Add parallel Print Page Options

निनवेचा नाश होईल

तुझ्यावर हल्ला करण्यासाठी शत्रू येत आहे
    तेव्हा तुझ्या शहरातील भक्कम जागांचे रक्षण कर
    रस्त्यांवर नजर ठेव
युध्दाला सज्ज हो!
    लढाईची तयारी कर!
परमेशवर इस्राएलच्या वैभवाप्रमाणेच याकोबलाही पुन्हा वैभव प्राप्त करून देईल
    इस्राएलच्या ऐश्वर्याप्रमाणेच याकोबचे ऐश्वर्य होईल
शत्रूने त्यांचा नाश केला
    आणि त्याचे द्राक्षमळे उदध्वस्त केले.

त्या सैनिकांच्या ढाली लाल आहेत
    त्यांचा पोशाख लालभडक आहे
लढण्यासाठी सज्ज होऊन
    उभे राहिलेले त्यांचे रथ अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे चमड्ढताना दिसत आहेत
    त्यांचे घोडे सरसावलेले आहेत.
रथ रस्त्यांतून मोकाटपणे धावत आहेत
    चौकांमधून ते पुढे-मागे कसेही पळत आहेत
ते जळत्या मशालीप्रमाणे
    किंवा ठिकठिकाणी तळपणाऱ्या विजेप्रमाणे दिसत आहेत.

अश्शूरचा राजा त्याच्या सर्वोत्तम सैनिकांना बोलवत आहे
    पण ते वाटेतच अडखळून पडत आहेत
ते तटबंदीचे रक्षण करण्यासाठी धाव घेत आहेत
    ते संरक्षक दरवाजे खाली ओढून लावून घेत आहेत.
पण नदीकाठची दारे उघडीच आहेत
    तेथूत शत्रू पुरासारखा आत शिरतो आणि राजवाड्याचा नाश करतो.
शत्रू राणीला पकडून घेऊन जातात
    आणि तिच्या दासी दु:खाने पारव्याप्रमाणे विव्हळातात
    त्या छाती पिटून दू:ख व्यक्त करतात.

निनवे एक अशा तळ्यासारखे आले आहे
    ज्याच्यातील पाणी वाहून जात आहे
लोक किंचाळतात थांबा! थांबा पळून जाऊ नका!
    पण त्याचा काहीही उपयोग होत नाही.

निनवेचा नाश करणाव्या
    सैनिकांनो चांदी सोने लुटा
तेथे लुटण्यासारखे पुष्कळ आहे.
    खूप संपत्ती आहे.
10 आता निनवे ओसाड झाले आहे
    सर्व चोरीला गेले आहे
    शहर उद्ध्वस्त झाले आहे
लोकाचे धैर्य खचले आहे
    भीतीने हदयाचे पाणी होत आहे
पाय लटपटत आहेत
    शरीरांचा थरकाप होत आहे
    चेहेरे पांढरेफटक पडले आहेत.

11 कोठे आहे ती सिंहाची गुहा (निनवे)?
    सिंह-सिंहिणी तेथे राहात होत्या त्यांचे छावे निडर होते.
12 त्यांच्या छाव्यांना आणि सिंहिणींना तृप्त करण्यासाठी
    सिंहाने (निनवेच्या राजाने) खूप लोकांना मारले
त्याची गुहा (निनवे) मानवी शरीरांनी भरली
    त्याने मारलेल्या स्त्रियांनी त्यांची गुहा भरली.

13 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो,
“निनवे मी तुझ्याविरुध्द आहे
मी तुझे रथ जाळून टाकीन
    लढाईत मी तुझ्या छाव्यांना ठार मारीन
    तू पुन्हा पृथ्वीवर कोणाचीही शिकार करणार नाहीस
तुझ्या दूतांकडून पुन्हा कधीही लोकांना
    वाईट बातमी ऐकावी लागणार नाही.”