A A A A A
Bible Book List

प्रकटीकरण 21 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

नवीन यरुशलेम

21 मग मी नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी [a] पाहिली. कारण पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही नाहीशी झाली होती. आणि कोणताही समुद्र राहिला नव्हता. पवित्र नगर यरुशलेम देवापासून खाली उतरताना मी पाहिले. ते नगर यरुशलेम, वरासाठी सजविलेल्या वधूसारखे दिसत होते.

आणि स्वर्गातील सिंहासनापासून झालेली मोठी वाणी मी ऐकली. ती वाणी म्हणाली, “आता माणसांच्या बरोबर देवाची वस्ती आहे. आणि तो त्यांच्या बरोबर राहील. आणि तो त्यांचा देव होईल. तो त्यांच्या डोळ्यांतील अश्रु पूसून टाकील. आणि येथून पुढे मरण असणार नाही. शोक करणे, रडणे आणि अथवा दु:खसहन् करणे राहणार नाही. कारण सर्व जुन्या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत.”

जो सिंहासनावर बसलेला होता, तो म्हणाला, “पाहा मी सर्व काही नवीन करीत आहे!” मग तो पुढे म्हणाला, “लिही! कारण हे शब्द विश्वास ठेवण्याला योग्य आणि खरे आहेत.”

नंतर तो मला म्हणाला, “पूर्ण झाले आहे! मी अल्फा व ओमेगा, आरंभ व शेवट आहे. जो कोणी तहानेला आहे, त्याला मी जीवनी पाण्याच्या झऱ्यातील पाणी फुकट देईन. जो विजय मिळवितो, त्याला या सर्व गोष्टी मिळतील, मी त्याचा देव होईन, व तो माझा पुत्र होईल. परंतु भित्रे, विस्वास न ठेवणारे अंमगळ, खुनी, व्यभिचारी, (म्हणजे लैंगिक अनीतीने वागणारे लोक), चेटकी, मूर्तिपूजा करणारे आणि सर्व खोटे बोलणारे अशा सर्वांना अग्नीने व गंधकाने धगधगणाऱ्या तळ्यामध्ये जागा मिळेल. हे दुसरे मरण आहे.”

मग ज्या देवदूतांच्या हातात सात पीडांनी भरलेल्या सात वाट्या होत्या. त्यांच्यापैकी एक देवदूत आला, आणि तो मला म्हणाला, “इकडे ये! जी कोकऱ्याची वधु आहे, ती मी तुला दाखवितो.” 10 मी आत्म्याने भरुन गेलो असता देवदूत मला एका उंच पर्वतावर घेऊन गेला. आणि त्याने पवित्र नगर, यरुशलेम, स्वर्गातून देवापासून खाली उतरताना मला दाखविले.

11 ते नगर देवाच्या गौरवाने झळकत होते. त्याचे तेज एखाद्या मोलवान रत्नासारखे होते; स्फटिकासारख्या चमकत असणाऱ्या यास्फे रत्नासारखे होते. 12 त्या नगराच्या सभोवती मोठमोठ्या उंच भिंती होत्या. आणि त्याला बारा वेशी होत्या. त्या बारा वेशींजवळ बारा देवदूत उभे होते. आणि त्या वेशींवर इस्राएलाच्या बारा वंशांची नावे लिहिलेली होती. 13 त्या नगरला पूर्व दिशेला तीन, उत्तर दिशेला तीन, दक्षिण दिशेला तीन आणि पश्चिम दिशेला तीन वेशी होत्या. 14 नगराच्या भिंतीना बारा पाये होते. त्या पायांवर कोकऱ्याच्या बारा प्रेषितांची नावे लिहिलेली होती.

15 नगराची, वेशीची आणि भिंतीची लांबी-रुंदी मोजता यावी म्हणून जो देवदूत माझ्याशी बोलला, त्याच्याजवळ सोन्याची एक मोजपट्टी होती. 16 नगर चौरस आकाराचे होते. त्याची लांबी व रुंदी सारखीच होती. देवदूताने सोन्याच्या मोजपट्टीने नगराचे माप मोजून पाहिले. ते पंधरा हजार मैल [b] भरले. नगराची लांबी, रुंदी व उंची समसमान होत्या. 17 नंतर देवदूताने नगराच्या भिंतीचे माप घेतले. ते मनुष्याच्या हाताने 72 मीटर (216 फूट) [c] भरले. देवदूताच्या हाताने देखील माप तेवढेच भरले. 18 नगराच्या भिंती यास्फे रत्नाच्या होत्या. आणि नगर शुद्ध सोन्याचे, चमकाणाऱ्या काचेसारखे होते.

19 नगराचे पाये प्रत्येक प्रकारच्या मोलवान अशा रत्नांनी सजविले होते. पाहिला पाया यास्फे रत्नाचा होता. दुसरा नीळ, तिसरा शिवधातु, चौथा पाचू (पाच), 20 पाचवा गोमेद, सहावा सार्दी, सातवा लसणा, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकिंथ, बारावा पदमाराग रत्नाचा होता. 21 बारा वेशी बारा मोत्यांनी बनविल्या होत्या. आणि प्रत्येक वेस एकाएका रत्नाची होती. नगरातील रस्ता शुद्ध सोन्याचा, काचेसारखा स्पष्ट होता.

22 त्य नगरात मला कोठेही मंदीर दिसले नाही; 23 प्रभु देवाचे जे तेज ते अखिल नगराला उजेड पुरवीत होते, आणि कोकरा हा त्याचा दिवा आहे. 24 राष्ट्रे त्या दिव्याच्या प्रकाशात चालतील. आणि जगातील राजे आपले वैभव त्या नगराकडे आणतील. 25 त्या नगराच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत आणि तेथे कधीही रात्र असणार नाही. 26 राष्टांचे वैभव आणि संपत्ती त्या नगरात आणण्यात येतील. 27 जे अशुद्ध आहे, ते त्या नगरात प्रवेश करु शकणार नाही. अथवा लाजिरवाणे काम अगर लबाडी करणाऱ्याचा शिरकाव त्या नगरात होणार नाही. कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्या लोकांची नावे नोंदविली आहेत, केवळ तेच लोक त्या नगरात जाऊ शकतील.

Footnotes:

  1. प्रकटीकरण 21:1 नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी यशया 65:17; 66:22 2 पेत्र 3:13
  2. प्रकटीकरण 21:16 मैल मुळात बारा हजार स्टेडिया.
  3. प्रकटीकरण 21:17 मीटर मुळात 144 क्युबिट.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes