Add parallel Print Page Options

देव येत आहे

60 “यरूशलेम, माझ्या ज्योती, ऊठ.
    तुझा प्रकाश (देव) येत आहे.
    परमेश्वराची प्रभा तुझ्यावर फाकेल.
आता अंधाराने जग व्यापले आहे
    आणि लोक अंधारात आहेत.
पण परमेश्वराचा प्रकाश तुझ्यावर पडेल,
    त्याची प्रभा तुझ्यावर पसरेल.
राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे (देवाकडे) येतील.
    राजे तुझ्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील.
तुझ्या सभोवती पाहा! बघ,
    लोक तुझ्या भोवती जमून तुझ्याकडे येत आहेत.
ती तुझी दूरवरून येणारी मुले आहेत
    आणि त्याच्याबरोबर, तुझ्या मुलीही येत आहेत.

“हे भविष्यात घडून येईल.
    त्यावेळी तू तुझ्या लोकांना पाहशील.
तुझा चेहरा मग आनंदाने उजळेल.
    प्रथम तू घाबरशील.
पण नंतर तुझ्या भावना अनावर होतील.
    समुद्रापलीकडील सर्व संपत्ती तुझ्यापुढे ठेवली जाईल.
    राष्ट्रांचे सर्व धन तुला मिळेल.
मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप
    तुझी भूमी ओलांडतील.
शेबातून उंटांची रीघ लागेल.
    ते सोने आणि सुंगधी द्रव्ये आणतील.
    लोक परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.
लोक केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुला देतील.
    नबायोथचे मेंढे ते तुझ्याकडे आणतील.
तू ती जनावरे माझ्या वेदीवर अर्पण करशील
    आणि मी त्यांचा स्वीकार करीन.
मी माझे सुंदर मंदिर आणखी सुंदर करीन.
लोकांकडे पाहा! आकाशात वेगाने ढग सरकावेत
    त्याप्रमाणे ते घाईने तुझ्याकडे येत आहेत
    ते जणू घरट्याकडे उडत येणारे पारवे आहेत.
दूरचे देश माझी वाट पाहत आहेत मोठी मालवाहू जहाजे प्रवासास सज्ज आहेत.
    दूरच्या देशातून तुझ्या मुलांना आणण्याकरिता ती जहाजे तयार आहेत.
परमेश्वराचा तुझ्या देवाचा,
    इस्राएलच्या पवित्र देवाचा, सन्मान करण्यासाठी
ती मुले आपल्याबरोबर चांदी-सोने आणतील.
    परमेश्वर तुझ्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी करतो.
10 दुसऱ्या देशातील मुले तुझी तटबंदी पुन्हा बांधतील,
    राजे तुझी सेवा करतील

“मी जेव्हा रागावलो तेव्हा मी तुला फटकावले.
    पण आता तुझ्यावर दया करण्याची माझी इच्छा आहे.
    म्हणून मी तुझे दु:ख हलके करीन.
11 तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील.
    दिवस असो वा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत.
राष्ट्रे आणि राजे,
    त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणतील.
12 जे राष्ट्र अथवा जे राज्य तुझी सेवा करीत नाही
    त्याचा नाश होईल.
13 लबानोनमधील मौल्यवान चिजा तुला दिल्या जातील.
    लोक सुरू देवदारू आणि भद्रदारू तुला आणून देतील.
माझे पवित्र स्थान सुंदर करण्यासाठी
    या झाडांच्या लाकडाचा उपयोग केला जाईल.
ही जागा म्हणजे जणू काही माझ्या सिंहासनासमोरील चौरंग आहे
    आणि मी त्याला फार महत्व देईन.
14 पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तुला दुखावले,
    तेच आता तुझ्यापुढे नमतील. पूर्वी ज्यांनी
तुझा तिरस्कार केला तेच आता
    तुझ्या पायाशी वाकतील.
तेच लोक तुला ‘परमेश्वराची नगरी,’
    ‘इस्राएलच्या पवित्र देवाचे सियोन म्हणून संबोधतील.’”

नवे इस्राएल शांतीची भूमी

15 “तुला पुन्हा कधीही एकटे सोडले जाणार नाही.
    पुन्हा कधीही तुझा तिरस्कार केला जाणार नाही.
तुला पुन्हा कधीही ओस पाडले जाणार नाही.
    मी तुला चिरकालासाठी मोठी करीन.
    तू चिरंतन सुखी होशील.
16 राष्ट्रे तुला पाहिजे ती प्रत्येक गोष्ट देतील.
    हे म्हणजे मुलाने आईचे स्तनपान करावे तसे असेल.
पण तू राजांच्या संपत्तीचे ‘पान’ करशील.
    मग तुला समजेल की तो मी आहे,
जो तुला वाचवितो, तो परमेश्वर मी आहे.
    तुला कळेल की याकोबाचा महान देव तुझे रक्षण करतो.

17 “आता तुझ्याजवळ तांबे आहे,
    मी तुला सोने आणीन.
आता तुझ्याजवळ लोखंड आहे,
    मी तुला चांदी आणून देईन.
मी तुझ्याजवळील लाकडाचे तांबे करीन.
    तुझ्या खडकांचे लोखंड करीन.
मी तुझ्या शिक्षेचे रूपांतर शांतीत करीन.
    आता लोक तुला दुखावतात,
पण तेच तुझ्यासाठी
    चांगल्या गोष्टी करतील.
18 तुझ्या देशात पुन्हा कधीही हिंसेची वार्ता ऐकू येणार नाही.
    लोक तुझ्या देशावर पुन्हा कधीही चढाई करणार नाहीत.
आणि तुला लुटणार नाहीत.
    तू तुझ्या वेशीला ‘तारण’ आणि तुझ्या दरवाजांना ‘स्तुती’ अशी नावे देशील.

19 “या पुढे तुला रात्रंदिवस चंद्र सूर्य नव्हे
    तर परमेश्वर प्रकाश देईल.
परमेश्वर तुझा चिरकालाचा प्रकाश होईल.
    तुझा देवच तुझे वैभव असेल.
20 तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही
    आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही.
कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल.
    तुझा दु:खाचा काळ संपेल.

21 “तुझे सर्व लोक सज्जन असतील.
    त्यांना कायमची भूमी मिळेल.
मी त्या लोकांना निर्माण केले.
    मी माझ्या स्वतःच्या हातांनी
    तयार केलेली ती सुंदर रोपटी आहेत.
22 सर्वात लहान कुटुंबाचा मोठा समूह होईल.
    सर्वांत लहान कुटुंबाचे मोठे बलवान राष्ट्र होईल.
योग्य वेळी मी, परमेश्वर, त्वरेने येईन.
    मी ह्या गोष्टी घडवून आणीन.”