A A A A A
Bible Book List

मत्तय 10 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

येशू त्याच्या प्रेषितांना उपदेश करायला पाठवितो

10 येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ बोलाविले, आणि त्याने त्यांना भुते घालविण्याचा अधिकार दिला. तसेच प्रत्येक आजार व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला. बारा प्रेषितांची नावे अशी आहेत.

पेत्र (ज्याला शिमोन म्हणत)

आणि त्याचा भाऊ अंद्रिया,

जब्दीचा मुलगा याकोब व

त्याचा भाऊ योहान,

फिलीप्प

व बर्थलमय,

थोमा

आणि जकातदार मत्तय,

अल्फीचा मुलगा योकोब

व तद्दय,

शिमोन कनानी व पुढे ज्याने

त्याचा विश्वासघात केला तो यहूदा इस्कार्योत.

या बाराजणांना पुढील सूचना देऊन पाठविण्यात आले. यहूदीतर लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. तर त्याऐवजी इस्राएलच्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. तुम्ही जाल तेव्हा हा संदेश जाहीर करा. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यांना बरे करा, मृतांना उठावा. कुष्ठरोग्यांना शुद्ध करा. भुते काढा, तुम्हांला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या. तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका. 10 सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे असू द्या व पायातील वहाण असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण काम करणाऱ्याच्या गरजा भागणे आवश्यक आहे.

11 “ज्या कोणत्याही नगरात किंवा खेड्यात तुम्ही जाल, तेथे कोण योग्य व्यक्ति आहे याचा शोध करा आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा. 12 त्या घरात प्रवेश करतेवेळे येथे शांति नांदो असे म्हणा. 13 जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांति तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांति तुमच्याकडे परत येईल. 14 आणि जो कोणी तुम्हांला स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका. 15 मी तुम्हांला खरे सांगतो. न्यायाच्या दिवशी त्या नगारापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल.

येशू छळाविषयी सावध करतो

16 “लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हांस पाठवीत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे सरळ स्वभावी असा. 17 माणसांविषयी सावध असा. कारण ते तुम्हांला न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानांमध्ये ते तुम्हांला फटके मारतील. 18 माझ्यामुळे ते तुम्हांला राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व यहूदीतर लोकांसमोर माझ्याविषयी सांगाल. 19 जेव्हा तुम्हांला अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. त्यावेळेला तुम्ही काय बोलायचे ते सांगितले जाईल. 20 कारण बोलाणारे तुम्ही नसून तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.

21 “भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्याला विश्र्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांविरूद्ध उठून त्यांना जिवे मारण्यास देतील. 22 माझ्यामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. पण शेवटपर्यत जो टिकेल तोच तरेल. 23 एका ठिकाणी जर तुम्हांला त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हांला खरे सांगतो मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व गावांमध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.

24 “विद्यार्थी त्याच्या शिक्षकापेक्षा वरचढ नाही, किंवा नोकर मालकाच्या वरचढ नाही. 25 विद्यार्थी आपल्या शिक्षकासारखा व नोकर आपल्या मालकासारखा होणे, इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूल म्हटले तर घरातील इतर माणसांना ते किती वाईट नावे ठेवतील!”

लोकांचे नको तर देवाचे भय बाळगा

26 “म्हणून त्यांना भिऊ नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. 27 जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला, आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छपरावरून गाजवा.

28 “जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्याला भ्या. 29 दोन चिमण्या एका पैशाला विकत नाहीत का? तरीही तुमच्या पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही. 30 आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत. 31 म्हणून घाबरु नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात.

येशूची लाज बाळगू नका

32 “जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्याला मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन. 33 पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्याला मी सुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.

लोक येशूविषयी सहमत होणार नाहीत

34 “असे समजू नका की मी पृथ्वीवर शांती करायला आलो आहे. मी शांति स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे. 35 मी फूट पाडायला आलो आहे,

‘म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध
    आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध
सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे.
36     सारांश मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे शत्रू होतील.’

37 “जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीति करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीति करतो, तो मला योग्य नाही. 38 जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही. 39 जो आपला जीव मिळवितो तो त्याला गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्याला मिळवील.

जे तुमचा आदर-सतकार करतात त्याना देव आशीर्वाद देतो

40 “जी व्यक्ति तुम्हांला स्वीकारते ती व्यक्ति मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठविले त्यालाही स्वीकारते. 41 जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्याला संदेष्ट्याचे प्रतिफल मिळेल, आणि जो धार्मिकाचा स्वीकार त्याच्या धार्मिकतेसाठी करतो, त्याला धार्मिकाचे प्रतिफळ. 42 मी तुम्हांला खरे सांगतो की, जो कोणी शिष्यांच्या नावाने या लहानातील एकाला केवळ प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes