A A A A A
Bible Book List

यहेज्केल 3 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू जे पाहतोस, ते खा. तो पट खा. मग त्या गोष्टी इस्राएलच्या लोकांना जाऊन सांग.”

मग मी तोंड उघडले व त्याने तो पट माझ्या तोंडात घातला. नंतर देव म्हणाला, “मानवपुत्रा, मी तुला हा पट देत आहे. तो गीळ. त्याने तुझे पोट भरु दे.”

मग मी तो पट सेवन केला. तो मला मधासारखा गोड लागला.

त्या नंतर देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलच्या लोकांकडे जा. त्यांना माझे शब्द ऐकव. तुला ज्यांचे बोलणे समजू शकणार नाही, अशा परदेशीयांकडे मी तुला पाठवीत नाही. तुला दुसरी भाषा शिकायची गरज नाही. मी तुला इस्राएल लोकांकडे पाठवीत आहे. तुला समजत नसणाऱ्या भाषा बोलणाऱ्या निरनिराळ्या देशांत मी तुला पाठवीत नाही. जर तू त्या लोकांशी जाऊन बोलला असतास तर त्यांनी तुझे ऐकले असते. पण तुला त्या कठीण भाषा शिकण्याची जरुरी नाही. नाही! मी तुला झ्स्राएल लोकांकडेच पाठवीत आहे. त्यांची मनेच फक्त कठोर आहेत! ते हट्टी आहेत. ते तुझे ऐकायला नकार देतील. त्यांना माझे म्हणणे ऐकण्याची इच्छा नाही. पण मी तुला त्यांच्याप्रमाणेच कठोर बनवीन. तुला त्यांच्याप्रमाणे निष्ठुर बनवीन. हिरा गारगोटीच्या दगडापेक्षा कठीण असतो. त्याचप्रमाणे तू त्यांच्यापेक्षा कठोर होशील. तू जास्त हट्टी होशील, म्हणजे तू त्या लोकांना घाबरणार नाहीस. माझ्या विरुध्द नेहमी जाणाऱ्या लोकांना तू घाबरणार नाहिस.”

10 मग देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, माझा प्रत्येक शब्द तू ऐकला पाहिजेस, आणि ते शब्द लक्षात ठेवले पाहिजेस. 11 मग परागंदा झालेल्या तुझ्या सर्व लोकांना जाऊन सांग, ‘परमेश्वराने, आपल्या प्रभूने पुढील गोष्टी सांगितल्या:’ ते तुझे ऐकणार नाहीत. पाप करायचे थांबवणार नाहीत, तरी तू ह्या गोष्टी सांगच.”

12 मग वाऱ्याने मला उचलले. नंतर मला माझ्यामागून आवाज आला. तो आवाज गडगडाटाप्रमाणे प्रचंड होता. त्यांतून “परमेश्वराच्या वैभवाचा धन्यावाद असो” असे शब्द आले. 13 मग त्या प्राण्यांचे पंख फडफडले. पंख एकमेकांना भिडताना प्रचंड आवाज झाला. त्यांच्या पुढील चाकांचा खडखडाट झाला. तो आवाज गडगडाटाप्रमाणे होता. 14 वाऱ्याने मला उचलून दूर नेले. मी ती जागा सोडली. माझा आत्मा [a] फार खिन्न आणि दु:खी झाला होता. पण देवाची शक्ती मोठ्या प्रमाणात मला प्राप्त झाली होती. 15 नंतर मी, तेल अबीब येथे सक्तीने राहत असलेल्या इस्राएली लोकांकडे गेलो. ते खबार कालव्याजवळ राहात होते. तेथे राहणाऱ्या लोकांना मी अभिवादन केले. मी त्यांच्याबरोबर सात दिवस भीतिग्रस्त होऊन गप्प बसून राहिलो.

इस्राएलचा पहारेकरी

16 सात दिवसांनी मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो असा: 17 “मानवपुत्रा, मी तुला इस्राएलचा पहारेकरी करीत आहे. इस्राएलबाबत घडणाऱ्या वाईट गोष्टी मी तुला सांगीन. मग तू इस्राएलला त्या गोष्टींबद्दल इशारा दे. 18 जर मी म्हणालो ‘हा वाईट माणूस मरेल,’ तर तू त्या माणसाला इशारा दिलाच पाहिजेस. तू त्याला त्याचा जीवनक्रम बदलायला आणि दुष्कृत्ये करण्याचे टाळायला सांगितले पाहिजेस. जर तू त्याला इशारा केला नाहीस, तर तो मरेल. त्याने पाप केले, म्हणून तो मरेल. पण तरीसुद्धा त्याच्या मृत्यूसाठी मी तुला जबाबदार धरीन. का? कारण तू त्याच्याकडे जाऊन त्याला वाचविले नाहीस.

19 “कदाचित् असेही होईल की तू एखाद्याला सावध करशील, त्याला त्याचा मार्ग बदलायला सांगशील, दुष्कृत्ये न करण्याचे आवाहन करशील. पण त्याने तुझे ऐकले नाही, तर तो मरेल. तो त्याच्या पापामुळे मृत्यू पावेल, पण तू त्याला सावध केले होतेस, म्हणून तुझा स्वतःचा जीव वाचेल.

20 “किंवा एखादा सज्जन चांगले वागणे सोडून देईल. मी त्याच्या मार्गात असे काही ठेवीन की तो पडेल (पाप करील). तो दुष्कृत्ये करायला लागेल, म्हणून मरेल. तो पाप करीत होता व तू त्याला सावध केले नाहीस म्हणून तो मरेल. अशा वेळी त्याच्या मृत्यूबद्दल मी तुला जबाबदार धरीन. त्याने केलेली चांगली कृत्ये लोक विसरुन जातील.

21 “पण तू सज्जन माणसाला सावध केलेस आणि पाप न करण्याबद्दल सांगितलेस आणि त्याने पाप करण्याचे सोडून दिले, तर तो मरणार नाही. का? कारण तू सांगितले आणि त्याने ऐकले. अशा प्रकारे तू तुझा स्वतःचाच जीव वाचविला.”

22 मग तेथेच परमेश्वराचा वरदहस्त मला लाभला. तो मला म्हणाला, “उठ आणि दरीकडे जा. तेथे मी तुझ्याशी बोलेन.”

23 मग मी उठलो आणि दरीकडे गेलो. खबार कालव्याजवळ पाहिली होती तशीच परमेश्वराची प्रभा तेथे होती. तेव्हा मी नतमस्तक झालो. 24 पण वारा आला आणि त्याने मला वर उचलले. तो मला म्हणाला, “घरी जा, आणि स्वतःला घरात कोंडून घे. 25 मानवपुत्रा, लोक दोऱ्या घेऊन येतील आणि तुला बांधतील. ते तुला बाहेर लोकांमध्ये जाऊ देणार नाहीत. 26 मी तुझी जीभ टाळ्याला चिकटवीन. मग तुला बोलता येणार नाही. मग त्या लोकांना ते चुकीचे वागत आहेत हे सांगायला कोणीही नसेल. का? कारण ते नेहमीच माझ्याविरुद्व जातात. 27 मी तुझ्याशी बोलेन आणि नंतर तुला बोलण्याची परवानगी देईन. पण तू त्यांना ‘परमेश्वर, आपला प्रभू पुढील गोष्टी सांगतो’ असे सांगितलेच पाहिजे. एखाद्याने ऐकण्याचे ठरविले तरी वाहवा, न ऐकण्याचे ठरविले तरी वाहवा! ते लोक नेहमीच माझ्याविरुद्व वागतात.

Footnotes:

  1. यहेज्केल 3:14 आत्मा म्हणजेच “वारा.”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes