A A A A A
Bible Book List

यहेज्केल 12 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

12 मग मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला, “मानवपुत्रा, तू बंडखोर लोकांच्यात राहतोस. ते नेहमीच माझ्याविरुध्द जातात. मी त्यांच्याकरिता केलेल्या गोष्टी पाहण्यासाठी त्यांना डोळे आहेत. पण ते त्यांचा उपयोग करीत नाहीत. (ते ह्या गोष्टी पाहातच नाहीत.) मी करायला सागितलेल्या गोष्टी ऐकण्यासाठी त्यांना कान आहेत, पण ते माझ्या आज्ञा ऐकत नाहीत. का? कारण ते बंडखोर आहेत. म्हणून, मानवपुत्रा, सामान बांध, देशी जात असल्याचे नाटक कर. लोक तुला पाहत असताना हे कर. कदाचित ते तुला पाहतील पण ते फार बंडखोर आहेत.

“तुझे सामान भरदिवसा बाहेर काढ म्हणजे लोकांना ते दिसू शकेल. संध्याकाळी, तू दूरच्या देशात कैदी म्हणून जात असल्याचे नाटक कर. लोक पाहात असतानाच भिंतीला एक भोक पाड आणि त्यातून पलिकडे जा. रात्री सामान पाठीवर टाकून चालू लाग. तू कोठे जात आहेस हे दिसू नये म्हणून तोंड झाकून घे. लोक पाहू शकतील अशाच तऱ्हेने तू या गोष्टी केल्या पाहिजेस. का? कारण मी तुझा उपयोग करुन (तुझ्याकडून) इस्राएलच्या लोकांपुढे एक उदाहरण घालून देत आहे.”

म्हणून मी (यहेज्केलने) देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व केले. दिवसा मी माझे सामान बांधले व मी दूर देशी जात असल्याचे दाखविले. त्या दिवसाच्या सांध्याकाळी, मी हाताने भिंतीत भोक पाडले व रात्री सामान खांद्यावर टाकून गाव सोडले. सर्व लोक मला पाहत आहेत असे पाहूनच मी हे सर्व केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी, परमेश्वर माझ्याशी बोलला. तो म्हणाला, “मानवपुत्रा, तू काय करीत आहेस असे त्या इस्राएलच्या बंडखोर लोकांनी तुला विचारले का? 10 परमेश्वराने, त्यांच्या प्रभूने, त्यांना पुढील गोष्टी सांगितल्या आहेत असे त्यांना सांग. हा दु:खद संदेश यरुशलेमच्या नेत्यांबद्दल आणि इस्राएलमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांबद्दल आहे. 11 त्यांना सांग, ‘मी (यहेज्केल) तुम्हा लोकांसाठी एक उदाहरण आहे. मी केलेल्या सर्व गोष्टी खरे, म्हणजे तुमच्याबाबतीत घडणार आहेत.’ तुम्हाला खरोखरच कैदी म्हणून दूरच्या देशांत जाणे भाग पडेल. 12 मग तुमचा नेता भिंतीला खिंडार पाडेल व रात्रीच्या वेळी गुपचूपपणे पसार होईल. लोकांनी ओळखू नये म्हणून तो आपला चेहरा झाकून घेईल. जाताना तो काहीही बघू शकणार नाही. 13 तो पळून जायचा प्रयत्न करील पण मी (देव) त्याला पकडीन. तो माझ्या सापळ्यात अडकला जाईल. मी त्याला बाबेलमध्ये, खास्द्यांच्या देशात आणीन. पण त्याला कोठे नेले जात आहे, हे तो पाहू शकणार नाही. शत्रू त्याचे डोळे काढून त्याला आंधळा करतील. मग तो तेथेच मरेल. 14 मी राजाच्या माणसांना इस्राएलच्या भोवतालच्या परक्या देशांमधून राहण्यास भाग पाडीन, व त्याचे सैन्य वाऱ्यावर सोडीन. शत्रूचे सैनिक त्यांचा पाठलाग करतील. 15 मग त्या लोकांना मीच देव आहे हे कळेल. मीच त्यांना राष्ट्रां-राष्ट्रांतून विखुरले हे त्यांना कळून चुकेल. मी त्यांना सक्तीने दुसऱ्या देशांत जायला लावले, हे त्यांना समजेल.

16 “पण मी काही लोकांना जिवंत राहू देईन. ते रोगराईने वा उपासमारीने अथवा तलवारीने मरणार नाहीत. त्यांनी माझ्याविरुद्ध ज्या भयंकर गोष्टी केल्या, त्या इतरांना ह्या लोकांनी सांगाव्या, म्हणून मी त्यांना जिवंत ठेवीन. मग मीच परमेश्वर आहे हे समजेल.”

17 मग परमेश्वराचा संदेश मला मिळाला. तो म्हणाला, 18 “मानवपुत्रा, तू फार घाबरल्याचे नाटक कर. जेवताना तू थरथर कापले पाहिजेस. तू काळजीत असल्याचे दाखव. पाणी पितानाही भ्याल्याचे सोंग कर. 19 सामान्य माणसांना तू हे सांगितले पाहिजेस ‘यरुशलेममध्ये व इस्राएलच्या इतर भागांत राहणाऱ्या लोकांना परमेश्वर, आमचा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो. खाता-पिताना तुम्ही काळजीने व भयाने पछाडले जाल. का? कारण तुमच्या देशातील सर्व गोष्टींचा नाश होईल. तेथे राहणाऱ्या सर्वांशी शत्रू अत्यंत क्रूरपणे वागेल. 20 आता तुमच्या गावांत खूप लोक राहात आहेत. पण त्या सर्व गावांचा नाश होईल. तुमच्या संपूर्ण देशाचाच नाश होईल. मगच मीच परमेश्वर आहे हे तुमच्या लक्षात येईल.’”

21 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला, 22 “मानवपुत्रा, इस्राएल देशाबद्दल लोक पुढील गीत का म्हणतात?

‘संकटे लवकर येणार नाहीत.
    दृष्टान्त खरे होणार नाहीत.’

23 “परमेश्वर, त्यांचा प्रभू, हे गीत बंद करील असे त्यांना सांग. ह्या पुढे ते इस्राएलबद्दल असे काही म्हणणार नाहीत. त्याऐवजी ते पुढील गीत म्हणतील.

‘लवकरच संकटे येतील
    दृष्टान्त खरे ठरतील.’

24 “ह्या पुढे इस्राएलला खोटे दृष्टान्त दिसणार नाहीत, हे मात्र अगदी खरे आहे. खोटेनाटे सांगणारे जादूगार तेथे असणार नाहीत. 25 का? कारण मी परमेश्वर आहे. माझ्या मनाप्रमाणे मी सांगतो व तेच घडेल. मी त्यास विलंब होऊ देणार नाही. संकटे वेगाने येत आहेत. तुमच्याच आयुष्यात ती येतील. बंडखोरांनो, मी जे म्हणतो, ते घडवून आणतो.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

26 नंतर मला पुन्हा परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, 27 “मानवपुत्रा, तुला झालेला दृष्टान्त प्रत्यक्षात यायला खूप अवधी आहे असे इस्राएलच्या लोकांना वाटते. येथून पुढे अनेक वर्षांनी घडणाऱ्या गोष्टींबद्दल तू बोलत आहेस, असा त्यांचा समज आहे. 28 म्हणून तू त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेस. ‘परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, मी या पुढे अजिबात उशीर करणार नाही. मी जे घडेल असे म्हणतो, ते घडेलच.’” देव, माझा प्रभू, असे म्हणाला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes