Add parallel Print Page Options

माझे म्हणणे समजून घ्या. यहुदा व यरूशलेम ज्यावर अवलंबून आहेत अशा सर्व गोष्टी तो प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर काढून घेईल. देव त्यांची भाकरी व पाणी बंद करील. तो (देव) वीरांचा व मोठ्या योध्द्या्ंना दूर करील. न्यायासनावर बसणारे, भोंदू संदेष्टे, मांत्रिक व तथाकथित वडीलधारी मंडळी इत्यादींना दुसरीकडे नेऊन ठेवील. देव सैनिक शासक व शासनकर्ते यांना दूर करील. निपुण सल्लागार व जादूटोणा करून भविष्यकथन करण्याचा प्रयत्न करणारे चाणाक्ष लोक यांनाही दूर ठेवील.

देव म्हणतो, “तरूण मुले नेतेपदी बसतील अशी परिस्थिती मी निर्माण करीन. प्रत्येकजण दुसऱ्याविरूध्द उभा राहील, लहान थोरांचा मान राखणार नाहीत व सामान्य प्रतिष्ठितांचा आदर करणार नाहीत.”

त्या वेळी एखादा उठेल व आपल्या घरातील एखाद्या भावाला पकडेल व त्याला म्हणेल “तुझ्याजवळ अंगरखा आहे, तर मग ह्या विध्वंस झालेल्या अवशेषांवर तूच नेता होशील.”

पण तो भाऊ उभा राहील व म्हणेल, “माझ्याच घरात पुरेसे अन्न, वस्त्र नाही. मी तुम्हाला काय मदत करू शकत नाही? तुम्ही मला तुमचा नेता करू नका.”

हे घडेल कारण यरूशलेम अडखळले आहे व त्याने चूक केली आहे. यहुदाने देवाला अनुसरायचे थांबवले आणि त्याचे पतन झाले. यरूशलेम व यहुदा यांची वाणी आणि कृती परमेश्वराच्या विरूध्द् आहे. परमेश्वराच्या तेजस्वी डोळ्यांना हे सर्व स्पष्टपणे दिसत आहे.

चुकीची कृत्ये केल्याची अपराधी भावना लोकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आपल्या पापांबद्दल त्यांना गर्व वाटत आहे. ते सदोम शहरातील रहिवाशांसारखे झाले आहेत. आपली पापे कोण पाहत आहे ह्याची त्यांना पर्वा नाही. हे त्यांच्या दृष्टीने फारच वाईट आहे. त्यांनी स्वतःला आपत्तीत लोटले आहे.

10 सज्जनांना सांगा की त्यांचा उत्कर्ष होईल. सत्कृत्यांचे फळ त्यांना मिळेल. 11 पण दुर्जनांची काही धडगत नाही. त्यांना खूप त्रास होईल. त्यांच्या दुष्कृत्यांची त्यांना सजा मिळेल. 12 लहान बालके मोठ्यांचा पराभव करतील. अबलांचे राज्य येईल.

माझ्या लोकांनो, तुमच्या मार्गदर्शकांनी तुम्हाला योग्य मार्गापासून परावृत्त केले व चुकीच्या मार्गाने नेले.

देवाचा स्वतःच्या लोकांबद्दल निर्णय

13 परमेश्वर स्वतःच लोकांचा न्यायनिवाडा करील. 14 वडीलधारी मंडळी व नेते यांनी केलेल्या कृत्यांविरूध्द् परमेश्वर न्याय देईल.

परमेश्वर म्हणतो, “तुम्ही लोकांनी द्राक्षांची बाग(यहुदा) जाळली आहे. तुम्ही गरिबांच्या वस्तू बळकावल्या व स्वतःच्या घरात भरल्या. 15 माझ्या लोकांना दुखवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? गरिबांना धुळीत मिळवायचा तुम्हाला काय हक्क आहे?” माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला.

16 परमेश्वर म्हणतो, “सीयोनमधल्या स्त्रिया फार गर्विष्ठ झाल्या आहेत. आपण इतर लोकांपेक्षा उच्च आहोत हे दाखवीत त्या ताठ मानेने वावरत असतात. त्या डोळे मारीत, आपल्या पैंजणांचा आवाज करीत ठुमकत चालतात.”

17 माझा प्रभु सीयोनच्या स्त्रियांच्या डोक्यांत व्रण करील. त्यांचे सर्व केस गळून पडतील. 18-23 त्या वेळी परमेश्वर ह्या स्त्रियांना ज्यांचा अभिमान वाटतो अशा सर्व गोष्टी म्हणजे पैजण, चंद्रसूर्याप्रमाणे असलेले हार, कर्णभूषणे, तोडे, बुरखे, गळपट्टे, पायातल्या साखळ्या, कमरपट्टे, अत्तरांच्या बाटल्या, ताईत, विशेष प्रकारच्या अंगठ्या, नथी, उंची रेशमी वस्त्रे, शेले व शाली, बटवे, आरसे, सुती वस्त्रे फेटे, लांब शाली काढून घेईल.

24 आता या स्त्रियांजवळ मधुर सुवासाची अत्तरे आहेत पण देव त्यांना शिक्षा करील त्या वेळी त्या अत्तरांना बुरशी येऊन कुजट घाण येईल. आता या स्त्रिया कमरपट्टे वापरतात पण त्या ऐवजी दोऱ्या वापरण्याची वेळ त्यांच्यावर येईल. आता त्या विविध केशरचना करतात पण नंतर त्यांच्या डोक्यावर केसच नसतील. त्यांचे केशवपन होईल. त्यांच्या मेजवान्यांसाठी असलेल्या विशेष वस्त्रप्रावरणांऐवजी त्यांना जे कपडे घालावे लागतील त्यातून त्यांची वाईट स्थिती दिसून येईल. त्यांच्या चेहेऱ्यावरील सौंदर्यखुणांच्या जागी भाजल्याचे डाग पडतील.

25 त्याच वेळी लढाईत तुमची माणसे तलवारीने मारली जातील. वीर लढाईत कामी येतील. 26 वेशीजवळ असलेल्या सभा-संमेलनाच्या जागी शोककळा पसरेल. चोर व लुटारूंनी सर्वस्व लुटलेल्या स्त्रीप्रमाणे यरूशलेम नगरी एकटीच बसून शोक करेल.