A A A A A
Bible Book List

कलस्सैकरांस 1 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल आणि आमचा बंधु तीमथी याजकडून,

ख्रिस्तामध्ये आमचे जे विश्वासू बंधु आहेत, त्या कलस्सै येथील देवाच्या पवित्र लोकांना:

देव, आमचा पिता याजकडून तुम्हास कृपा व शांति असो.

आम्ही जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही नेहमी देवाचे, जो आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता आहे त्याचे, आभार मानतो. कारण आम्ही ख्रिस्त येशूवरील तुमच्या विश्वासाविषयी आणि देवाच्या सर्व लोकांविषयी तुम्हाला वाटत असलेल्या प्रेमाविषयी ऐकले आहे. कारण स्वार्गमध्ये जी आशा तुमच्यासाठी राखून ठेवली आहे. तुम्ही पहिल्यांदा त्या आशेविषयी खऱ्या संदेशाद्वारे म्हणजेच सुवार्तेद्वारे ऐकले. जी सुवार्ता तुमच्याकडे आली आहे, संपूर्ण जगातून त्या सुवार्तेचे फळ मिळत आहे व ती वाढत आहे. ज्याप्रमाणे ती तुमच्यामध्येसुद्धा तशीच वाढत होती व फळ देत होती, ज्या दिवसापासून तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले व ती खरोखर काय आहे हे समजून घेतले तेव्हापासून ती कार्य करीत आहे. तुम्ही ते, आमचा सहसेवक एपफ्रास, जो आमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे, त्याच्याकडून शिकून घेतले आहे. त्याने आम्हांला तुमचे प्रेम आत्म्यापासून आहे त्याविषयीही सांगितले.

या कारणासाठी, आम्हीसुद्धा तुमच्याविषयी ज्या दिवसापासून ऐकले, तेव्हापासून तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही प्रार्थना करीत आहोत की:

तुम्ही देवाच्या इच्छेच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि आध्यात्मिक समंजसपणाने भरले जावे. 10 यासाठी की, त्याला योग्य असे तुम्ही चालावे. आणि सर्व बाबतीत त्याला आनंद द्यावा; आणि तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढावे; 11 त्याच्या गौरवी सामर्थ्यात त्याच्या महान सामर्थ्यामुळे समर्थ बनण्यासाठी तुम्हांला सहनशीलता व धैर्य प्राप्त व्हावे.

12 आणि आनंदाने पित्याला धन्यवाद द्यावेत, ज्याने तुम्हांला प्रकाशात राहणाऱ्या देवाच्या लोकांचे जे वतन आहे त्यात वाटा मिळण्यासाठी पात्र केले. 13 देवाने अंधाराच्या अधिपत्यापासून आमची सुटका केली आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले. 14 पुत्राद्वारे आम्हांला आमच्या पापांची क्षमा मिळाली.

जेव्हा आम्ही खिस्ताकडे पाहतो तेव्हा आम्ही देवाला पाहतो

15 तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे
    आणि निर्माण केलेल्या
    सर्व गोष्टीत तो प्रथम आहे.
16 कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व काही
    त्याच्या सामर्थ्याने निर्माण केले गेले.
    जे काही दृश्य आहे आणि जे काही अदृश्य आहे,
सिंहासने असोत किंवा सामर्थ्य असो, सत्ताधीश असोत किंवा अधिपती असोत
    सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण केले गेले.

17 सर्व गोष्टी निर्माण होण्याच्या अगोदरपासूनत तो अस्तित्वात आहे.
    सर्व गोष्टी त्याच्याद्वारे चालतात.
18 आणि तो शरीराचा म्हणजे मंडळीचा मस्तक आहे.
    तो प्रारंभ आहे, मृतांमधून पुनरुत्थान पावलेल्यांमध्ये तो प्रथम आहे.
यासाठी की प्रत्येक गोष्टीत
    त्याला प्रथम स्थान मिळावे.
19 कारण देवाने त्याच्या सर्व पूर्णतेत त्याच्यामध्ये राहण्याचे निवडले.
20     आणि ख्रिस्ताद्वारे सर्व गोर्ष्टींचा स्वतःशी म्हणजे त्या पृथ्वीवरील गोष्टी असोत,
    किंवा स्वार्गांतील गोष्टी असोत समेट करण्याचे ठरविले.
ख्रिस्ताने जे रक्त वधस्तंभावर सांडले त्याद्वारे देवाने शांति केली.

21 एके काळी तुम्ही परके होता आणि तुमच्या विचारांमुळे आणि तुमच्या दुष्ट कृत्यांमुळे तुम्ही देवाचे शत्रू होता. 22 परंतु आता, ख्रिस्ताच्या शरीरिक देहाने व त्याच्या मरणाने देवाने तुमचा त्याच्याशी समेट घडवून आणला आहे यासाठी की, त्याच्यासमोर पवित्र, निष्कलंक आणि दोषविरहीत असे सादर करावे. 23 तुम्ही तुमच्या विश्वासात दृढ व स्थिर असावे आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली आहे तिच्याद्वारे तुम्हांला दिलेल्या आशेपासून दूर जाऊ नये, ज्याचा मी पौल सेवक झालो.

मंडळीकरिता पौलाचे कार्य

24 आता, तुमच्यासाठी मला झालेल्या दु:खात मला आनंद वाटतो आणि माझ्या स्वतःच्या शरीरात मी ख्रिस्ताचे त्याच्या देहाचे म्हणजे मंडळीच्या वतीने ख्रिस्ताचे जे दु:ख कमी पडत आहे ते मी पूर्ण करीत आहे. 25 देवाच्या आज्ञेप्रमाणे मी एक त्यांच्यापैकी सेवक झालो. ती आज्ञा तुमचा फायदा व्हावा म्हणून दिली होती. ती म्हणजे देवाचा संदेश पूर्णपणे गाजवावा. 26 हा संदेश एक रहस्य आहे, जे अनेक युगांपासून आणि अनेक पिढ्यांपासून लपवून ठेवले होते. परंतु आता ते देवाने त्याच्या लोकांना माहीत करुन दिले आहे. 27 देवाला त्याच्या लोकांना माहीत करुन द्यायचे होते की, विदेशी लोकांमध्ये या वैभवी रहस्याची संपत्ती ख्रिस्त येशू जो तुम्हांमध्ये आहे आणि जो देवाच्या गौरवामध्ये सहभागी होण्याची आमची आशा आहे. 28 आम्ही त्याची घोषणा करतो. प्रत्येक व्यक्तीला सूचना देतो, व प्रत्येक व्यक्तीला शक्य ते ज्ञानाने शिकविण्याचा प्रयत्न करतो यासाठी की, आम्हांला प्रत्येक व्यक्ति ख्रिस्तामध्ये पूर्ण अशी देवाला सादर करता यावी. 29 या उद्देशाने मी झगडत आहे. ख्रिस्ताच्या शक्तीच्या उपयोगाने, जी माझ्यामध्ये सामर्थ्यशाली रीतीने कार्य करीत आहे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes