A A A A A
Bible Book List

यशया 45 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

इस्राएलाच्या मुक्तीसाठी देवाकडून कोरेशची निवड

45 परमेश्वराने स्वतः निवडलेल्या राजाला, कोरेशला पुढील गोष्टी सांगितल्या,

“मी कोरेशचा उजवा हात धरीन.
    इतर राजांकडून सत्ता काढून घेण्यास मी त्याला मदत करीन.
    नगराच्या वेशी कोरेशला थोपवू शकणार नाहीत.
मी वेशी खुल्या करीन.
    आणि कोरेश आत जाईल.
कोरेश, तुझ्या सैन्याच्या पुढे मी चालीन.
    मी डोंगर भुईसपाट करीन.
मी वेशीचे जस्ताचे दरवाजे मोडीन.
    त्यावरील लोखंडी सळ्या तोडीन.
तुला मी अंधारातून वाचविणारी संपत्ती देईन.
    मी तुला गुप्त धन देईन.
मीच परमेश्वर आहे,
    हे तुला कळावे म्हणून मी हे करीन.
मी इस्राएलचा देव आहे,
    व मी तुला नावाने हाका मारत आहे.
माझा सेवक याकोब,
    आणि माझे निवडलेले लोक, म्हणजे इस्राएल ह्यांच्यासाठी मी हे करतो.
कोरेश, मी तुला नावाने हाक मारीत आहे.
    तू मला ओळखत नाहीस, पण मी तुला नावाने ओळखतो.
मी परमेश्वर आहे मीच फक्त देव
    आहे दुसरा कोणीही देव नाही.
मी तुला वस्त्रे घातली,
    पण तरीही तू मला ओळखत नाहीस.
मी एकटाच देव आहे.
हे मी ह्या सर्व गोष्टी करतो, त्यावरून लोकांना कळेल.
मीच परमेश्वर आहे,
    दुसरा कोणीही देव नाही हे पूर्वेपासून पश्चिमेपर्यत सर्व लोकांना कळेल.
मी प्रकाश निर्माण केला आणि अंधारही.
    मी शांती निर्माण केली तशी संकटेही.
    मी परमेश्वर आहे व ह्यासर्व गोष्टी मी करतो.

“आकाशातील ढगांतून चांगुलपणा पृथ्वीवर पडो.
    पृथ्वी दुभंगो तारण वाढो,
आणि त्याचबरोबर चांगुलपणा वाढो.
    मी परमेश्वराने त्याला निर्मिले आहे.”

देव त्याच्या निर्मितीचे नियंत्रण करतो

“ह्या लोकांकडे पाहा ते त्यांच्या निर्मात्याशीच वाद घालीत आहेत. माझ्याशी वाद घालणाऱ्यांकडे पाहा. ते खापराच्या तुकड्यासारखे आहेत. कुंभार भांडे करण्यासाठी मऊ, ओला चिखल वापरतो पण चिखल त्याला ‘तू काय करतोस?’ असे विचारीत नाही. निर्मितीला निर्मात्याला प्रश्र्न विचारण्याची हिंमत नसते. हे लोक त्या चिखलासारखे आहेत. 10 आई-वडील मुलांना जन्म देतात पण मुले वडिलांना ‘तुम्ही आम्हाला जीवन का दिले’ किंवा आईला ‘तुम्ही आम्हाला जन्म का दिला?’ असे विचारू शकत नाहीत.”

11 परमेश्वर इस्राएलचा पवित्र देव आहे, त्याने इस्राएलची निर्मिती केली. परमेश्वर म्हणतो,

“माझ्या मुलांनो, तुम्ही मला काही खूण दाखविण्यास सांगितले.
    मी केलेल्या गोष्टी दाखविण्याचा तुम्ही मला हुकूम दिला.
12 म्हणून पाहा! मी पृथ्वी व तीवर राहणारी
    सर्व माणसे निर्माण केली.
मी माझ्या हाताने आकाश केले,
    आणि मी आकाशातील सर्व सैन्यांवर हुकूमत ठेवतो.
13 कोरेशला चांगल्या गोष्टी करण्यासाठी मीच शक्ती दिली. [a]
    मी त्याचे काम सोपे करीन.
कोरेश माझी नगरी पुन्हा वसवेल.
    तो माझ्या लोकांना मुक्त करील.
    तो माझ्या लोकांना मला विकणार नाही.
ह्या गोष्टी करण्यासाठी मला त्याला काही द्यावे लागणार नाही.
    लोक मुक्त केले जातील.
    आणि त्यासाठी मला काही मोजावे लागणार नाही.”
सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

14 परमेश्वर म्हणतो, “मिसर आणि इथिओपिआ श्रीमंत आहेत.
    पण इस्राएल, तुला ती संपत्ती मिळेल.
सेबाचे उंच लोक तुझ्या मालकीचे होतील.
    ते गळ्यात साखळ्या अडकविलेल्या अवस्थेत
तुझ्यामागून चालतील (म्हणजेच ते तुझे गुलाम होतील)
    ते तुझ्यापुढे वाकतील आणि तुझी विनवणी करतील.”
इस्राएल, देव तुझ्या बरोबर आहे
    दुसरा कोणीही देव नाही.

15 देवा, तुला लोक पाहू शकत नाहीत
    तू इस्राएलचा तारणारा आहेस.
16 पुष्कळ लोक खोटे देव तयार करतात.
    पण अशा लोकांची निराशा होईल.
    ते सगळे लोक लज्जित होऊन दूर जातील.
17 पण परमेश्वर इस्राएलला वाचवील
    आणि हे तारण निरंतर सुरूच राहील.
    परत कधीही इस्राएलला लज्जित व्हावे लागणार नाही.
18 परमेश्वरच फक्त देव आहे.
    त्यानेच आकाश व पृथ्वी निर्मिली.
    परमेश्वराने पृथ्वीला तिच्या जागी ठेवले.
परमेश्वराने पृथ्वी निर्मिली तेव्हा त्याला ती रिकामी नको होती.
    ती पुढे जगावी म्हणून त्याने ती निर्मिली.
तिच्यावर राहता यावे म्हणून त्याने ती निर्माण केली
“मीच परमेश्वर
    आहे दुसरा कोणीही देव नाही.
19 मी गुप्तपणे कधी बोललो नाही.
    मी मोकळेपणानेच बोललो.
मी जगाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात माझे शब्द लपविले नाहीत.
    रिकाम्या जागी मला शोधा
असे मी याकोबाच्या लोकांना कधीही सांगितले नाही.
    मी परमेश्वर आहे.
मी नेहमीच सत्य बोलतो.
    खऱ्या गोष्टीच मी सांगतो.”

परमेश्वर स्वतःच फक्त देव आहे हे तो सिध्द् करतो

20 “तुम्ही लोक दुसऱ्या राष्ट्रातून पळालेले आहात. तेंव्हा गोळा व्हा आणि माझ्यासमोर या. (हे लोक स्वतःजवळ खोट्या देवाच्या मूर्ती बाळगतात. ते त्या त्यांना वाचवून न शकणाऱ्या देवांची हे लोक प्रार्थना करीत राहतात. ते काय करीत आहेत हे त्यांना कळत नाही. 21 त्या लोकांना माझ्याकडे यायला सांगा. ह्या सर्व गोष्टींबद्दल त्यांना एकत्रितपणे बोलू द्या.)

“पुष्कळ वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला कोणी सांगितले? फार पूर्वीपासून तुम्हाला या गोष्टी कोण सांगत आले आहे? मी, देवाने, एकमेव परमेश्वराने, तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. मीच फक्त देव आहे. माझ्यासारखा आणखी दुसरा कोणी आहे का? चांगला दुसरा देव आहे का? दुसरा कोणी देव त्याच्या लोकांना वाचवितो का? नाही कोणीही दुसरा देव नाही. 22 दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी देवाचे अनुसरण करणे थांबवले. तुम्ही मला अनुसरावे व स्वतःचे रक्षण करून घ्यावे. मीच देव. दुसरा देव नाही. मीच फक्त देव आहे.

23 “मी माझ्या सामर्थ्याच्या जोरावर वचन देईन. आणि जेंव्हा मी एखादी गोष्ट व्हावी म्हणून मी हूकूम देतो तेंव्हा ती होतेच. मी वचन देतो की प्रत्येकजण माझ्यापुढे (देवापुढे) नमन करेल. प्रत्येकजण मला अनुसरण्याचे वचन देईल. 24 लोक म्हणतील ‘चांगुलपणा आणि सामर्थ्य फक्त परमेश्वराकडूनच मिळते.’”

काही लोक देवावर रागावतात पण परमेश्वराचे साक्षीदार येतील आणि परमेश्वराने केलेल्या गोष्टींबद्दल सांगतील, मग परमेश्वरावर रागावणारे लोक लाजेने माना खाली घालतील. 25 परमेश्वर, इस्राएलच्या लोकांना सत्कृत्य करायला मदत करील, व लोक त्यांच्या देवाबद्दल अभिमान बाळगतील.

Footnotes:

  1. यशया 45:13 कोरेशला … मीच शक्ती दिली “मी त्याला उठविले. जे बरोबर होते तेच मी केले असा बहुधा अर्थ असावा.”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes