Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

देव आणि इस्राएल लोक यांचा करार

24 देवाने मोशेला सांगितले, “तू, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर येऊन दुरुनच माझी उपासना करा; मग मोशे एकटाच परमेश्वरा जवळ येईल; इतरांनी परमेश्वराजवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर पर्वत चढून वरही येऊ नये.”

मोशेने लोकांना परमेश्वराचे सर्व नियम व आज्ञा सांगितल्या; मग सर्व लोक एकमुखाने म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेल्या सर्व आज्ञा आम्ही पाळू.”

तेव्हा मोशेने सर्व आज्ञा लिहून काढल्या दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व त्याने इस्राएलच्या बारा वंशासाठी, प्रत्येक वंशास एक याप्रमाणे बारा दगड तेथे रोवून स्तंभ उभे केले. मग मोशेने काही तरुणांना यज्ञार्पणे वाहाण्यासाठी पाठवले व त्यांनी परमेश्वराला बैलांची होमार्पणे व शांत्यार्पणे वाहिली.

मोशेने त्या अर्पणातून अर्धे रक्त राखून काही भांड्यात ठेवले आणि दुसरे अर्धे रक्त त्याने वेदीवर ओतले.

मग मोशेने गुंडाळी पत्रात लिहिलेला विशेष करार सर्वानी ऐकावा म्हणून वाचून दाखविला आणि मग लोक म्हणाले, “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा आम्ही ऐकल्या आहेत; त्या आम्ही पाळू असे आम्ही कबूल करतो.”

मग मोशेने भांड्यांतील अर्पणाचे रक्त लोकावर शिंपडले, तो म्हणाला, “परमेश्वराने तुमच्याशी विशेष करार केला आहे असे हे रक्त दर्शीविते; त्याचे स्पष्टीकरण देवाने दिलेल्या नियमांमध्ये आहे.”

नंतर मोशे, अहरोन, नादाब, अबीहू व इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर चढून गेले. 10 तेथे त्यांनी इस्राएलच्या देवाला पाहिले; नीलमण्यांच्या चौथऱ्यासारखे तेथे काही होते, ते आकाशाप्रमाणे स्वच्छ व निळेभोर होते त्यावर देव उभा होता! 11 इस्राएल मधील सगव्व्या वडिलधाऱ्या माणसांनी देवाला पाहिले परंतु त्याने त्यांचा नाश केला नाही. [a] मग त्यांनी तेथे एकत्र खाणेपिणे केले.

देवाचे नियम आणण्याकरता मोशे जातो

12 परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वतावर मला भेटावयास ये; मी दोन दगडी पाट्यांवर इस्राएल लोकांसाठी नियम व आज्ञा लिहिलेल्या आहेत; त्या मी तुला देतो.”

13 तेव्हा मोशे व त्याचा मदतनीस यहोशवा देवाच्या पर्वतावर चढून गेले. 14 मोशे इस्राएलच्या वडीलधाऱ्या माणसांना म्हणाला, “तुम्ही येथे आम्हासाठी थांबा, मी परत येईपर्यत अहरोन व हूर हे तुम्हावर अधिकारी म्हणून राहतील; कोणाचे काही प्रकरण असेल तर त्याने त्यांच्याकडे जावे.”

मोशे देवाला भेटतो

15 मग मोशे पर्वतावर चढून गेला आणि ढगाने पर्वत झाकून टाकला; 16 परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर उतरले; ढगाने सहा दिवस पर्वताला झाकून टाकले; सातव्या दिवशी परमेश्वर मोशेबरोबर ढगातून बोलला. 17 इस्राएल लोकांनी पर्वतावर परमेश्वराचे तेज पाहिले; ते पर्वताच्या शिखरावर भस्म करणाऱ्या धगधगत्या अग्नीसारखे होते.

18 मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.

Notas al pie

  1. निर्गम 24:11 नाश केला नाही देवाला कोणी मानवप्राणी पाहू शकत नाही. असे बायबल म्हणजे देवाचे वचन सांगते; परंतु आपले स्वरुप कसे आहे हे लोकांना समजावे यासाठी देवाने लोकांना त्याच्या या विशेष स्वरुपता पाहू दिले.