A A A A A
Bible Book List

यशया 14 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

इस्राएल घरी परत येईल

14 पुढील काळात, परमेश्वर याकोबाला प्रेमाची पुन्हा प्रचिती देईल. तो इस्राएली लोकांची पुन्हा निवड करील. तो त्यांना त्यांची जमीन परत देईल. यहुद्यां व्यतिरिक्त अन्य लोक त्यांना येऊन मिळतील. ते एकत्र होतील आणि त्यांचा एकच वंश याकोबाचा वंश होईल. इतर राष्ट्रे इस्राएलला त्याची जमीन परत देतील, इतर राष्ट्रांतील स्त्री पुरूष इस्राएलचे गुलाम होतील. पूर्वी ह्याच लोकांनी इस्राएलच्या प्रजेला गुलाम होण्यास भाग पाडले होते. पण आता इस्राएलच त्यांचा पराभव करील व त्यांच्यावर राज्य करील. परमेश्वर तुमचे कष्ट कमी करून सुख व आराम देईल. पूर्वी तुम्ही गुलाम होता. लोक तुम्हाला राबवून घेत. पण परमेश्वर तुमचे कष्ट नाहीसे करील.

बाबेलोनच्या राजाबद्दलचे गाणे

त्या वेळी बाबेलोनच्या राजाबद्दलचे हे गाणे तुम्ही म्हणायला लागाल, राजा आमच्यावर राज्य करीत.

असताना नीचपणे वागत होता,
    पण आता त्याची सत्ता नष्ट झाली.
परमेश्वर दुष्ट राजांचा राजदंड मोडतो.
    परमेश्वर त्यांची सत्ता काढून घेतो.
रागाच्या भरात बाबेलोनच्या राजाने लोकांना फटकावले.
    तो नेहमीच लोकांना फटकावत असे.
त्या दुष्ट राजाने क्रोधाने लोकांवर सत्ता गाजवली.
    तो नेहमीच लोकांना दुखवत असे.
पण आता संपूर्ण देशाला स्वास्थ्य मिळाले आहे.
    देश शांत आहे.
    लोक उत्सव, समारंभ करू लागले आहेत.
तू दुष्ट राजा होतास.
    पण आता तू संपला आहेस.
लबानोनमधील गंधसरू
    व सरूवृक्षसुध्दा आनंदित झाले आहेत.
वृक्ष म्हणतात, “राजाने आम्हाला कापून टाकले होते.
    पण आता राजाच पडला आहे.
    तो आता कधीच उठणार नाही.”
राजा, तू येणार म्हणून अधोलोकात
    खळबळ उडाली आहे.
पृथ्वीवरच्या नेत्यांच्या आत्म्यांना,
    तू येणार म्हणून जागे करीत आहे,
सिंहासनावरून त्यांना उठवीत आहे,
    ते तुझ्या आगमनाची तयारी करतील.
10 ते सर्व तुझी चेष्टा करतील.
    ते म्हणतील, “आता तू अगदी आमच्याप्रमाणे
    निर्जीवकलेवर झाला आहेस.”
11 तुझा गर्व अधोलोकात पाठविला आहे.
    तुझ्या सारंगीचा नाद तुझ्या गर्विष्ठ आत्म्याचे आगमनच घोषित करीत आहे.
अळ्या तुझे शरीर खाऊन टाकतील.
    तू अळ्यांच्या अंथरूणावर झोपशील व कीटकांचे पांघरूण घेशील.
12 तू प्रभात ताऱ्याप्रमाणे होतास,
    पण आता तू आकाशातून खाली पडला आहेस.
पूर्वी सर्व राष्ट्रे तुझ्यापुढे नेहमीच वाकत होती,
    पण आता तू संपला आहेस.
13 तू नेहमीच स्वतःला सांगायचास,
    “मी परात्पर देवासारखा होईन.
मी आकाशात उंच जाईन.
देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन स्थापन करीन.
    मी पवित्र साफोन डोंगरावरच्या देवसभेत बसून देवांना भेटीन.
14 मी मेघांवर आरोहण करून वेदीवर जाईन.
    मी परात्पर देवासारखा होईन.”

15 पण तसे घडले नाही.
    तू देवाबरोबर आकाशात गेला नाहीस.
    तुला अधोलोकात, पाताळात आणले गेले.
16 लोक तुझ्याकडे निरखून पाहतील व तुझ्याबद्दल विचार करतील.
    तू एक कलेवर आहेस हे ते पाहतील आणि म्हणतील,
“पृथ्वीवर सगळीकडे ज्याने
    प्रचंड भय निर्माण केले होते तो हाच का?
17 ज्याने शहरांचा विध्वंस करून
    सर्व जमिनीचे वाळवंट केले तो हाच मनुष्य का?
ज्यांने युध्दात लोकांना कैदी केले
    व त्यांना घरी जाऊ दिले नाही तो हाच का?”
18 पृथ्वीवरील प्रत्येक राजा वैभवात मरण पावला,
    प्रत्येकजण आपापल्या थडग्यात विसावा घेत आहे.
19 पण, हे दुष्ट राजा,
    तुला तुझ्या थडग्याच्या बाहेर टाकले आहे.
तू झाडाच्या तोडलेल्या फांदीप्रमाणे आहेस.
    लढाईत मारल्या गेलेल्या सैनिकाला बाकीचे सैनिक तुडवून जातात तशी तुझी स्थिती आहे.
आता तुझ्यात व इतर कलेवरात काहीही फरक नाही
    तुला कफनात गुंडाळले आहे.
20 इतर खूप राजे मृत्यू पावले, व आपापल्या थडग्यात विसावले
    पण तुला त्यांच्यात जाता येणार नाही.
का? कारण तू स्वतःच्याच देशाचा विध्वंस केलास.
    स्वतःच्याच प्रजेला ठार मारलेस.
तुझी मुले तुझ्यासारखा नाश करीत राहू शकणार नाहीत.
    त्यांना परावृत्त केले जाईल.

21 त्याच्या मुलांना ठार मारण्याची तयारी करा,
    कारण त्यांचे वडील गुन्हेगार आहेत.
त्यांची मुले नातेवाईक, नातवंडे कधीही ह्या देशावर राज्य करणार नाहीत.
    ते, पुन्हा कधीही ह्या जगात, त्यांची शहरे वसविणार नाहीत.

22 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणाला, “मी स्वतः त्या लोकांविरूध्द लढण्यास उभा राहीन. मी प्रसिध्द् शहर बाबेलोनचा नाश करीन. मी सर्व बाबेलोन वासीयांचा नाश करीन. त्यांची मुले, नातवंडे, पतवंडे ह्यांचा नाश करीन.” हे सर्व स्वतः परमेश्वर बोलला.

23 परमेश्वर पुढे म्हणाला, “मी बाबेलोनचे रूप बदलून टाकीन. ती जागा लोकांना नव्हे तर जनावरांना राहण्यालायक करीन. त्या जागी दलदल करीन ‘नाशरूपी झाडूने’ मी बाबेलोन स्वच्छ करीन.” सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला.

देव अश्शूरला पण शिक्षा करील

24 सर्वशक्तिमान परमेश्वराने वचन दिले आहे. परमेश्वर म्हणाला, “मी वचन देतो, मी सांगितल्याप्रमाणे गोष्टी घडून येतील. मी योजल्याप्रमाणे सर्व होईल. 25 मी माझ्या देशात अश्शूरच्या राजाचा नाश करीन. माझ्या डोंगरावर मी त्या राजाला पायाखाली तुडवीन. त्याने माझ्या माणसांना त्याचे गुलाम केले, त्यांच्या मानेवर जोखड घातले. यहुदाच्या मानेवरील जोखड दूर केले जाईल. त्याच्यावरी ओझे दूर सारले जाईल. 26 माझ्या लोकांकरिता मी हा बेत केला आहे. मी माझ्या हाताचा (बळाचा) सर्व राष्ट्रांना शिक्षा करण्यासाठी उपयोग करीन.”

27 जेव्हा परमेश्वरच संकल्प करतो तेव्हा कोणीच तो रद्द करू शकत नाही. जेव्हा लोकांना शिक्षा करण्यासाठी परमेश्वरच हात उगारतो, तेव्हा कोणीच त्याला थांबवू शकत नाही.

देवाचा पलेशेथविरूध्द संदेश

28 राजा आहाजच्या मृत्यूच्या वर्षीच ही शापवाणी झाली.

29 पलेशेथ देशा, तुला पराभूत करणारा राजा गेला म्हणून तुला आनंद झाला आहे. पण खरे तर तुला आनंद व्हायचे काही कारण नाही. हे खरे आहे की त्या राजाची सत्ता संपली आहे. पण राजाचा मुलगा गादीवर बसेल व राज्य करील. हे एका सापाने दुसऱ्या अती विषारी सापाला जन्म दिल्यासारखे होईल. हा नवा राजा तुझ्या दृष्टीने चपळ व भयानक सापासारखा असेल. 30 पण माझी गरीब प्रजा मात्र सुखाने खाईल. त्यांची मुले सुरक्षित राहतील. माझे गरीब लोक सुखशांतीने राहतील. पण मी तुझ्या कुळाचा उपासमारीने अंत करीन. तुझ्या कुळातील उरलेले सर्व लोक मरतील.

31 नगरच्या वेशीजवळील प्रजाजनांनो, रडा.
    नगरवासीयांनो, आक्रोश करा.
पलेशेथ मधील सर्व लोक भयभीत होतील.
    त्यांचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल.

उत्तरेकडे पाहा!
    धुळीचा लोट उठला आहे.
अश्शूरचे सैन्य येत आहे.
    त्या सैन्यातील सर्व माणसे बलवान आहेत. [a]
32 ते सैन्य त्यांच्या देशात निरोप पाठवील.
    ते जासूद त्यांच्या लोकांना काय सांगतील?
ते सांगतील की पलेशेथचा पराभव झाला आहे.
    पण परमेश्वराने सीयोनला बलवान बनवले
    व सर्व गरीब तिकडे आश्रयासाठी गेले.

Footnotes:

  1. यशया 14:31 त्या सैन्यातील … आहेत ह्याचा दुसरा अर्थ “त्यांच्यातील कोणीही मागे राहणार नाही.”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes