A A A A A
Bible Book List

यशया 34 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

देव त्याच्या शत्रूंना शिक्षा करील

34 सर्व राष्ट्रांनो, जवळ येऊन ऐका. सर्व लोकांनी कान देऊन ऐकावे. पृथ्वी व तीवर राहणाऱ्या सर्व लोकांनी ह्या गोष्टी ऐकाव्या. परमेश्वर सर्व राष्ट्रांवर व त्यांच्या सैन्यांवर रागावला आहे. परमेश्वर त्या सर्वांचा नाश करील. तो त्या सर्वाना मरायला भाग पाडील. त्यांची प्रेते बाहेर टाकली जातील. त्यातून दुर्गंधी येईल व त्यातील रक्त डोंगरावरून ओघळेल. आकाश कागदाच्या गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल. द्राक्षाच्यावेलीवर ची सुकलेलीपाने वा सुकलेलीअंजिरे अंजिराच्या झाडावरून गळून पडावीत त्या प्रमाणे तारे गळून पडतील. आकाशातील सर्व तारे वितळून जातील. परमेश्वर म्हणतो, “माझी आकाशातील तलवार रक्ताने माखेल तेव्हा हे सर्व घडेल.”

पाहा! परमेश्वराची तलवार अदोमला आरपार कापील. परमेश्वराने तेथील लोकांना अपराधी ठरविले आहे आणि त्यांना मेलेच पाहिजे. [a] बळींच्या रक्ताने परमेश्वराची तलवार माखली आहे. मेंढ्या आणि बकरे ह्यांच्या रक्ताने भरली आहे. एडक्याच्या मूत्र पिंडाच्या चरबीचे तिला वंगण मिळाले आहे. कारण देवाने बस्रा मध्ये नाश करण्याची आणि अदोम मध्ये कत्तल करण्याची वेळ निश्चित केली आहे. म्हणून मेंढे, गुरेढोरे व मस्त बैल मारले जातील. त्यांच्या रक्ताने जमीन माखेल. त्यांच्या चरबीने माती झाकली जाईल.

देवाने शिक्षेची वेळ ठरवली असल्याने ह्या गोष्टी घडून येतील. लोकांनी सियोनवर केलेल्या अन्यायाची भरपाई करण्याचे वर्ष परमेश्वराने निश्चित केले आहे. अदोमच्या नद्या उकळत्या डांबराप्रमाणे होतील. तेथील भूमी उकळत्या गंधकाप्रमाणे होईल. 10 आग रात्रंदिवस पेटत राहील. कोणीही ती विझविणार नाही. अदोममधून निघणारा धूर कायमचा राहील. ती भूमी कायमची नाश पावेल. कोणीही, त्या भूमीतून, पुन्हा कधीही प्रवास करणार नाही. 11 पक्षी आणि लहान सहान प्राणी तिचा ताबा घेतील. घुबडे आणि डोमकावळे तेथे वस्ती करतील. त्या भूमीला “रिकामे वाळवंट” [b] असे नाव पडेल. 12 प्रतिष्ठित नागरिक आणि नेते नाहीसे होतील. त्यांना राज्य करायला काहीही शिल्लक राहणार नाही.

13 तेथल्या सुंदर घरांतून काटेकुटे आणि रानटी झुडुपे वाढतील. त्या घरांतून जंगली कुत्रे व घुबडे राहतील. जंगली प्राणी तेथे वस्ती करतील. तेथे वाढलेल्या गवतात मोठमोठे पक्षी घरटी बांधतील. 14 रानमांजरे तरसांबरोबर तेथे राहतील. रानबोकड आपल्या मित्रांना हाका मारतील. निशाचरांना विश्रांतीचे ठिकाण मिळेल. 15 साप तेथे वारूळे करतील आणि अंडी घालतील. अंडी फुटून छोटे छोटे साप त्या अंधाऱ्या जागेत वळवळतील. स्त्रिया जशा घोळक्याने आपल्या मैत्रिणींना भेटायला जातात, तशीच गिधाडे मेलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यास गोळा होतील.

16 परमेश्वराच्या पाटीकडे पाहा. त्यावर लिहिलेले वाचा त्यातून काहीही सुटलेले नाही. ते प्राणी सर्व एकत्र येतील असेच त्यावर लिहिले आहे. मी त्यांना एकत्र आणीन. असे देव म्हणाला म्हणून देवाचा आत्मा त्यांना एकत्र करील. 17 त्यांचे काय करायचे ते देवाने ठरविले, नंतर देवाने त्यांच्यासाठी जागा निवडली. देवाने रेघ काढून त्यांना त्यांची जागा दाखविली. ते प्राणी ती जागा कायमची व्यापतील. वर्षांनुवर्षे ते तेथे राहतील.

Footnotes:

  1. यशया 34:5 परमेश्वराने तेथील … मेलेच पाहिजे हिब्रूमध्ये ह्या वाक्याचा अर्थ असा की हे लोक पूर्णपणे देवाचे आहेत आणि ते देवाला मिळाले नाहीत तर त्यांनी मेलेच पाहिजे.
  2. यशया 34:11 रिकामे वाळवंट “ते ह्या शहराला शून्यतेच्या दोरीने मोजतील आणि आभावाच्या मापाने तोलतील.” उत्पत्ती किंवा प्रारंभ 1:2 मध्ये ह्या शब्दांची उजाड पृथ्वीचे वर्णन केले आहे.
  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes