A A A A A
Bible Book List

यशया 43 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

देव नेहमीच त्याच्या लोकांबरोबर असतो

43 याकोबा, परमेश्वराने तुला जन्म दिला. इस्राएला, परमेश्वराने तुला निर्मिले. आता देव म्हणतो, “भिऊ नकोस मी तुझे रक्षण करीन. मी तुला निवडले आहे. तू माझा आहेस. जेव्हा तू अडचणीत असतोस, तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो. जेव्हा तू नद्या ओलांडशील तेव्हा इजा होणार नाही. आगीमधून चालताना तुला भाजणार नाही. ज्वाळा तुला पोळणार नाहीत. का? कारण मी स्वतः तुझा परमेश्वर आहे. मी, इस्राएलचा पवित्र देव तुझा तारणहार आहे. मी तुझ्या मोबदल्यात मिसर देश दिला. तुला माझा करण्यासाठी मी इथिओपिआ व सेबा यांचे दान केले. तू माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहेस. म्हणून मी तुझा आदर करतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्यासाठी मी सर्व लोक आणि सर्व राष्ट्रे दान करीन.

“म्हणून घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या सर्व मुलांना गोळा करून तुझ्याकडे आणीन, मी त्यांना पूर्व आणि पश्चिम दिशेकडून गोळा करीन. मी उत्तरेला म्हणेन: माझे लोक मला परत दे. मी दक्षिणेला सांगेन, माझ्या लोकांना तुरूंगात ठेवू नको. दूरदूरच्या ठिकाणांहून माझ्या मुलांमुलींना माझ्याकडे परत आण. जी माणसे माझी आहेत, जी माझे नाव लावतात, त्या सर्वांना माझ्याकडे आण. मी त्या लोकांना माझ्यासाठी निर्मिले आहे मीच त्यांना घडविले व ते माझे आहेत.”

देव म्हणतो, “डोळे असून आंधळे व कान असून बहिरे असणाऱ्यांना लोकांना बाहेर आणा. सर्व लोकांनी आणि सर्व राष्ट्रांनीसुध्दा् एकत्र जमावे. त्यांच्यातील एखादा खोटा देव, आरंभी काय घडले याबद्दल कदाचित सांगू इच्छित असेल, त्यांनी आपल्याबरोबर साक्षीदार आणावेत. साक्षीदारांनी सत्य सांगावे त्यावरून ते बरोबर आहेत हे सिध्द् होईल.”

10 परमेश्वर म्हणतो, “तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. मी निवडलेले तुम्ही लोक माझे सेवक आहात माझ्यावर विश्वास ठेवायला लोकांना तुम्ही मदत करावी म्हणून मी तुम्हाला निवडले आहे. ‘मीच तो आहे,’ मीच खरा देव आहे. हे तुम्हाला कळावे म्हणून मी तुमची निवड केली. माझ्याआधी कोणी देव नव्हता आणि माझ्यानंतर कोणी देव नसेल. 11 मी स्वतःच परमेश्वर आहे मी एकमेव आहे. दुसरा कोणीही तारणकर्ता नाही. मीच एकटा आहे. 12 तुमच्याशी बोलला तो मीच होतो. मी तुम्हाला वाचवले मी तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या आहेत. तुमच्या पाठीशी कोणी परका नव्हता. तुम्हीच माझे साक्षीदार आहात. मी देव आहे.” (परमेश्वर स्वतःच हे बोलला.) 13 “मीच अक्षय असतो. मी जे काही करतो, ते कोणीही बदलू शकत नाही. माझ्या सामर्थ्यापासून लोकांना कोणीही वाचवू शकत नाही.”

14 परमेश्वर, इस्राएलचा पवित्र देव तुमचे रक्षण करतो. देव म्हणतो, “मी तुझ्यासाठी बाबेलला सैन्य पाठवीन. खूप लोकांना बंदी केले जाईल. त्या खास्दी (खाल्डियन) लोकांना त्यांच्याच नावांतून दूर नेले जाईल. (खास्दयांना (खाल्डियन लोकांना) त्यांच्या नावांचा फार गर्व आहे.) 15 मी परमेश्वर तुमचा पवित्र देव आहे. मी इस्राएल निर्मिले. मी तुमचा राजा आहे.”

देव त्याच्या लोकांचे पुन्हा रक्षण करील

16 परमेश्वर समुद्रातून मार्ग काढील. त्याच्या लोकांकरिता खवळलेल्या पाण्यातून तो रस्ता तयार करील. देव म्हणतो, 17 “जे लोक रथ, घोडे व सैन्ये यांच्यानिशी माझ्याशी लढतात त्यांचा परा़भव होईल. ते पुन्हा उठणार नाहीत त्यांचा नाश होईल. पण त्यातील ज्योत मावळावी तसे ते नाहीसे होतील. 18 म्हणून आरंभी घडलेल्या गोष्टी आठवू नका. फार पूर्वी घडलेल्या गोष्टींचा विचार करू नका. 19 का? कारण मी आता नव्या गोष्टी घडवून आणीन. आता तुम्ही कोवळ्या रोपटयाप्रमाणे वाढाल. हे सत्य आहे, हे नक्कीच तुम्हाला माहीत आहे. मी खरोखरच वाळवंटातून रस्ता तयार करीन. कोरड्या भूमीवर नद्या निर्माण करीन. 20 हिंस्र पशुसुध्दा् माझे आभार मानतील. मोठे प्राणी आणि पक्षी मला मान देतील. मी जेव्हा वाळवंटात पाणी आणि कोरड्या जमिनीवर नद्या निर्माण करीन तेव्हा ते माझा आदर करतील. मी निवडलेल्या. माझ्या लोकांना पाणी मिळावे म्हणून मी हे करीन. 21 ह्या लोकांना मी निर्मिले आहे. ते माझी स्तुतिस्तोत्रे गातील.

22 “याकोबा, तू माझी प्रार्थना केली नाहीस का? कारण इस्राएल मला विटला आहे. 23 तू तुझ्या मेंढ्या होमबलि देण्यासाठी माझ्याकडे आणल्या नाहीस तू माझा मान राखला नाहीस. तू मला बळी अर्पण केले नाहीस. मला होमबलि अर्पण करावे म्हणून मी तुला बळजबरी केली नाही. तू तुला वीट येईपर्यंत धूप जाळावा असा आग्रह मी धरला नाही. 24 मला तृप्त करण्यासाठी लागणाऱ्या अर्पणांसाठी आणि धुपासाठी तू स्वतःचा पैसा वापरला नाहीस. उलट तुझ्या पापांचे ओझे माझ्यावर लादलेस तुझ्या दुष्कृत्यांचा मला वीट येईपर्यंत तू पाप केलेस.

25 “मी, आणि फक्त मीच तुझी पापे धुतो. मी हे माझ्या आनंदासाठी करतो. मी तुझी पापे लक्षात ठेवणार नाही. 26 पण तू मात्र माझी आठवण ठेवावीस आपण एकत्र येऊन योग्य काय ते ठरवावे. तू केलेल्या गोष्टी तू सांगाव्यास आणि त्या योग्य आहेत हे दाखवावे. 27 तुझ्या पूर्वजांनी पाप केले आणि तुझे शिक्षक माझ्याविरूध्द् वागले. 28 म्हणून मी तुझ्या पवित्र राज्यकर्त्यांना अपवित्र करीन. मी याकोबाला संपूर्णपणे माझा होण्यास भाग पाडीन. [a] इस्राएलमध्ये वाईट घडेल.”

Footnotes:

  1. यशया 43:28 याकोबाला … भाग पाडीन हिब्रूमध्ये ह्या वाक्याचा अर्थ असा की हे लोक पूर्णपणे देवाचे आहेत आणि ते देवाला मिळाले नाहीत तर त्यांनी मेलेच पाहिजे.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes