A A A A A
Bible Book List

निर्गम 9 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

शेती-पशूमध्ये मरीची पीडा

नंतर परमेश्वराने मोशेला फारोकडे जाऊन असे बोलाण्यास सांगितले, “इस्राएलांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे!’ तू जर त्यांना जाण्यापासून सतत असाच अडवीत राहशील व त्यांना जाऊ देणार नाहीस. तर शेतावरील पशूंविरुद्ध परमेश्वर आपल्या सामर्थ्याचा वापर करील. परमेश्वर तुझे घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरे यांना भयंकर आजाराने त्रस्त करील. परंतु तो इस्राएल लोकांच्या व मिसरच्या लोकांच्या पशूत भेद करील; इस्राएल लोकांच्या पशूपैकी एकही पशू मरणार नाही. याकरिता परमेश्वराने वेळही नेमलेली आहे. ह्या देशात उद्या हे सर्व घडून येईल.”

दुसऱ्या दिवशी सकाळी मिसरमधील शेतीवरील सर्व पशू मेले. परंतु इस्राएल लोकांच्या मालकीच्या पशूंपैकी एकही मेला नाही. इस्राएल लोकांच्या पशूपैकी एखादा मेला काय हे पाहण्यासाठी फारोने माणसे पाठवली. परंतु त्यांच्या पशूंपैकी एकही मेला नाही. तरीपण फारो हट्ट व कठीण मनाचाच राहिला. त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.

गळवांची पीडा

नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, “मोशेने ओंजळभर भट्टीची राख घेऊन फारो देखत आकाशाकडे उधळावी. त्या राखेचा धुराळा बनेल व तो सगळ्या मिसरभर पसरेल आणि त्याच्या स्पर्शाने माणसांना व गुरांना फोड येऊन गळवे होतील.”

10 तेव्हा मोशे व अहरोन यांनी भट्टीतून राख घेतली व ते फारो राजासमोर उभे राहिले. मोशेने ती राख हवेत उधळली आणि त्यामुळे माणसांना व जनावरांना फोड व गळवे येऊ लागली. 11 जादूगार मोशेला तसे करण्यापासून अडवू शकले नाहीत कारण त्यांनाही गळवे आली होती. सर्व मिसरभर ही गळवे आली. 12 परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही, व लोकांना जाऊ दिले नाही. परमेश्वराने पूर्वीच सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले.

गारांची पीडा

13 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू सकाळी उठ व फारोकडे जा; आणि त्याला सांग की इस्राएल लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे! 14 तू हे केले नाहीस तर मग मी माझे सारे सामर्थ्य तुझ्याविरुद्ध तुझे सेवक व तुझ्या लोकांच्याविरुद्ध वापरीन. तेव्हा मग तुला माहीत होईल की या जगात माझ्यासारखा दुसरा देव नाही. 15 मी माझे सगळे सामर्थ्य वापरून असा आजार तुम्हावर पाठवू शकतो की त्यामुळे तू व तुझी प्रजा या पृथ्वीवरून नष्ट व्हाल. 16 परंतु मी तुला एका हेतूने ठेवले आहे की मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे. मग सर्व जगाला मी कोण आहे हे कळेल. 17 तू अजूनही माझ्या लोकांविरुद्ध आहेस. तू त्यांना अजूनही मोकळे करून जाऊ देत नाहीस. 18 म्हणून उद्या ह्याच वेळेस मी गारांचा असा काही वाईट वादळी वर्षाव मिसरवर आणीन की असा गारांचा वादळी वर्षाव मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून कधी आला नाही. 19 तेव्हा आता तू तुझी गुरेढोरे सुरक्षित जागी ठेवलीच पाहिजेस; शेतात तुझ्या मालकीचे काही असल्यास ते सुरक्षित जागी ठेवलेच पाहिजेस, कारण जर एखादा माणूस किंवा पशू शेतात राहील तर तो मारला जाईल. जे जे तुम्ही तुमच्या घरात गोळा करून ठेवणार नाही त्यांवर गारांचा भडीमार पडेल.’”

20 फारोच्या सेवकापैकी काहींनी परमेश्वराच्या संदेशाचा मान ठेवून लगेच आपली गुरेढोरे व गुलाम यांना आसऱ्याला घरी आणले व सुरक्षित जागी ठेवले. 21 परंतु इतर सेवकांनी परमेश्वराच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे रानांतील त्यांचे सर्व दास व गुरेढोरे, शेरडेमेंढरे मरून गेली.

22 परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपले हात आकाशाकडे उगार आणि मग सर्व मिसरभर गारांच्या वर्षावाला सुरवात होईल. गारांचा मारा सर्व लोकांवर, गुराढोरांवर आणि मिसर देशातील सर्व शेतांवर होईल.”

23 तेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली आणि मग परमेश्वराने मेघगर्जना, लखलखणाऱ्या विजा व गारा यांचा पृथ्वीवर वर्षाव केला. अशा प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर भडीमार केला. 24 गारांचा मारा व त्यासोबत विजांच्या अग्नीचा लोळ जमिनीवर आला. मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून गारांचे असे भयंकर व वाईट वादळ मिसरवर कधी आले नव्हते. 25 त्या गारांच्या वादळाच्या माऱ्याने मिसरमधील शेतात जे होते ते सर्व नष्ट केले. तसेच माणसे, जनावरे व झाडे झुडपे नष्ट केली; आणि मोठमोठी झाडे मोडून पडली. 26 गारांच्या वर्षावाच्या तडाख्यापासून वाचलेला भाग एकच आणि तो म्हणजे इस्राएली लोक राहात असलेला गोशेन प्रांत; तेथे गारांचा वर्षाव झाला नाही.

27 फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “ह्यावेळी मी पाप केले आहे. परमेश्वराचे खरे आहे; मी व माझे लोक, आम्ही चुकलो आहोत. 28 हा देवाकडून झालेला गारांचा मारा व मेघांचा गडगडाट फार भयंकर झाला! हे वादळ थांबविण्यास देवाकडे विनंती करा आणि मग मी तुम्हाला जाऊ देतो.”

29 मोशेने फारोला सांगितले, “जेव्हा मी हे शहर सोडून जाईन तेव्हा माझे हात पसरून मी परमेश्वरापुढे विनंती करीन आणि मग ही मेघगर्जना व हा गारांचा मारा थांबेल; तेव्हा तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे. 30 परंतु तू व तुझे सेवक अजूनही परमेश्वराचे भय बाळगीत नाहीत हे मला माहीत आहे.”

31 यावेळी सातूचे दाणे तयार होऊन तो कापणीला आला होता व जवसाला बोंडे आली होती. ह्या पिकांचा आता नाश झाला. 32 परंतु साधा गहू व जर्मन गहू इतर धान्यापेक्षा उशीरा पिकतात; त्याची उशीरा पेरणी झाल्यामुळे ते अजून उगवले नव्हते, म्हणून त्यांचा नाश झाला नाही.

33 मोशे फारोपुढून निघून नगराबाहेर गेला. त्याने परमेश्वराकडे हात पसरून प्रार्थना केली. आणि मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला आणि पृथ्वीवर पाऊस पडणे बंद झाले.

34 पाऊस, गारा व मेघांचा गडगडाट बंद झाल्याचे फारोने पाहिले तेव्हा फारो व त्याचे सेवक यांनी मन पुन्हा कठोर केले. 35 फारोने आपण दिलेल्या वचनाप्रमाणे करण्याचे नाकारले व इस्राएल लोकांना मोकळे करून त्याने जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेद्वारे सांगितल्याप्रमाणे हे झाले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes