Add parallel Print Page Options

फारो: सिंह का मगर?

32 परागंदा काळाच्या बाराव्या वर्षाच्या बाराव्या महिन्याच्या (मार्चच्या) पहिल्या दिवशी, मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला, “मानवपुत्रा, मिसरचा राजा फारो ह्याच्यासाठी हे शोकगीत गा. त्याला सांग:

“तू स्वतःला राष्ट्रांमध्ये उन्मत्तपणे चालणारा बलिष्ठ तरुण सिंह समजलास.
    पण खरे म्हणजे तू तळ्यांतील मगरी प्रमाणे आहेस.
तू प्रवाहातून रेटा देऊन मार्ग काढतोस
    तुझ्या पायाने पाणी गढूळ करतोस,
    मिसरच्या नद्या घुसळून काढतोस.”

परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:

“मी पुष्कळ लोकांना एकत्र जमविले आहे.
    आता मी माझे जाळे तुझ्यावर फेकीन.
    मग ते लोक तुला आत ओढून घेतील.
मग मी तुला कोरड्या जमिनीवर टाकीन.
    मी तुला शेतांत टाकीन.
सर्व पक्षी येऊन तुला खाऊ देत.
    सर्व ठिकाणचे सगळे हिंस्र प्राणी येऊन तुला खाऊन तृप्त होऊ देत.
मी तुझ्या मृत शरीराचे तुकडे पर्वतावर फेकीन
    आणि त्या तुकड्यांनी दऱ्या भरुन टाकीन.
मी तुझे रक्त डोंगारांवर ओतीन.
    ते जमिनीत मुरेल.
    नद्याही रक्ताने भरतील.
मी तुला अदृश्य करीन.
    मी आकाश झाकीन व तारे निस्तेज करीन.
    मी सूर्याला ढगाने झाकीन.
    आणि चंद्रप्रकाश पडणार नाही.
तुझ्यावर पडणारा आकाशातील सर्व प्रकाश मी निस्तेज करीन.
    मी तुझ्या संपूर्ण देशाला अंधारात ठेवीन.”
माझा प्रभु परमेश्वर ह्या गोष्टी म्हणाला आहे.

“मी तुझा नाश करण्यासाठी शत्रूला आणले हे ऐकून पुष्कळ लोक अस्वस्थ व दु:खी होतील. तुला अनोळखी असलेली राष्ट्रेसुध्दा अस्वस्थ होतील. 10 तुझ्याकडे पाहून खूप लोकांना धक्क बसेल. मी माझी तलवार परजताच, त्या लोकांचे राजे अत्यंत भयभीत होतील. तुझ्या पतनाच्या दिवशी, क्षणाक्षणाला, ते थरथर कापतील. प्रत्येकाला आपल्या जीवाचे भय वाटेल.”

11 का? कारण परमेश्वर, माझा प्रभू. पुढील गोष्टी सांगतो: “बाबेलच्या राजाची तलवार तुमच्यावर उपसली जाईल. 12 लढाईत, त्या सैनिकांकरवी मी तुमचे लोक मारीन. ते सर्वांत भयंकर अशा राष्ट्रांतून आलेले सैनिक आहेत. मिसरच्या अभिमानास्पद गोष्टी ते लुटतील. मिसरच्या लोकांचा नाश केला जाईल. 13 मिसरच्या नद्यांच्या काठी असणाऱ्या सर्व प्राण्यांचा नाश होईल. ह्यापुढे लोकांच्या पायामुळे पाणी गढूळ होणार नाही. तसेच गुरांच्या खुरांमुळेही ते खराब होणार नाही. 14 मी मिसरचे पाणी शांत करीन. नद्यांचा प्रवाह मंद करीन. त्यांना तेलाप्रमाणे निसरड्या करीन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला, 15 “मी मिसरची भूमी ओसाड करीन. त्यातील सर्व काही नष्ट होईल मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना मी शिक्षा करीन. मगच त्यांना ‘मी देव व प्रभू’ असल्याचे समजेल.

16 “लोक मिसरसाठी शोकगीत गातील. इतर राष्ट्रांतील मुलीही (गावे) त्याच्यासाठी शोकगीत गातील. त्या मिसर व त्याचे लोक यांच्यासाठी ते गीत गातील.” देव, माझा प्रभू, असे म्हणाला.

मिसरचा नाश

17 परागंदा काळातील बाराव्या वर्षांच्या त्याच महिन्याच्या पंधराव्या दिवशी मला परमेश्वराचा संदेश मिळाला तो म्हणाला, 18 “मानवपुत्रा, मिसरच्या लोकांसाठी शोक कर. मिसरला आणि बलाढ्य राष्ट्रांच्या मुलींना थडग्याकडे ने. त्यांना जमिनीखाली ने. म्हणजे ते खोल विवरात गेलेल्या लोकांच्यामध्ये राहतील.

19 “मिसर, तू कोणापेक्षाही चांगला नाहीस. मृत्युलोकांत जा. त्या परदेशीयांबरोबर जाऊन पड.

20 “लढाईत मारल्या गेलेल्या लोकांत मिसर जाऊन पडेल. शत्रूने त्याला व त्याच्या सर्व लोकांना ओढून नेले आहे.

21 “बलवान व शक्तिशाली लोक युद्धात मारले गेले. ते परदेशी मृत्युलोकात गेले. तेथून ते मिसरशी व त्याच्या साहाय्यकर्तांशी बोलतील ते सुद्धा युद्धात मारले गेले.

22-23 “अश्शूर व त्याचे सैन्य मृत्युलोकात आहे. खोल विवरात अतिशय खोलात त्यांची थडगी आहेत. ते सर्व अश्शूरी सैनिक लढाईत मारले गेले. अश्शुरच्या थडग्याभोवती अश्शूरचे सैन्य आहे. ते जिवंत असताना त्यांनी लोकांना घाबरविले. पण आता ते सर्व शांत झाले आहेत-ते सर्व युद्धात मारले गेले.

24 “एलाम तेथेच आहे व तिच्या थडग्याभोवती त्याचे सर्व सैन्य आहे. ते सर्व लढाईत मारले गेले. ते परदेशी जमिनीखाली खोल गेले. ते जिवंत असताना, लोक त्यांना घाबरत. पण जमिनीखालच्या खोल विवरात त्यांनी आपल्याबरोबर आपली अप्रतिष्ठाही नेली. 25 त्यांनी एलाम व युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांसाठी शय्या तयार केली. एलामच्या थडग्याभोवती त्याचे सैनिक आहेत. ते सर्व परदेशी युद्धात मारले गेले. ते जिवंत होते, तेव्हा त्यांनी लोकांना घाबरविले. पण जमिनीखाली खोल विवरात त्यांनी आपल्याबरोबर आपली अप्रतिष्ठाही नेली. त्यांना मारल्या गेलेल्या इतर लोकांबरोबर ठेवले गेले.

26 “मेशेख, तुबाल आणि त्यांचे सैन्यही तेथेच आहेत. त्यांची थडगी सभोवती आहेत. ते सर्व परदेशी लढाईत मारले गेले. त्यांनी जिवंतपणी लोकांना घाबरविले. 27 पण ते आता पूर्वीच मृत्यू पावलेल्या बलवान लोकांबरोबर पडून आहेत. त्यांना त्यांच्या शस्त्रांबरोबर पुरले. त्यांच्या तलवारी त्यांच्या डोक्याखाली ठेवल्या आहेत. पण त्यांचे पाप त्यांच्या हाडांवर आहे. का? कारण जिवंत असताना त्यांनी लोकांना घाबरविले.

28 “मिसर, तुझासुद्धा नाश होईल. तू सुद्धा त्या परदेशी लोकांच्यात जाऊन पडशील. युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांच्यामध्ये तू जाशील.

29 “तेथे अदोमसुद्धा आहे, तिच्याबरोबर तिचे राजे व नेते आहेत. ते सुद्धा शक्तिशाली होते. पण आता ते युद्धात मारल्या गेलेल्या इतर लोकांबरोबर पडतात. ते परदेशी लोकांवर पडून आहेत. ते खोल विवरात गेलेल्या लोकांबरोबर तेथे आहेत.

30 “उतरेकडचे सर्वच्या सर्व राज्याकर्ते तेथे आहेत. सीदोनचे सर्व सैनिकही तेथे आहेत. त्यांच्या बळाला लोक घाबरले. पण ते आता शरमले आहेत. ते परदेशी, युद्धात मारल्या गेलेल्या लोकांच्यामध्ये पडून आहेत. त्यांनी त्या खोल विवरात जाताना स्वतःची अप्रातिष्ठाही स्वतःबरोबर नेली.

31 “फारोला मृत्युलोकात गेलेले लोक दिसतील. तो आणि त्याच्या बरोबरचे इतर लोक मग समाधान पावतील. हो! फारो आणि त्याचे सर्व सैन्य युध्दात मारले जाईल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,

32 “फारो जिवंत असताना, मी लोकांना त्याची भीती दाखविली. पण आता तो परदेशी लोकांबरोबर पडेल. युद्धात मारल्या इतर सैनिकांबरोबर फारो व त्याचे सर्व सैन्य पडेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

Bible Gateway Sponsors