Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

देवाचा बाबेलोनला संदेश

21 बाबेलोनबद्दल (“समुद्राजवळचे वाळवंट”) देवाचा शोक संदेश.

वाळवंटातून काहीतरी येत आहे.
    नेगेबच्या वाळवंटातून येणाऱ्या वादळाप्रमाणे ते आहे.
    भयंकर देशातून ते येत आहे.
काहीतरी भयंकर घडणार असल्याचा दृष्टान्त मला होत आहे.
    विश्वासघातकी तुझ्याविरूध्द् जाताना मला दिसत आहे.
    लोक तुझी संपत्ती लुटून नेताना मी पाहतोय.

एलाम, जा आणि लोकांवर चढाई कर.
    मादया, शहराला वेढा घाल आणि त्याचा पाडाव कर.
    त्या शहरातील सर्व दुष्कृत्ये मी नाहीशी करीन.

भयंकर गोष्टी पाहून मी घाबरलो आहे.
    भीतीने माझ्या पोटात गोळा उठतो त्या भीतीच्या वेदना प्रसूतिवेदनेप्रमाणे आहेत.
जे मी ऐकतो त्याने भयभीत होतो,
    जे पाहतो त्यामुळे भीतीने माझा थरकाप होतो.
मी चिंताग्रस्त आहे आणि भीतीने थरथर कापत आहे.
    माझी प्रसन्न संध्याकाळ काळरात्र बनली आहे.

लोकांना वाटते सारे काही ठीक चालले आहे.
    “लोक म्हणत आहेत
    जेवणाची तयारी करा.
    खा. प्या.
त्याच वेळी तिकडे सैनिक म्हणत आहेत
    टेहळणीदार ठेवा.
    सेनाधिकाऱ्यांनो, उठा व ढाली सज्ज करा.”

माझा प्रभू मला म्हणाला, “जा आणि ह्या शहराचे रक्षण करण्यासाठी पहारेकऱ्याची नेमणूक कर. तो जे जे पाहील त्याची त्याने वर्दी द्यावयास हवी. जर त्या रखवालदाराने घोडेस्वारांच्या रांगा, गाढवे किंवा उंट पाहिले तर त्याने अतिशय काळजीपूर्वक चाहूल घेतली पाहिजे.”

मग एके दिवशी रखवालदाराने इशारा दिला. सिहंनाद करून रखवालदार म्हणाला,

“हे प्रभु! रोज मी टेहळणी बुरूजावरून टेहळणी करीत असतो.
    रोज रात्री माझा खडा पहारा असतो.
पण पाहा! ते येत आहेत! लोकांच्या
    व घोडेस्वारांच्या रांगा मला दिसत आहेत!”

नंतर दूत म्हणाला,
    “बाबेलोनचा पराभव झाला.
    ते जमीनदोस्त झाले,
बाबेलोनच्या खोट्या देवांच्या सर्व मूर्तींची मोडतोड होऊन
    त्या धुळीला मिळाल्या आहेत.”

10 यशया म्हणाला, “माझ्या लोकांनो, सर्वशक्तिमान परमेश्वराने, इस्राएलच्या देवाने जे मला ऐकवले, ते मी तुम्हाला सांगितले. खळ्यातील धान्याप्रमाणे तुम्ही झोडपले जाल.”

देवाचा एदोमला संदेश

11 दुमाविषयीचा शोक संदेश.

सेईराहून (एदोमहून) मला एकजण भेटायला आला.
    तो म्हणाला, “रखवालदारा, रात्र किती राहिली?
    अंधार सरायला अजून किती वेळ आहे?”

12 रखवालदार उत्तरला,
    “सकाळ होत आहे पण परत रात्र होईल.
तुम्हाला काही विचारायचे
    असल्यास परत या [a] व मग विचारा.”

देवाचा अरेबियाला संदेश

13 अरेबियाविषयी शोक संदेश

ददार्नीच्या काफल्याने अरेबियाच्या वाळवंटातील
    काही झाडांखाली रात्र काढली.
14 त्यांनी तहानेलेल्या प्रवाशांना पाणी दिले
    तेमा देशातील लोकांनी प्रवाशांना अन्न दिले.
15 ते प्रवासी, त्यांना ठार मारायला
    उठलेल्या तलवारीपासून
व युध्द करायला सज्ज
    असलेल्या धनुष्यांपासून दूर पळत होते.
ते घनघोर युध्दापासून दूर पळत होते.

16 ह्या गोष्टी घडून येतील असे माझ्या प्रभु परमेश्वराने मला सांगितले. परमेश्वर म्हणाला, “एक वर्षात (सालदाराच्या मोजणीप्रमाणे) केदारचे वैभव लयाला जाईल. 17 त्या वेळी अगदी थोडे धनुर्धारी, केदारचे महान योध्दे, मागे उरतील.” इस्राएलच्या परमेश्वर देवाने सांगितले आहे.

Notas al pie

  1. यशया 21:12 परत या याचा अर्थ ‘हृदयपरिवर्तन करा, पक्ष्चाताप करा’ असाही होऊ शकतो.