A A A A A
Bible Book List

मत्तय 20 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

येशू शेतमजुराच्या बोधकथेचा वापर करतो

20 “स्वर्गाचे राज्य हे कोण्या शेतमालकासारखे आहे. जो अगदी पहाटे त्याच्या द्राक्षमळ्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला. त्या मनुष्याने एक दिवसाच्या मजुरीकरिता प्रत्येकाला चांदीचे एक नाणे [a] देण्याचे कबूल केले. आणि त्याने द्राक्षाच्या मळ्यात कामास पाठविले.

“सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो मनुष्य बाजारात गेला तेव्हा तेथे काही माणसे उभी असलेली त्याला दिसली. त्या लोकांना काहीच काम नव्हते. मग तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीसुद्धा माझ्या द्राक्षमळ्यात कामाला जा आणि जी योग्य मजुरी आहे ती मी तुम्हांला देईन.’ मग ते काम करण्यास मळ्यात गेले.

“तो मनुष्य बारा वाजता आणि तीन वाजता बाजारात गेला आणि त्या मनुष्याने आपल्या मळ्यात काम करण्यासाठी काही लोकांना दोन वेळा जाऊन मजुरीवर घेतले. पाच वाजता तो मनुष्य परत एकदा बाजारात गेला तेव्हा आणखी काही लोक उभे असलेले त्याला आढळले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही काही काम न करता दिवसभर येथे का बरे उभे राहिला आहात?’

“त्या लोकांनी उत्तर दिले, ‘आम्हांला कोणी काम दिले नाही.’

“तो मनुष्य त्यांना म्हणाला, ‘तर मग तुम्ही जाऊन माझ्या मळ्यात काम करा.’

“संध्याकाळी मळ्याचा मालक मुकादमाला म्हणाला, ‘मजुरांना बोलवा आणि त्यांना त्यांची मजुरी देऊन टाका! मी ज्यांना अगदी शेवटी कामावर आणले त्यांना अगोदर मजुरी द्या. नंतर बाकीच्या सर्वांना मजुरी द्या. मी कामावर रोजगारीने पहिल्याने बोलाविलेल्यांना सर्वात शेवटी मजुरी द्या.’

“जे मजूर संध्याकाळी साधारण पाच वाजता कामावर घेतले होते ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. प्रत्येकाला एक चांदीचे नाणे मजुरी मिळाली. 10 मग ज्यांना सुरूवातीला कामावर घेण्यात आले होते, ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. त्यांना वाटत होते की, इतरांपेक्षा त्यांना जास्त पैसे मिळतील, पण त्यां सर्वांना एकच चांदीचे नाणे मजुरी मिळाली. 11 त्यांनी ते घेतले व मालकाकडे तक्रार करू लागले. 12 ते म्हणाले, ‘ज्यांना शेवटी कामावर घेतले त्यांनी केवळ एक तासच काम केले. परंतु तुम्ही त्यांना आमच्या बरोबरीने मजुरी दिली. आम्ही मात्र दिवसभर उन्हात राबलो.’

13 “परंतु मळ्याचा मालक त्यांच्यातील एकाला म्हाणाला, ‘मित्रा मी तुझ्याबाबतीत अन्याय करीत नाही. आपण यावर सहमत झालो नाही का की, मी तुला एक चांदीचे नाणे मजुरी देईन? 14 जे तुझे आहे ते घे आणि घरी जा. तुम्हांला दिली तितकीच मजुरी मला या शेवटच्या माणसाला द्यायची आहे. 15 मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’

16 “म्हणून आता जे शेवटचे आहेत ते पहिले होतील आणी पहिले ते शेवटचे होतील.”

येशू त्याच्या मरणाविषयी बोलतो

17 येशू यरूशलेमला चालला होता. तो चालत असता त्याने त्याच्या शिष्यांना बाजूला घेतले, आणि त्यांना म्हणाला, 18 “ऐका, आपण यरुशलेमकडे जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला धरून मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती धरुन देण्यात येईल. त्याने मेलेच पाहिजे असे ते म्हणतील. 19 ते मनुष्याच्या पुत्राला यहूदीतरांच्या हाती देतील. ते लोक त्याची थट्टा करतील, त्याला चाबकाने मारतील नंतर ते त्याला वधस्तंभावर खिळून जिवे मारतील. परंतु मरणानंतर तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविले जाईल.”

एका आईची खास विनंति

20 त्यानंतर जब्दीच्या मुलांची आई, आपल्या मुलांसह त्याच्याकडे आली. ती त्याच्या पाया पडली आणि तिने त्याला एक विनंति केली.

21 त्याने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”

ती म्हणाली, “माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजवीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल असे वचन द्या.”

22 येशू तिला म्हणाला, “तू काय मागत आहेस ते तुला माहीत नाही! जे दु:ख मला सोसावे लागणार आहे ते तुमच्याने सोसवेल काय?”

ते म्हणाले, होय, “आम्ही ते सोसू शकू!”

23 येशू त्याना म्हणाला, “तुम्ही खरोखर माझ्या प्याल्यातून प्याल खरे, पण माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला बसण्याचा मान, देणे हे ठरविणारा मी नाही, तर माझ्या पित्याने तो मान कोणाला द्यायचा हे ठरविले आहे.”

24 जेव्हा इतर दहा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते त्या दोघांवर रागावले. 25 मग येशूने बोलावून त्यांना म्हटले, “यहूदीतर लोकांच्या राजांना लोकांवर आपली सत्ता आहे हे दाखविणे आवडले आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना आपले अधिकार वाटेल तसे वापरणे आवडते. 26 पण तुमचे वागणे तसे नसावे. जर तुमच्यातील कोणाला मोठे व्हायचे असेल तर त्याने तुमचा दासच झाले पाहिजे. 27 आणि ज्याला पहिला व्हावयाचे आहे त्याने कनिष्ट झाले पाहिजे. 28 म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे. जो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”

येशू दोन आंधळ्यांना बरे करतो

29 ते यरीहो शहर सोडत असताना, मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला. 30 रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, “प्रभु येशू, दाविदाच्या पुत्रा. आमच्यावर दया करा.”

31 जमावाने त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. पण ते अधिकच मोठ्याने ओरडू लागले, “प्रभु, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया करा.”

32 मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला, त्याने विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”

33 त्या आंधळ्या मनुष्यांनी उत्तर दिले, “प्रभु, आम्हांला दिसावे अशी आमची इच्छा आहे.”

34 येशूला त्यांच्याबद्दल कळवळा आला, आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्याच क्षणी त्यांना दिसू लागले. आणि ते त्याच्या मागे गेले.

Footnotes:

  1. मत्तय 20:2 चांदीचे एक नाणे रोमन दिनारी, एका दिवसाची मजूरी.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes