार होणार नाही. यापुढे इतर राष्ट्रांकडून त्यांना अपमान सहन करावा लागणार नाही. 30 मग त्यांना समजून येईल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे, व मी त्यांच्याबरोबर आहे, इस्राएलच्या लोकांना ती माझी माणसे आहेत हेही कळेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

31 “तुम्ही माझी मेंढरे आहात, माझ्या कुरणातील मेंढरे आहात. तुम्ही फक्त माणसे आहात आणि मी तुमचा देव आहे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes