A A A A A
Bible Book List

मत्तय 8 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

येशू एका आजरी माणसाला बरे करतो

येशू डोंगरावरून खाली आला. पुष्कळ लोक त्याच्यामागे चालत होते. तेव्हा एक कुष्ठरोग झालेला मनुष्य त्याच्याकडे येऊन वाकून त्याच्या पाया पडून म्हणाला, “प्रभु, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करण्यास समर्थ आहात.”

मग येशूने आपला हात पुढे करुन त्याला स्पर्श केला व म्हटले, “तू शुद्ध व्हावेस अशी माझी इच्छा आहे,” आणि ताबडतोब तो कुष्ठरोगी बरा झाला. “हे जे घडले ते कुणाला सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकांना दाखव आणि तू कुष्ठरोगमुक्त झालास ह्याचे प्रमाण म्हणून मोशेने ठरवून दिलेले अर्पण वाहून टाक. ह्यामुळे तू शुद्ध झाल्याचे लोकांना कळेल.”

येशू सेनाधिकाऱ्याच्या नोकराला बरे करतो

येशू कफर्णहूम शहरास गेला. जेव्हा त्याने शहरात प्रवेश केला, तेव्हा एक सेनाधिकारी त्याच्याकडे आला आणि विनंती करू लागला की, “प्रभु, माझा नोकर पक्षाघाताने खूपच त्रासलेला आहे व तो माझ्या घरात पडून आहे.”

येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.”

तेव्हा सेनाधिकारी म्हणाला, “प्रभु, आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. आपण फक्त शब्द बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल. कारण मी स्वतः दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतो आणि माझ्या हाताखाली देखील अनेक शिपाई आहेत. मी एखाद्याला जा म्हणतो आणि तो जातो आणि दुसऱ्याला ये म्हटल्यावर तो येतो. मी माझ्या नोकराला अमूक कर असे सांगतो आणि तो ते करतो.”

10 येशूने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले आणि जे त्याच्यामागुन चालत होते. त्यांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, इस्राएलात इतका मोठा विश्वास असलेला एकही मनुष्य मला आढळला नाही. 11 मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ जण पूर्वेकडून आणी पश्चिमेकडून येतील आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्यासह स्वर्गाच्या राज्यात मेजासभोवती मेजवानीसाठी बसतील. 12 परंतु जे खरे वारस आहेत. ते बाहेरच्या अंधरात टाकले जातील. तेथे रडणे व दात खाणे चालेल.”

13 मग येशू सेनाधिकाऱ्याला म्हणाला, “जा, तू जसा विश्वास धरलास तसे होईल.” आणि त्याच क्षणी त्याचा नोकर बरा झाला.

येशू अनेकांना बरे करतो

14 मग येशू पेत्राच्या घरी आला. तेथे पेत्राची सासू तापाने आजारी पडली आहे, असे येशूने पहिले. 15 त्याने तिच्या हाताला स्पर्श केला तेव्हा तिचा ताप निघाला. मग ती उठून त्याची सेवा करू लागली.

16 त्या संध्याकाळी लोकांनी भूतबाधा झालेल्या पुष्कळ लोकांना त्याच्याकडे आणले येशूने शब्द बोलून ती भुते घालविली व सर्व प्रकारच्या रोग्यांना बरे केले 17 यशया संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. यशयाने असे म्हटले होते:

“त्याने आमच्या व्याधी स्वतःवर घेतल्या,
    त्याने आमचे रोग वाहिले.”

येशूला अनुसरणे

18 आपल्या भोवती खूप लोक आहेत हे येशूने पाहिले तेव्हा त्याने त्यांना सरोवराच्या पलीकडे जाण्याची आज्ञा केली. 19 मग एक नियमशास्त्राचा शिक्षक त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “गुरुजी, आपण जेथे जाल तेथे मी आपल्या मागे येईन.”

20 येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना राहायला बिळे आणि आकाशातील पाखरांना घरटी आहेत. परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके सुद्धा टेकावयास जागा नाही.”

21 मग येशूच्या शिष्यांपैकी आणखी एक जण येशूला म्हणाला, “प्रभु, पहिल्यांदा मला जाऊ द्या व माझ्या वडिलांना पुरून येऊ द्या.”

22 पण येशू त्याला म्हणाला, “तू माझ्या मागे ये. जे मेलेले आहेत त्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे.”

येशू वादळ थांबवितो

23 मग येशू नावेत गेल्यावर त्याच्यामागून त्याचे शिष्य नावेत गेले. 24 अचानक, समुद्रात इतके मोठे वादळ झाले की, नाव लाटांमध्ये पूर्णपणे गुरफटून गेली. आणि येशू तर नावेत झोपला होता. 25 तेव्हा शिष्य त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला जागे केले व म्हटले, “प्रभु, आम्हांला वाचवा, आपण बुडत आहोत.”

26 येशूने उत्तर दिले, “तुम्ही विश्वासात किती उणे आहात रे? तुम्ही का घाबरता?” मग त्याने उठून वारा व लाटा यांना अधिकारवाणीने शांत होण्यास सांगितले. वारा थांबला. समुद्र अगदी शांत झाला.

27 तेव्हा लोकांना मोठे आश्चर्य वाटले, ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे? वारा व समुद्र देखील त्याचे ऐकतात.”

येशू दोन माणसांमधून भूते काढतो

28 मग येशू समुद्राच्या पलीकडे असलेल्या गरदेकरांच्या देशात आला, तेव्हा दोन भूतबाधा झालेली माणसे स्मशानातून येशूकडे आली. ही माणसे स्मशानातील कबरांध्ये राहत होती. ती फार भेसूर होती, त्यामुळे कोणीही त्यांच्या वाटेला जात नसे. 29 ती दोघे येशूकडे आली व म्हणाली, “देवाच्या पुत्रा, तुला आमच्याकडून काय पाहिजे? नेमलेल्या वेळेपूर्वीच तू आम्हांला शिक्षा करायला आलास काय?”

30 त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर डुकरांचा एक कळप चरत होता. 31 ती भुते त्याला विनंती करू लागली, ती म्हणाली, “जर तू आम्हाला ह्यांच्यामधून काढून टाकणार असशील तर आम्हांला त्या डुकरांच्या कळपात जाऊ दे.”

32 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जा.” मग ती त्यांच्यामधून निघून डुकरांमध्ये गेली. तेव्हा तो संपूर्ण कळप कड्यावरून खाली धावत जाऊन पाण्यात बुडाला. 33 मग त्यांना चारणारे पळाले व त्यांनी नगरात जाऊन सर्वांना हे वर्तमान, तसेच भूतबाधा झालेल्यांचे काय झाले तेही सांगितले. 34 तेव्हा सर्व शहर येशूला भेटायला निघाले; आणि जेव्हा त्यांनी त्याला पाहिले तेव्हा येशूने त्यांच्या प्रदेशातून निघून जावे अशी विनंती त्यांनी त्याला केली.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes