Add parallel Print Page Options

बी पेरणाऱ्याची बोधकथा(A)

13 त्याच दिवशी येशू घराबाहेर पडून सरोवराच्या काठी जाऊन बसला. पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले, म्हणून येशू नावेत जाऊन बसला व सर्व लोकसमुदाय किनाऱ्यावर उभा राहिला. तेव्हा त्याने त्यांना गोष्टीरूपाने बोध केला. तो म्हणाला,

“एक शेतकरी बी पेरायला निघाला. तो पेरीत असता काही बी रस्त्यावर पडले, पक्षी आले व त्यांनी ते खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीवर पडले. तेथे पुरेशी माती नव्हती. तेथे बी फार झपाट्याने वाढले. पण जमीन खोलवर नव्हती, म्हणून जेव्हा सूर्य उगवाला तेव्हा रोपटे वाळून गेले. कारण त्याला खोलवर मुळे नव्हती. काही बी काटेरी झुडपावर पडले. काटेरी झुडूप वाढले आणि त्याने रोपाची वाढ खुंटविली. काही बी चांगल्या जमिनीवर पडले, ते रोप वाढले व त्याला धान्य आले. आणि कोठे शंभरपट, कोठे साठपट. कोठे तीसपट असे त्याने पीक दिले. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”

येशूने बोधकथांचा वापर का केला(B)

10 मग शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्यांनी विचारले, “तुम्ही त्यांना गोष्टीरूपाने बोध का करता?”

11 तेव्हा त्याने उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये तुम्ही समजू शकता, पण त्यांना ते समजणार नाही. 12 कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व ते त्याला पुष्कळ होईल, परंतु ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याकडून काढून घेतले जाईल. 13 म्हणून मी त्यांना गोष्टीरूपाने बोध करतो, कारण ते पाहत असताना ही त्यांना दिसत नाही आणि ऐकत असतांनाही त्यांना समजत नाही. 14 तेव्हा हे लोक दाखवून देत आहेत की, त्यांच्यासंबंधी यशयाने पूर्वी जे लिहून ठेवले ते खरे आहे. ते असे,

‘तुम्ही लक्ष द्याल,
    ऐकाल पण तुम्हांला समजणार नाही,
तुम्ही पाहाल आणि निरीक्षण कराल
    पण तुम्हांला काहीच दिसणार नाही.
15 कारण या लोकांचे अंतःकरण कठीण झाले आहे
    त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही.
त्यांनी आपले डोळे मिटले आहेत.
    यासाठी की, या लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये,
    आपल्या कानांनी ऐकू नये
आपल्या अंतःकरणाने समजू
    नये व मागे फिरू नये, आणि मी त्यांना बरे करू नये.’ (C)

16 पण तुमचे डोळे धन्य आहेत कारण ते पाहतात, तुमचे कान धन्य आहेत कारण ते ऐकातात. 17 मी तुम्हांला खरे सांगतो, तुम्ही ज्या गोष्टी पाहत आहा त्या पाहण्यासाठी अनेक संदेष्टे व नीतिमान लोक आतुरतेने वाट पाहत होते. तरी त्यांना त्या पाहता आल्या नाहीत, आणि तुम्ही ज्या गोष्टी ऐकत आहात त्या ऐकण्याची त्यांची खूप इच्छा होती तरी त्यांनी त्या ऐकल्या नाहीत.

येशू बीयांविषयी स्पष्टीकरण करतो(D)

18 “पेरणाऱ्याच्या बोधकथेचा अर्थ काय हे समजून घ्या,

19 “कोणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट (सैतान) येतो व त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते घेतो, वाटेवर पेरलेला तो हाच आहे.

20 “खडकाळ जागेवर पेरलेला तो असा आहे की, तो वचन ऐकतो व लगेच आनंदाने स्वीकारतो. 21 तरी त्याच्यामध्ये मूळ नसल्याने तो थोडा काळच टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा कोणी छळ केला, व त्रास झाला म्हणजे तो लगेच अडखळतो.

22 “आणि काटेरी झाडांमध्ये पेरलेला असा आहे की, तो वचन ऐकतो पण जगिक गोष्टीविषयीचा ओढा, संपत्तीचा मोह ही वचनाला वाढू देत नाहीत आणि तो निष्फळ होतो.

23 “चांगल्या जमिनीवर पेरलेला असा आहे की, तो वचन ऐकतो, ते समजतो व तो निश्चितपणे पीक देतो. कोणी शंभरपट, कोणी साठपट, कोणी तीसपट असे पीक देतो.”

गहू आणि निदण यांची बोधकथा

24 नंतर येशूने त्यांना दुसरी बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य हे एखाद्या मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरण्यासारखे आहे. 25 पण लोक झोपेत असता त्या मनुष्याचा शत्रू आला व गव्हामध्ये निदण पेरून गेला. 26 पण जेव्हा रोपे वाढली व दाणे आले तेव्हा निदणही दिसू लागले. 27 मग त्या माणसाचे नोकर त्याच्याकडे आले व म्हणाले, मालक आपण आपल्या शेतात चांगले बी पेरले ना? मग त्यात निदण कोठून आले?

28 “तो त्यांना म्हणाला, ‘कोणीतरी शत्रूने हे केले आहे.’

“त्याच्या नोकरांनी विचारले, ‘आम्ही जाऊन ते उपटून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय?’

29 “पण तो मनुष्य म्हणाला, ‘नको तुम्ही निदण जमा करीत असताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. 30 कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निदण जमा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा. पण गहू माझ्या गोदामात साठवा.’”

येशूच्या आणखी काही बोधकथा(E)

31 मग येशूने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने घेऊन आपल्या शेतात पेरला. 32 मोहरीचा दाणा सर्व दाण्यांहून लहान आहे. पण तो त्याचे झाड मात्र खूप मोठे येते. इतके की, आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यांवर राहतात.”

33 मग येशूने लोकांना आणखी एक दाखला सांगितला, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेतले व तीन मापे पिठामध्ये ठेवले तेव्हा ते सर्व पीठ फुगले.”

34 लोकांना बोध करण्यासाठी येशूने नेहमीच गोष्टींचा उपयोग केला. 35 ते यासाठी की, संदेष्ट्यांनी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की,

“गोष्टी सांगायला मी आपले तोंड उघडीन,
    जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलेन.” (F)

येशू बोधकथा समजावून सांगतो

36 मग येशू लोकांना सोडून घरात गेला. त्याच्याकडे त्याचे शिष्य आले आणि म्हणाले, “शेतातील निदणाची बोधकथा आम्हांला नीट समजावून सांगा.”

37 येशूने उत्तर दिले, “शेतामध्ये चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. 38 आणि शेत हे जग आहे. चांगले बी हे देवाच्या राज्यातील मुले आहेत आणि निदण हे दुष्टाचे (सैतानाचे) मुलगे आहेत. 39 हे निदण पेरणारा शत्रू हा सैतान आहे आणि कापणी या काळाची समाप्ति आहे व कापणी करणारे देवदूत आहेत.

40 “म्हणून जसे निदण गोळा करून अग्नीत टाकतात त्याप्रमाणे या काळाच्या शेवटी होईल. 41 मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व गोष्टी आणि अन्याय करणारे यांना बाजूला काढतील. 42 आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. 43 तेव्हा नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐका.

गुप्त ठेवी आणि मोती यांच्या बोधकथा

44 “स्वर्गाचे राज्य हे जणू काय शेतामध्ये लपवून ठेवलेल्या ठेवीसारखे आहे. एके दिवशी एका मनुष्याला ती ठेव सापडली. त्यामुळे त्या मनुष्याला खूप आनंद झाला. तो ती गुप्त ठेव पुन्हा त्याचा शेतात लपवून ठेवतो व आपले सर्व काही विकून ते शेत विकत घेतो.

45 “आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध घेणाऱ्या व्यापाऱ्यासारखे आहे, 46 एक दिवस त्याला एक अत्यंत सुंदर मोती सापडतो. तेव्हा तो जाऊन आपले सर्व काही विकतो आणि तो मोती विकत घेतो.

माशाच्या जाव्याविषयीची बोधकथा

47 “तसेच, स्वर्गाचे राज्य पाण्यात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे. जाळ्यात सर्व प्रकारचे मासे सापडतात. 48 ते भरल्यावर माणसांनी ते ओढून किनाऱ्यावर आणले व बसून जे चांगले ते भांड्यात भरले व जे वाईट ते फेकून दिले. 49 या काळाच्या शेवटी असेच होईल. देवदूत येतील आणि वाईटांना नितीमान लोकांतून वेगळे करतील. 50 वाईट लोकांना अग्नीत फेकून देण्यात येईल. तेथे रडणे व दात खाणे चालेल.”

51 येशूने शिष्यांना विचारले, “तुम्हांला या सर्व गोष्टी समजल्या काय?”

तेव्हा ते म्हणाले, “होय.”

52 तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक ज्याला स्वर्गाच्या राज्याविषयी शिकविण्यात आले आहे तो घरमालकासारखा आहे. त्याच्याकडे अनेक जुन्या व नव्या गोष्टी घरातील तिजोरीत ठेवलेल्या आहेत.”

येशू आपल्या गावी जातो(G)

53 येशूने लोकांना बोध करण्याचे व गोष्टी सांगून शिकविण्याचे संपवल्यानंतर तो निघून गेला. 54 त्याने आपल्या गावी येऊन त्यांच्या सभास्थानामध्ये असे शिकविले की, ते चकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व ही सामर्थ्याची कृत्ये याला कशी आली? 55 हा त्या सुताराचा मुलगा ना? याच्या आईला मरीया म्हणतात ना? आणि याकोब व योसेफ आणि शिमोन व यहूदा याचे भाऊ आहेत ना? 56 याच्या सर्व बहिणी आपल्यात आहेत ना? मग याला या सर्व गोष्टी कशा आल्या असे ते त्याच्याविषयी गोंधळात पडले.” 57 त्यांनी त्याला मानण्याचे नाकारले. पण येशू त्यांना म्हणाला, “इतर लोक संदेष्ट्याचा सन्मान करतात. पण त्याच्या स्वतःच्या गावात किंवा घरात त्याचा सन्मान होत नाही.” 58 तेथील लोकांच्या अविश्वासामुळे त्याने तेथे जास्त चमत्कार केले नाहीत.