A A A A A
Bible Book List

नहेम्या 13 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

नहेम्याच्या अखेरच्या आज्ञा

13 त्यादिवशी मोशेचे पुस्तक सर्व लोकांना ऐकू जाईल अशाप्रकारे मोठ्याने वाचले गेले. त्या पुस्तकात त्यांना हा नियम लिहिलेला आढळला: कोणत्याही अम्मोनी आणि मवाबी व्यक्तीला देवाच्या लोकांमध्ये कधीही मिसळता येणार नाही. या लोकांनी इस्राएली लोकांना अन्न आणि पाणी दिले नव्हते म्हणून हा नियम लिहिला गेला. शिवाय बलामने इस्राएलींना शाप द्यावा म्हणून या लोकांनी त्याला पैसेही देले होते. पण आपल्या देवाने त्या शापाचे आशीर्वादात रूपांतर केले. त्यामुळे इस्राएलींनी जेव्हा हा नियम ऐकला तेव्हा त्यांनी त्याचे पालन केले. या परकी लोकांच्या प्रजेपासून ते वेगळे झाले.

4-5 पण हे होण्यापूर्वीच एल्याशीबने तोबीयाला मंदिरात एक खोली दिली होती. एल्याशीब हा याजक देवाच्या मंदिरातील कोठाराचा रक्षक होता. आणि तो तोबीयाचा जिवलग मित्र होता. ही खोली धान्यार्पणे, धूप, मंदिरातील पात्रे व इतर वस्तू ठेवण्यासाठी वापरली जात असे. तिथले लेवी, गायक व द्वारपाल यांना लागणारा धान्याचा एकदशांश भाग, नवीन द्राक्षरस, आणि तेल या गोष्टीही तेथे ठेवल्या जात तरीही एल्याशीबने ती खोली तोबीयाला दिली.

हे सर्व होत होते तेव्हा मी यरुशलेममध्ये नव्हतो. बाबेलच्या राजाकडे मी परत गेलो होतो. बाबेलचा राजा अर्तहशश्त कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी बाबेलला गेलो होतो. नंतर मी राजाकडे यरुशलेमला परत जायची परवानगी मागितली. आणि मी यरुशलेमला परतलो. एल्याशीबच्या वर्तनाची ही दु:खद बातमी मी यरुशलेममध्ये ऐकली. आपल्या देवाच्या मंदिरात एल्याशीबने तोबीयाला खोली दिलेली होती. एल्याशीबच्या या वर्तनाने मी अतिशय क्रुध्द झालो. तोबीयाचे सगळे सामान मी खोलीबाहेर फेकून दिले. त्या खोल्या शुध्द आणि स्वच्छ करून घ्यायची मी आज्ञा दिली. मग मंदिरातील पात्रे, वस्तू, धान्यार्पणे, धूप वगैरे मी पूर्ववत तिथे ठेवले.

10 लोकांनी लेव्यांना त्यांचा वाटा दिलेला नाही हे ही माझ्या कानावर आले. त्यामुळे लेवी आणि गायक आपापल्या शेतांवर कामाला गेले होते. 11 म्हणून मी आधिकाऱ्यांना सांगितले की त्यांचे चुकले. मी त्यांना विचारले, “तुम्ही देवाच्या मंदिराची देखभाल का केली नाही?” मग मी सर्व लेव्यांना बोलवून घेतले. मंदिरातील आपापल्या जागी आपापल्या कामावर जायला त्यांना सांगितले. 12 त्यानंतर यहुदातील सर्व लोकांनी पिकाचा एकदशांश वाटा, नवीन द्राक्षारस आणि तेल मंदिरात आणले. या सगळया गोष्टी कोठारात ठेवण्यात आल्या.

13 कोठारांवर या माणसांना मी नेमले: शलेम्या हा याजक, सादोक शिक्षक, आणि पदाया नावाचा लेवी. मत्तन्याचा मुलगा जक्कूर याचा मुलगा हनान याला त्यांचा मदतनीस म्हणून नेमले. ही माणसे विश्वासार्ह आहेत हे मला माहीत होते. आपल्या नातलगांना नेहमी लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करणे हे त्यांचे काम होते.

14 देवा, मी केलेल्या या गोष्टींचे स्मरण असू दे. माझ्या देवाचे मंदिर आणि तिथली सेवा यांसाठी मी श्रध्देने जे केले त्याची आठवण ठेव.

15 यहुदात त्या काळात मी शब्बाथ दिवशी लोकांना काम करताना पाहिले. द्राक्षारसासाठी द्राक्षे तुडवताना मी त्यांना पाहिले. धान्य आणून ते गाढवांवर लादताना मी पाहिले. द्राक्षे, अंजीर आणि इतर बऱ्याच गोष्टी शहरात नेताना मी लोकांना पाहिले. शब्बाथ दिवशी ते या सर्व गोष्टी यरुशलेममध्ये आणत होते. तेव्हा मी त्याबद्दल त्यांना ताकीद दिली. शब्बाथ दिवशी अन्नधान्याची विक्री करायची नाही हे मी त्यांना सांगितले.

16 तेव्हा सोरे नगरातील काही लोक यरुशलेममध्ये राहात होते. ते मासे आणि आणखी पुष्काळशा गोष्टी शब्बाथ दिवशी यरुशलेममध्ये आणून विकत. आणि यहुदी लोक त्या विकत घेत. 17 यहुदातील मान्यवर लोकांना मी हे चुकीचे असल्याचे सांगितले. त्यांना मी म्हणालो, “तुम्ही ही फार वाईट गोष्ट करत आहात. तुम्ही शब्बाथाला अपवित्र करीत आहात. शब्बाथाला तुम्ही इतर दिवसांसारखाच एक करत आहात. 18 तुमच्या पूर्वजांनी याच गोष्टी केल्या हे तुम्ही जाणता. म्हणूनच देवाने आपल्यावर आणि आपल्या नगरावर अरिष्ट आणले. आता इस्राएलवर आणखी संकटे येतील असे तुम्ही वागत आहा. कारण शब्बाथ दिवस बाटवून त्यांचे महत्व तुम्ही घालवत आहात.”

19 म्हणून मी केले ते असे: दर शुक्रवारी रात्री अंधार पडण्यापूर्वी द्वारपालांना मी यरुशलेमच्या वेशींचा कडेकोट बंदोबस्त करायला सांगितले. शब्बाथ दिवस होऊन गेल्याखेरीज दरवाजे उघडायचे नाहीत असा आदेश देला. माझी काही माणसे मी वेशीवर उभी केली. शब्बाथ दिवशी कोणताही माल यरुशलेममध्ये येत नाही याची खात्री करून घ्यायला मी त्यांना सांगितले.

20 एक दोन वेळेला व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांना यरुशलेमबाहेर रात्र काढावी लागली. 21 पण मी त्या व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांनाही समज दिली. मी त्यांना म्हणालो, “कोटाच्या भिंतीलगत रात्री मुक्काम करु नका. पुन्हा तुम्ही तसे केल्यास तुम्हाला पकडण्यात येईल.” तेव्हा पासून ते पुन्हा शब्बाथ दिवशी त्यांच्या वस्तू विकायला आले नाहीत.

22 मग मी लेवींना त्यांच्या शुध्दीकरणाची आज्ञा दिली. ते पार पाडल्यावर त्यांना वेशींची राखण करायची होती. शब्बाथ हा दिवस म्हणून राखून ठेवला होता याची खात्री करण्यासाठी असे केले होते.

देवा, या गोष्टी केल्याबद्दल कृपया माझे स्मरण ठेव. माझ्यावर लोभ असू दे आणि तुझे महान प्रेम मला मिळूदे.

23 त्या काळात माझ्या असेही लक्षात आले की काही यहुदी लोकांनी अश्दोदी, अम्मोनी आणि मवाबी बायकांशी लग्ने केली आहेत. 24 आणि या विवाहातून झालेल्या संततीपैकी निम्म्या मुलांना यहूदी भाषा बोलता येत नव्हती. ही मुले अश्दोदी, अम्मोनी किंवा मवाबी भाषा बोलत होती. 25 तेव्हा मी त्या पुरुषांना त्यांचा हा दोष दाखवला. त्यांचा मी धिक्कार केला. काहींना मारहाण करून त्यांचे केस उपटले. त्यांना देवाची शपथ घ्यायला लावली. त्यांना मी म्हणालो, “त्या लोकांच्या मुलींशी लग्ने करु नका. तुमच्या मुलांशी या परक्या लोकांच्या मुलींची लग्ने होऊ देऊ नका. तुमच्या मुलींना त्या परक्या लोकांच्या मुलांशी लग्ने करु देऊ नका. 26 अशा विवाहांमुळेच शलमोनाच्या हातून पाप झाले. हे तुम्हाला माहीत आहे. शलमोनसारखा थोर राजा किती तरी राष्ट्रांमध्ये नव्हता. देवाचा शलमोनवर लोभ होता. देवाने सर्व इस्राएलवर शलमोनला राजा केले. पण परक्या स्त्रियांमुळे शलमोनही पाप करायला उद्युक्त झाला. 27 आणि आता तुम्हीही तसेच भयंकर पातक करत आहात असे मी ऐकतो. तुम्ही देवाशी एकनिष्ठ नाही. तुम्ही परक्या स्त्रियांशी विवाहबध्द होत आहात.”

28 योयादा हा मुख्य याजक एल्याशीब याचा मुलगा. योयादाचा एक मुलगा होरेनच्या सनबल्लटचा जावई होता. त्याला मी हा देश सोडायला लावले. त्याला मी पळून जायला भाग पाडले.

29 माझ्या देवा, या लोकांना शासन कर. त्यांनी याजकपणा अपवित्र केला. त्याला ते क्षुल्लक समजले. याजक आणि लेवी यांच्याशी तू केलेला करार त्यांनी पाळला नाही. 30 म्हणून मी याजक आणि लेवी यांना शुध्द केले. सर्व परकी माणसे आणि त्यांनी शिकवलेल्या चमत्कारिक परकीय गोष्टी यांची मी हकालपट्टी केली. लेवी आणि याजक यांना त्यांची कामे आणि जबाबदाऱ्या दिल्या. 31 लाकूड आणि झाडांची पहिली फळे यांच्या भेटी लोक योग्यवेळीआणतील याची मी व्यवस्था केली.

देवा, या सत्कृत्यांसाठी माझी आठवण ठेव.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes