A A A A A
Bible Book List

निर्गम 18 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

मोशेचा सासरा सल्ला देतो

18 मोशेचा सासरा इथ्रो, मिद्यानाचा याजक होता. मोशे व इस्राएल लोक यांना देवाने अनेक मार्गानी मदत केली तसेच त्यांना त्याने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी इथ्रोने ऐकले; तेव्हा तो देवाच्या पर्वताजवळ म्हणजे होरेब किंवा सीनाय पर्वताजवळ, जेथे मोशेने तळ दिला होता तेथे मोशेला भेटावयास गेला इथ्रोने मोशेची बायको सिप्पोरा हिलाही बरोबर आणले; (सिप्पोरा मोशे बरोबर नव्हती कारण त्याने तिला माहेरी पाठवले होते.) इथ्रोने मोशेच्या दोन मुलांनाही बरोबर आणले. पहिल्या मुलाचे नांव गेर्षोम होते कारण त्याचा जन्म झाला त्यावेळी मोशे म्हणाला होता, “मी या देशात परका आहे.” दुसऱ्या मुलाचे नांव एलीएजर असे होते, कारण तो जन्मला तेव्हा मोशे म्हणाला होता, “माझ्या वडिलांचा देव याने मला मदत केली व मला मिसरच्या राजाच्या हातातून वाचविले.” तेव्हा इथ्रो रानात देवाच्या पर्वताजवळ म्हणजे सीनाय पर्वताजवळ जेथे मोशेने तळ दिला होता तेथे मोशेची बायको सिप्पोरा व त्याची दोन मुले यांना बरोबर घेऊन गेला.

इथ्रो ने मोशेला निरोप पाठवला, “मी तुझा सासरा, इथ्रो, तुझी बायको व तिची दोन मुले यांना घेऊन तुझ्याकडे आलो आहे.”

तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला भेटावयास सामोरा गेला; त्याने त्याच्यापुढे लवून त्याला नमन केले, आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारली. नंतर ते अधिक बोलणे करावयास मोशेच्या तंबूत गेले. परमेश्वराने इस्राएली लोकांसाठी जे जे केले ते सर्व मोशेने इथ्रोस सांगितले. मिसर देशाचा राजा फारो व त्याचे लोक ह्यांचे परमेश्वराने काय केले तसेच मिसरहून प्रवास करताना काय काय संकटे आली व कसा त्रास झाला आणि परमेश्वराने त्या सर्वांतून दरवेळी इस्राएल लोकांना कसे वाचवले ती सर्व हकीकत मोशेने इथ्रोस सांगितली.

परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या ऐकल्यावर आणि मिसरच्या लोकांपासून परमेश्वराने इस्राएल लोकांना स्वतंत्र केले म्हणून इथ्रोला फार आनंद झाला. 10 तो म्हणाला,

“परमेश्वराची स्तुती असो
    कारण त्याने फारोच्या तावडीतून
    व मिसरच्या लोकांपासून तुम्हाला स्वतंत्र केले आहे.
11 परमेश्वर सर्व देवांहून महान आहे
हे आता मला कळाले, कारण इस्राएल लोकापेक्षा स्वतःला चांगले मानीत असलेल्या इतर लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.”

12 मग इथ्रोने देवाला यज्ञ व अर्पणे केली. नंतर अहरोन व इस्राएल लोकांमधील वडीलधारी माणसे म्हणजे पुढारी देवाची विशेष उपासना करावी म्हणून मोशेचा सासरा इथ्रो याच्याबरोबर जेवावयास आले.

13 दुसऱ्या दिवशी मोशेला लोकांचा न्यायनिवाडा करण्याचे विशेष काम होते. लोक खूप असल्यामुळे त्यांना दिवसभर मोशेसमोर उभे रहावे लागले.

14 मोशेला इस्राएल लोकांचा न्यायनिवाडा करताना इथ्रोने पाहिले तेव्हा त्याने त्याला विचारले, “तू असे का करीत आहेस? तू एकटाच न्यायनिवाडा का करीत आहेस? आणि लोक न्यायनिवाड्यासाठी दिवसभर तुझ्याकडे का येतात?”

15 मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, “आपल्या अडचणी व आपले प्रश्न या संबंधी देवाचा काय निर्णय आहे ते विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात. 16 लोकांचा काही भांडणतंटा असेल तर ते माझ्याकडे येतात तेव्हा कोणत्या माणसाचे म्हणणे खरे आहे हे मी ठरवितो. ह्याप्रमाणे मी लोकांना देवाचे नियम व विधी यांचे शिक्षण देतो.”

17 परंतु मोशेचा सासरा त्याला म्हणाला, “हे तू करतोस ते चांगले नाही. 18 तुझ्या एकट्यासाठी हे काम फार आहे त्यामुळे तू थकून जातोस व लोकही थकून जातात हे काम तुला एकट्याला करवणार नाही. 19 तू लोकांची गाऱ्हाणी ऐकत असावेस व त्याचबरोबर त्यांसंबंधी देवाकडे बोलतही रहावेस असा मी तुला सल्ला देतो, त्यात देव तुझ्याबरोबर असो अशी मी प्रार्थना करतो. 20 तू लोकांना देवाचे नियम व विधी या संबंधी शिक्षण दे; आणि ते त्यांनी मोडू नयेत अशी ताकीद त्यांना दे; लोकांनी आपल्या जीवनात योग्य मार्गाने चालावे व त्यासाठी त्यांनी काय करावे याविषयी त्यांना तू समजावून सांग.

21 “तू लोकांमधून कर्तबगार देवाला भिणारे, व विश्वासू, पैसे खाऊन आपला निकाल बदलून अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकावर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम. 22 ह्या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरिता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु साध्या प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वतः निर्णय द्यावेत. अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील. 23 तू असे करशील व परमेश्वराची तशी इच्छा असेल तर तुझे काम करीत राहणे तुला शक्य होईल, आणि त्याचवेळी लोकांचे प्रश्न सुटून ते घरी जाऊ शकतील.”

24 तेव्हा मोशेने इथ्रोच्या म्हणण्याप्रमाणे केले. 25 त्याने इस्राएल लोकांतून चांगले लोक निवडले आणि त्यांना हजार हजार, शंभर शंभर पन्नास पन्नास व दहादहावर नायक म्हणून नेमले. 26 ते लोकांवर न्यायाधीश झाले. लोक सतत नायकाकडे आपली गाऱ्हाणी आणू लागले व मोशेला फार महत्वाच्या प्रकणांबद्दलच निकाल देण्याचे काम करावे लागे.

27 मग थोड्याच दिवसांनी मोशेने आपला सासरा इथ्रो याला निरोप दिला आणि इथ्रो माघारी आपल्या घरी गेला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes