A A A A A
Bible Book List

नहेम्या 2 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

राजा अर्तहशश्त नहेम्याला यरुशलेमला पाठवतो

राजा अर्तहशश्तच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात राजासमोर द्राक्षारस आणला गेला. मी तो उचलला आणि राजाला दिला. या पूर्वी मी कधी राजाच्या सहवासात असताना उदास नव्हतो पण यावेळी मात्र कष्टी होतो. म्हणून राजाने मला विचारले, “तुला बरे वाटत नाही का? तू असा खिन्न का दिसतोस? तू मनातून दु:खी दिसतोस.”

तेव्हा मी फार घाबरलो. पण, भ्यायलेला असूनही मी राजाला म्हणालो, “राजा चिरायू होवो! माझ्या पूर्वजांचे जिथे दफन झाले आहे ते नगर उद्ध्वस्त झाले आहे. म्हणून मी दु:खी आहे. नगराच्या वेशीसुध्दा आगीत जळून गेल्या आहेत.”

यावर राजा मला म्हणाला, “तुझ्यासाठी मी काय करावे असे तुला वाटते?”

उत्तर देण्यापूर्वी मी स्वर्गातील देवाची प्रार्थना केली. मग मी राजाला म्हणालो, “राजाची मर्जी असेल आणि मी तुमच्याशी भलेपणाने वागलो असेन तर कृपया मला माझ्या पूर्वजांचे जिथे दफन झाले आहे त्या यहुदातील यरुशलेम नगराला पाठवावे. तिथे जाऊन नगराची पुन्हा उभारणी करण्याची माझी इच्छा आहे.”

राणी राजाजवळच बसली होती. त्या दोघांनी मला विचारले, “तुला या कामासाठी जाऊन यायला किती दिवस लागतील? तू परत केव्हा येशील?”

राजा मला जाऊ द्यायला आनंदाने तयार झाला म्हणून मी ही त्याला विशिष्ट मुदत सांगितली. मी पुढे राजाला असेही म्हणालो, “राजाची माझ्यावर मेहेरनजर असेल तर माझी आणखी एक विनंती आहे. फरात नदीच्या पश्चिमेकडील अधिकाऱ्यांसाठी काही पत्रे मला द्यावीत. म्हणजे ती त्यांना दाखवल्यावर यहुदाच्या वाटेवर त्यांच्या हद्दीतून सुखरुप जायला ते मला परवानगी देतील. शिवाय दरवाजे, भिंती, प्रार्थनामंदिराच्या भोवतालच्या भिंती आणि माझे घर यांच्यासाठी मला मजबूत लाकूड लागणार आहे. त्यासाठी राजाचा वनाधिकारी आसाफ याला द्यायला मला पत्र द्यावे.”

राजाने मला तशी पत्रे आणि मी मागितले ते सर्व काही दिले. देवाची माझ्यावर कृपा असल्यामुळे राजाने हे दिले.

मग मी फरात नदीच्या पश्चिमेकडे असलेल्या, प्रदेशाच्या अधिकाऱ्यांकडे गेलो. त्यांना राजाने दिलेली पत्रे दिली. राजाने माझ्यासोबत सैन्यातले अधिकारी आणि घोडेस्वारही पाठवले होते. 10 सनबल्लट आणि तोबीया यांना माझा बेत ऐकून माहीत होता. इस्राएलींच्या मदतीसाठी कोणी एक जण आला आहे याने ते नाराज झाले व रागावले. सनबल्लट होरोन या गावचा होता आणि तोबीया अम्मोनी आधिकारी होता.

नहेम्या यरुशलेमच्या तटबंदीची पाहणी करतो

11-12 मी यरुशलेमला गेलो आणि तीन दिवस राहिलो. मग रात्री काहीजणांना घेऊन बाहेर पडलो. यरुशलेमसाठी काही करण्याचा जो विचार देवाने माझ्या मनात जागवला होता त्याबद्दल मी कोणाशी काही बोललो नव्हतो. मी ज्या घोड्यावर बसलो होतो तो वगळता आणखी घोडे माझ्याबरोबर नव्हते. 13 अंधार असतानाच खोऱ्याच्या वेशीतून मी बाहेर पडलो.मकरकूप विहिर आणी राखेच्या ढिगाची वेस यांच्या दिशेने मी कूच केले. यरुशलेमची मोडलेली तटबंदीची भिंत आणि त्यातील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली प्रवेशद्वारे यांची पहाणी केली. 14 मग कारंजाचे प्रवेशद्वार आणि राजाचा तलाव यांच्याकडे गेलो. पण माझा घोडा पलीकडे जाऊ शकेल इतकीही जागा नसल्याचे जवळ गेल्यावर माझ्या लक्षात आले. 15 तेव्हा मी अंधारातच भिंतीची बारकाईने तपासणी करत खोऱ्यातून वरती गेलो,शेवटी मी मागे वळलो आणि परतून खोऱ्याच्या वेशीतून आत शिरलो. 16 इस्राएली अधिकारी आणि महजन यांना माझा ठावठिकाणा माहीत नव्हता. माझे काय चालले आहे ते त्यांना माहीत नव्हते. यहुदी, याजक, राजाचे कुटुंबीय, अधिकारी आणि जे बांधकामाचे काम करणार होते यांच्यापैकी कोणालाही मी काही बोललो नव्हतो.

17 मग मी या सगळयांना म्हणालो, “इथे आपल्याला काय त्रास आहे तो तुम्ही पाहातच आहात. यरुशलेम उजाड आणि उद्ध्वस्त झाले आहे. त्याच्या वेशी आगीत जळून गेल्या आहेत. चला, आता आपण यरुशलेमची तटबंदी पुन्हा बांधू या. म्हणजे आपली आणखी अप्रतिष्ठा होणार नाही.”

18 देवाची माझ्यावर कृपा असल्याचेही मी त्यांना सांगितले. राजा माझ्याशी काय बोलला ते मी त्यांना सांगितले. तेव्हा ते लोक म्हणाले, “आपण आत्ताच कामाला लागू या!” म्हणून आम्ही या सत्कार्याला सुरुवात केली. 19 पण आम्ही पुन्हा बांधकाम करत असल्याची खबर होरोनचा सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीया आणि अरबी गेशेम यांना लागली. त्यांनी अगदी नीच पातळीवर जाऊन आमचा उपहास केला. ते म्हणाले, “हे काय करताय तुम्ही? राजाविरुध्द बंड करणार आहात का?”

20 पण मी त्यांना असे म्हणालो: “स्वर्गातील देवच आम्हाला यश देईल. आम्ही देवाचे सेवक असून आम्ही हे नगर पुन्हा उभारू. या कामात तुम्ही काही मदत करु शकणार नाही. तुमच्या कुटुंबातील कोणीही यरुशलेममध्ये राहिलेले नाही. तुमच्या मालकीची जमीन येथे नाही. या जागेत असायचा तुम्हाला काही अधिकार नाही.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes