Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

देव खरी तृप्ती देणारे “अन्न” देतो

55 “तहानलेल्यांनो, या आणि पाणी प्या.
    तुमच्याजवळ पैसा नसला तरी काळजी करू नका.
या आणि पोटभर खा, प्या.
    अन्न आणि मद्य ह्यासाठी पैसे पडणार नाहीत.
जे खरोखरचे ‘अन्न’ नाही त्यासाठी पैसे वाया का घालविता?
    तुम्हाला ज्यापासून समाधान मिळत नाही असे काम तुम्ही का करता?
माझे लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला चांगले अन्न मिळेल.
    तुमच्या जीवाला तृप्ती देणाऱ्या अन्नाचा आनंद तुम्हाला मिळेल.
मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. म्हणजे तुम्ही जगाल तुम्ही माझ्याकडे या.
    मी तुमच्याशी चिरकालासाठी करार करीन.
हा करार मी दावीदाबरोबर केलेल्या करारासारखा असेल.
    मी दावीदला वचन दिले होते की मी अखंड त्याच्यावर प्रेम करीन व त्याच्यावर विश्वास ठेवीन.
    तुम्ही त्या करारावर विश्वास ठेवू शकता.
मी, सर्व राष्ट्रांकरिता, दावीदाला माझ्या सामर्थ्याचा साक्षीदार केले.
    दावीद अनेक देशांचा राजा आणि सेनापती होईल असे मी त्याला वचन दिले.”

आता, काही राष्ट्रे कोठे आहेत हे तुम्हाला माहीत नाही.
    पण त्यांची आणि तुमची भेट होईल.
त्या राष्ट्रांना, तुम्ही माहीत नाही.
    पण ती राष्ट्रे तुमच्याकडे धाव घेतील.
परमेश्वराची, तुमच्या देवाची इच्छा असल्यामुळे हे असे घडून येईल.
    इस्राएलचा पवित्र देव तुमचा आदर करीत असल्याने हे असे होईल.
म्हणून फार उशीर होण्याआधी परमेश्वराला शोधा.
    तो जवळ असतानाच त्याला बोलवा.
दुष्टांनी दुष्टपणाने जगणे थांबवावे.
    त्यांनी वाईट विचार सोडून द्यावे.
त्यांनी परमेश्वराला शरण यावे.
    मग परमेश्वर त्यांचे दुख: हलके करील.
आमचा देव क्षमाशील आहे म्हणून
    त्यांनी परमेश्वराला शरण जावे.

लोक देवाला समजू शकत नाहीतः

परमेश्वर म्हणतो, “तुमचे विचार माझ्यासारखे नाहीत.
    तुमचे मार्ग माझ्या मार्गांसारखे नाहीत.
स्वर्ग पृथ्वीपेक्षा उंच आहे.
    त्याचप्रमाणे माझे मार्ग
    आणि विचार तुमच्यापेक्षा उच्च आहेत.”
परमेश्वर स्वतः असे म्हणाला.

10 “पाऊस वा बर्फ आकाशातून पडल्यावर पुन्हा आकाशात जात नाही
    तर तो जमीन भिजवितो, नंतर जमिनीतून रोपे अंकुरतात आणि वाढतात.
त्यापासून शेतकऱ्यांना बी मिळते आणि लोकांना धान्य मिळते.
    धान्याची लोक भाकरी करतात.
11 तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द परत येत नाहीत तर त्या शब्दाप्रमाणे गोष्टी घडतात.
    म्हणजेच माझे शब्द मला पाहिजे असलेल्या गोष्टी घडवून आणतात.
मी त्यांना ज्या गोष्टी करण्यासाठी पाठविलेले असते
    त्या गोष्टी करण्यात ते यशस्वी होतात.

12 “माझे शब्द आनंदाने बाहेर जातील
    आणि शांती घेऊन येतील.
डोंगर आणि टेकड्या आनंदाने नाचू लागतील.
    शेतांतील झाडे आनंदाने टाळ्या वाजवतील. [a]
13 जेथे झुडुपे होती, तेथे देवदारू वाढतील.
    काट्याकुट्यांच्या जागी मेंदी उगवेल.
ह्या गोष्टी परमेश्वराला सुप्रसिध्द् करतील.
    ह्या गोष्टी म्हणजे परमेश्वराच्या सामर्थ्याचे पुरावे असतील.
    हे पुरावे कधीही नष्ट होणार नाहीत.”

Notas al pie

  1. यशया 55:12 माझे … वाजवतील शब्दश: अर्थ जेव्हा परागंदा अवस्थेतून तुम्ही आनंदाने बाहेर पडाल आणि शांतीने पुढे जाल तेव्हा पर्वत व टेकड्या तुमच्यापुढे गाणी गात येतील आणि रानातील झाडे टाळ्या वाजवतील.