Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

जगण्याचा योग्य मार्ग

सत्ताधीश, आणि अधिकारी यांच्या अधीन राहण्या विषयी व त्यांच्या आज्ञा पाळण्याविषयी व प्रत्येक चांगले काम करण्यास तयार राहण्याविषयी, कोणाचीही निंदा न करण्याविषयी, भांडण टाळण्याविषयी आणि सर्व माणसांना मोठी नम्रता दाखविण्याविषयी त्यांना सतत आठवण करून देत राहा.

मी हे सांगतो कारण आपणसुद्धा एके काळी मूर्ख, आज्ञा न पाळणारे आणि बहकलेले असे होतो. आम्ही सर्व प्रकारच्या वासनांची व विलासाची गुलामाप्रमाणे सेवा करणारे होतो. आम्ही दुष्टतेचे व हेव्यादाव्याचे जीवन जगत होतो. इतर लोक आमचा द्वेष करीत. आणि आम्ही एकमेकांचा द्वेष करीत होतो. पण जेव्हा आमच्या तारणाऱ्या देवाची कृपा व प्रीति मानवाप्रती प्रकट झाली, तेव्हा त्याने आम्हाला तारले. देवाकडून निर्दोष म्हणवून घेण्यासाठी आम्ही केलेल्या कोणत्याही कृत्यांनी नव्हे तर त्याच्या दयेमुळे आम्ही तारले गेलो आणि ते आमच्याकडे नव्या जन्माच्या स्नानाद्वारे आम्ही नवीन जन्म पावलो आणि पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त झालेले नवीकरण यांनी तारले गेलो. देवाने तो पवित्र आत्मा आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या द्वारे विपुलपणे आम्हावर ओतला. यासाठी की, आता देवाकडून त्याच्या कृपेमध्ये आम्ही निर्दोष घोषित केले जावे. अनंतकाळच्या जीवनाच्या आशेने आम्ही त्याचे वारस व्हावे. ही शिकवण विश्वसनीय आहे.

आणि यावर जोर द्यावा असे मला वाटते. यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करण्याविषयी काळजी घ्यावी. या गोष्टी लोकांसाठी चांगल्या व हिताच्या आहेत.

परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळीसंबंधी चर्चा, भांडणे, नियमशास्त्राविषयीचा झगडा टाळ. करण ते निष्फळ व निरर्थक असे आहेत. 10 एकदोन वेळा बोध करून, फूट पाडणाऱ्या व्यक्तीला टाळा. 11 कारण तुला माहीत आहे की, असा मनुष्य वाइटाकडे वाहवत गेला आहे व तो पाप करीत आहे व त्याने स्वतःलाच दोषी ठरविले आहे.

लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी

12 जेव्हा मी अर्तमाला किंवा तुखिकाला तुझ्याकडे पाठवीन तेव्हा मला भेटण्यासाठी निकपलिसास येण्याचा तू होईल तितका प्रयत्न कर. कारण तेथे हिवाऴा घालविण्याचे मी ठरविले आहे. 13 जेना वकील व अपुल्लो यांना त्यांच्या प्रवासासाठी ज्याची गरज भासेल ती पुरविण्यासाठी तू सर्वतोपरी प्रयत्न कर. यासाठी की, त्यांना कशाचीही कमतरता भासू नये. 14 आपल्या लोकांनी चांगली कृत्ये करण्याविषयी शिकले पाहिजे यासाठी की तातडीच्या गरजा भागविल्या जाव्यात, म्हणजे ते निष्फळ ठरणार नाहीत.

15 माझ्याबरोबरचे सर्वजण तुला सलाम सांगतात. विश्वासामध्ये आम्हावर प्रेम करणाऱ्या सर्वांना सलाम सांग.

देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.