A A A A A
Bible Book List

गलतीकरांस 2 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

इतर प्रेषितांनी पौलाचा स्वीकार केला

मग चौदा वर्षांच्या काळानंतर मी पुन्हा यरुशलेमास गेलो. मी बर्णबाबरोबर गेलो. तीतालासुद्धा माझ्याबरोबर घेतले. मी जावे असे देवाने मला प्रगट केले, म्हणून मी गेलो. ज्याप्रमाणे मी पूर्वी यहूदीतर लोकामध्ये सुवार्ता सांगितली तशी मी खाजगीपणे पुढाऱ्यांच्या सभेतसुद्धा सुवार्ता सांगितली. यासाठी की, भूतकाळातील किंवा चालू स्थितीला माझे काम व्यर्थ जाऊ नये.

त्याचा परिणाम असा झाला की, तीत, जो माझ्याबरोबर होता, तो ग्रीक असतानाही त्याला सुंता करवून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही. कारण ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जे स्वातंत्र्य मिळाले ते हेरण्यासाठी व आम्हांला गुलाम करता यावे म्हणून ज्या खोट्या विश्वासणाऱ्यांना आत आणणयात आले त्यामुळे हे झाले. सुवार्तेमधील सत्य तुमच्याजवळच राहावे म्हणून आम्ही क्षणभरदेखील त्यांना वश झालो नाही.

जे लोक महत्त्वाचे आहेत असे लोक समजत होते त्यांच्याकडून मला काहीही मिळाले नाही. जे कोणी ते होते त्यांच्यामुळे मला काही फरक पडला नाही; सर्व माणसे देवासमोर सारखीच आहेत. काहीही असो, त्या प्रतिष्ठित माणसांनी माझ्यामध्ये किंवा माझ्या संदेशांमध्ये कोणतीही भर टाकली नाही. उलट, जेव्हा ते म्हणतात की, विदेशी लोकांना सुवार्ता सांगण्याचे कार्य माझ्यावर सोपविण्यात आले आहे, ज्याप्रमाणे पेत्राला यहूदी लोकांना सुवार्ता सांगण्याचे कार्य सोपविलेले आहे. कारण ज्याने पेत्राला यहूदी लोकाकरिता प्रेषित बनविले त्यानेच मला विदेशी लोकांकरिता प्रेषित बनविले. म्हणून याकोब, पेत्र व योहान ज्यांची मंडळीचे आधारस्तंभ म्हणून प्रसिद्धी होती, त्यांनी देवाने मला दिलेला अधिकार ओळखला आणि बर्णबा व माझ्याशी सहभागितेचे चिन्ह म्हणून हात मिळविला व सहमती दर्शविली की आम्ही विदेशी लोकांमध्ये जाऊन संदेश द्यावा. आणि त्यांनी जाऊन यहूदी लोकांना उपदेश करावा. 10 त्यांनी फक्त हेच सांगितले की, त्यांच्या गरिबांना मदत करण्याची आम्ही आठवण ठेवावी, आणि मी ते सर्व करण्यास राजी होतो एवढेच नव्हे तर ते करण्यास अधीर झालो होतो.

पेत्राची चूक झाली असे पौल दाखवून देतो

11 पण, जेव्हा पेत्र अंत्युखियात आला तेव्हा मी त्याला उघडपणे विरोध केला, कारण त्याने स्पष्टपणे चूक केली होती. 12 कारण याकोबाने पाठविलेली काही माणसे येण्यापूर्वी पेत्र विदेशी लोकांबरोबर जेवत असे. पण जेव्हा ते (याकोबाने पाठविलेले यहूदी) आले तेव्हा त्याने अंग काढून घेतले आणि तो विदेशी लोकांपासून वेगळा झाला, कारण या यहूदी लोकांचा विश्वास होता की, विदेशी माणसांची सुंता झालीच पाहिजे, म्हणून त्यांची त्याला भीती वाटत होती. 13 व बाकीचे यहूदी लोकसुद्धा त्याच्या ढोंगामध्ये सामील झाले, येथपर्यंत की, बर्णबासुद्धा त्यांच्या ढोंगाला वश झाला. 14 जेव्हा मी पाहिले की, सुवार्तेच्या सत्याच्या सरळ मार्गात ते योग्य प्रकारे वागत नाहीत, तेव्हा मी सर्वासमोर पेत्राला म्हणालो, “जर तू जो यहूदी आहेस व यहूदीतरांप्रमणे वागत आहेस व यहूदी माणसाप्रमाणे वागत नाहीस तर तू विदेशी लोकांना यहूदी लोकांच्या चालीरीतींचे अनुकरण करण्यास त्यांना कसे भाग पाडू शकतोस?”

15 आम्ही जन्माने यहूदी आहोत आणि “पापी यहूदीतर लोकांपैकी” नाही. 16 तरीही आम्हांला माहीत होते की, मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याने ठरतो, म्हणून आम्ही आमचा विश्वास येशू ख्रिस्तावर ठेवला आहे. यासाठी की, ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे. कारण कोणीही देहधारी मनुष्य नियमाशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरणार नाही.

17 पण जर, आम्ही ख्रिस्तामध्ये नीतिमान होण्याचे पाहतो, तर आम्ही यहूदीसुद्धा विदेश्यांप्रमाणे पापी असे आढळतो. याचा अर्थ असा आहे की, ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? 18 अर्थातच नाही! कारण जर मी या सोडून दिलेल्या पद्धतीप्रमाणे पुन्हा शिकविण्यास सुरुवात केली, तर मी नियमशास्त्र मोडणारा होतो. 19 कारण नियमशास्त्रामुळे मी नियमशास्त्राला “मेलो” यासाठी की मी देवासाठी जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेलो. 20 यासाठी की यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो, आता देहामध्ये जे जीवन मी जगतो ते मी ज्याने माझ्यावर प्रीती केली आणि माझ्याऐवाजी स्वतःला दिले त्या देवाच्या पुत्रावरील विश्वासाने जगतो. 21 मी देवाची कृपा नाकारीत नाही. कारण जर नीतिमत्व नियम शास्त्रामुळे मिळत असेल तर ख्रिस्त विनाकारण मरण पावला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes