A A A A A
Bible Book List

नीतिसूत्रे 14 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

14 शहाणी स्त्री तिच्या शहाणपणाचा उपयोग तिचे घर जसे असायला हवे तसे करण्यासाठी करते. पण मूर्ख बाई तिच्या मूर्खपणामुळे घराचा सत्यानाश करते.

जो माणूस योग्य रीतीने जगतो तो परमेश्वराला मान देतो. पण जो माणूस इमानदार नसतो तो परमेश्वराचा तिरस्कार करतो.

मूर्ख व गर्विष्ठ माणसाचे शब्द त्याच्यावर संकटे आणतात. पण शहाण्या माणसाचे शब्द त्याला वाचवतात.

जर काम करायला गायी नसल्या तर धान्याचे कोठार रिकामे राहील. लोक गायीच्या शक्तीचा उपयोग चांगले पीक काढण्यासाठी करुन घेऊ शकतात.

सत्यवादी माणूस खोटे बोलत नाही. तो चांगला साक्षीदार असतो. पण ज्या माणसावर विश्वास टाकणे शक्य नसते तो कधीच खरे सांगत नाही. तो वाईट साक्षीदार असतो.

जे लोक देवाची थट्टा करतात ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते कधीच मिळत नाही. ज्यांचा देवावर विश्वास आहे ते खरोखर शहाणे आहेत. त्यांच्याजवळ ज्ञान सहजपणे येते.

मूर्खाशी मैत्री करु नका. तो तुम्हाला काहीही शिकवू शकणार नाही.

हुशार लोक शहाणे असतात. कारण ते ज्या गोष्टी करतात त्याचा काळजीपूर्वक विचार करतात. पण मूर्ख लोक मूर्ख असतात कारण आपण दुसऱ्यांना फसवून जगू शकतो असे त्यांना वाटत असते.

मूर्ख माणूस त्याने केलेल्या वाईट गोष्टींसाठी किंमत मोजण्याच्या कल्पनेला हसतो. पण चांगले लोक त्यासाठी क्षमा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात.

10 जर एखादा माणूस दु:खी असला तर फक्त त्यालाच ते दु:ख जाणवत असते. त्याचप्रमाणे जर माणूस आनंदी असला तर तो आनंद जाणवू शकेल असा तो एकटाच असतो.

11 वाईट माणसाच्या घराचा नाश होईल. पण चांगल्या माणसाचे घर सदैव राहील.

12 लोकांना वाटत असते हाच मार्ग बरोबर आहे. पण तो मार्ग फक्त मरणाकडे नेतो.

13 माणूस जरी हसत असला तरी तो मनातून दु:खी असू शकतो. आणि हसल्यावरही खिन्नता तिथे तशीच राहाते.

14 दुष्ट माणसांना त्यांनी केलेल्या चुकांबद्दल पूर्ण किंमत मोजावी लागेल. आणि चांगल्या माणसांना चांगल्या कृत्यांबद्दल बक्षीस मिळेल.

15 मूर्ख जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवतो. पण शहाणा माणूस प्रत्येक गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करतो.

16 शहाणा माणूस परमेश्वराचा आदर करतो आणि वाईटापासून दूर राहतो. पण मूर्ख विचार न करता गोष्टी करतो. तो लक्षपूर्वक गोष्टी करत नाही.

17 जो माणूस चटकन् रागावतो तो मूर्खासारख्या गोष्टी करतो. शहाणा मनुष्य सहनशील असतो.

18 मूर्खांना त्यांच्या मूर्खपणाबद्दल शिक्षा होते. पण शहाण्यांना ज्ञानाचा लाभ होतो.

19 चांगले लोक वाईटांबरोबर लढताना जिंकतील, वाईटांना त्यांच्यापुढे नतमस्तक होणे भाग पडेल.

20 गरीबाला मित्र नसतात, शेजारीही नसतो. पण श्रीमंताला खूप मित्र असतात.

21 जो शेजाऱ्याला पाण्यात पहातो, तो पाप करतो. जर सुखी व्हायचे असेल तर त्या गरीबांशी दयाळू राहा.

22 जो दुष्ट गोष्टींच्या योजना आखतो तो चूक करतो. पण जो चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याजवळ प्रेम करणारे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे मित्र असतात.

23 जर तुम्ही कष्ट केलेत तर तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी तुमच्या जवळ असतील. पण जर तुम्ही काही न करता फक्त बोलतच राहिलात तर तुम्ही गरीबच राहाल.

24 शहाण्यांना संपत्तीचे बक्षीस मिळते. पण मूर्खांना मूर्खपणाचे बक्षीस मिळते.

25 जो माणूस खरे सांगतो तो इतरांना मदत करतो. जो खोटे बोलतो तो इतरांना दु:ख देतो.

26 जो परमेश्वराचा आदर करतो तो सुरक्षित असतो आणि त्याची मुलेही सुरक्षितपणे जगतात.

27 परमेश्वराबद्दलची आदर युक्त भीती खरे जीवन देते. त्यामुळे माणूस मरणाच्या जाळ्यातून वाचतो.

28 जर राजा खूप लोकांवर राज्य करत असला तर तो महान असतो. पण जर तिथे लोकच नसले तर त्या राजाची काहीच किंमत नसते.

29 सहनशील माणूस खूप हुशार असतो. ज्या माणसाला चटकन् राग येतो तो आपण मूर्ख आहोत, हे सिध्द् करतो.

30 जर एखाद्याच्या मनात शांती असली तर त्याचे शरीर निरोगी असते. पण मत्सर त्याच्या शरीरात आजार निर्माण करतो.

31 जो माणूस गरीबांवर संकटे आणतो तो आपण देवाचा आदर करीत नाही हे दाखवतो. देवानेच दोघांनाही निर्माण केले आहे. पण जर एखादा गरीबांशी कनवाळूपणे वागला तर तो देवाचा आदर करतो हे दिसून येते.

32 संकटाच्यावेळी दुष्ट माणसाचा पराभव होतो. पण चांगली माणसे मरणाच्या दारातही विजयी होतात.

33 शहाणा माणूस नेहमी शहाण्या गोष्टींचा विचार करतो. पण मूर्खाला शहाणपणाबद्दल काहीही माहिती नसते.

34 चांगुलपणा देशाला महान बनवतो. पण पाप कुठल्याही लोकांना लाज आणते.

35 राजाजवळ जेव्हा शहाणे नेते असतात तेव्हा राजा आनंदी असतो. पण मूर्ख नेत्यांवर राजा रागावतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes