A A A A A
Bible Book List

यशया 32 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

नेत्यांनी सज्जन आणि प्रामाणिक असावे

32 मी सांगतो ते ऐका सगळीकडे चांगुलपणा नांदावा अशा तऱ्हेने राजाने राज्य करावे. नेत्यांनी लोकांना मार्गदर्शन करताना न्याय निर्णय घ्यावेत. असे जर झाले तर वारा व पाऊस ह्यापासून बचाव करण्यासाठी जसा अडोसा असतो तसा राजा निवाऱ्याची जागा होईल. वाळवंटातील झऱ्याप्रमाणे अथवा उष्ण प्रदेशातील मोठ्या खडकाखालील सावलीसारखा लोकांना तो वाटेल. लोक मदतीसाठी त्याच्याकडे धाव घेतील व त्याचे म्हणणे ते खरोखरच ऐकतील. आता जे लोक गोंधळलेले आहेत त्यांना त्या वेळी सर्व समजून येईल. आता स्पष्ट बोलू न शकणारे लोक त्या वेळी स्पष्टपणे व लवकर बोलतील. दुष्ट आणि अनीतीमान लोकांना कोणी थोर म्हणणार नाही. जे लोक गुप्त योजना करतात त्यांना लोक मान देणार नाहीत.

मूर्ख माणूस मूर्खपणाच्या गोष्टी सांगतो आणि मनात वाईट गोष्टींचे बेत आखतो. त्याला चुकीच्याच गोष्टी करायच्या असतात. तो परमेश्वराबद्दल वाईटसाईट बोलतो. तो भुकेलेल्यांना अन्न खाऊ देत नाही. तहानेलेल्यांना पाणी पिऊ देत नाही. तो मूर्ख दुष्टपणाचा उपयोग हत्यारासारखा करतो. गरीबांना लुबाडण्याच्या योजना तो करतो. तो गरीबांबद्दल खोटेनाटे सांगतो आणि ह्यामुळे गरीब न्यायापासून वंचित होतात.

परंतु भला नेता चांगल्या गोष्टींच्या योजना आखतो आणि ह्या चांगल्या गोष्टीच त्याला भला नेता बनवितात.

कठीण काळ येत आहे

तुम्ही काही स्त्रिया आता शांत आहात. तुम्हाला आता सुरक्षित वाटते आहे. पण तुम्ही जरा उभे राहून माझे म्हणणे ऐकावे. 10 आता तुम्हाला सुरक्षित वाटते पण आणखी एक वर्षाने तुम्ही अडचणीत याल. का? कारण तुम्ही पुढच्या वर्षी द्राक्षे गोळा करू शकणार नाही. पुढच्या वर्षी द्राक्षाचे पीक येणार नाही.

11 स्त्रियांनो, आता तुम्ही शांत आहात पण तुम्हाला भिती वाटली पाहिजे. आता तुम्हाला सुरक्षित वाटते, पण तुम्ही चिंता केली पाहिजे. तुमची चांगली वस्त्रे काढा आणि शोकप्रदर्शक कपडे घाला. ते कपडे तुमच्या कमरेभोवती गुंडाळा. 12 दु:खाने भरलेल्या छातीवर शोकप्रदर्शक कपडे चढवा. रडा! कारण तुमची शेते उजाड झाली आहेत. तुम्हाला द्राक्षे देणारे तुमचे द्राक्षमळे ओस पडले आहेत. 13 माझ्या लोकांच्या भूमीसाठी शोक करा. कारण तेथे फक्त काटेकुटे आणि तण माजतील. एकेकाळी आनंदाने भरलेल्या शहरासाठी व हर्षभरित घरांसाठी आता शोक करा.

14 लोक राजधानी सोडून जातील. राजवाडा व बुरूज रिकामी पडतील. लोक घरांत न राहता गुहेत राहतील. रानगाढवे व मेंढ्या शहरात राहतील. जनावरे गवत खाण्यास तेथे जातील.

15-16 देव वरून त्याचा आत्मा आम्हांला देईपर्यंत असेच घडत राहील. आता या भूमीवर चांगुलपणा राहिला नाही. ही भूमी जणू वाळवंट झाली आहे. पण भविष्यात, ते वाळवंट कर्मेल प्रमाणे होईल. तेथे योग्य न्याय नांदेल आणि कर्मेल हिरव्यागार रानासारखे होईल. चांगुलपणा तेथे वस्ती करील. 17 तो चांगलुपणा कायमची शांती आणि सुरक्षितता आणील. 18 माझे लोक शांतीच्या सुंदर मळ्यात राहतील. माझी माणसे सुरक्षिततेच्या तंबूत राहतील. ते निवांत आणि शांत जागी राहतील.

19 पण ह्या गोष्टी घडण्यापूर्वी जंगल उजाड झालेच पाहिजे, शहराचा पाडाव झाला पाहिजे. 20 तुम्ही काहीजण प्रत्येक झऱ्याकाठी बी पेरा. तुमच्या गुरांना आणि गाढवांना मोकळे सोडा. व तेथे चरू द्या. तुम्ही लोक खूप सुखी व्हाल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes