A A A A A
Bible Book List

एस्तेर 8 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

यहुदींच्या मदतीसाठी राजाचा आदेश

यहूद्यांचा शत्रू असलेल्या हामानच्या मालकीची सर्व मालमत्ता त्याच राजा अहश्वेरोशने राणी एस्तेरला दिली. मर्दखयशी असलेले नाते एस्तेरने राजाला सांगितले. त्यानंतर मर्दखय राजाकडे आला. राजाला आपली मुद्रा हामानकडून परत मिळाली होती. ती आपल्या बोटातून काढून राजाने मर्दखयला दिली. मग एस्तेरने मर्दखयला हामानच्या मालमत्तेचा प्रमुख नेमले.

एस्तेर मग राजाशी पुन्हा बोलली. त्याच्या पायाशी स्वतःला झोकून देऊन ती रडू लागली. आगागी हामानने आखलेली दुष्ट योजना राजाने रद्द करावी म्हणून त्याची विनवणी करु लागली. यहुद्यांना अपाय करण्याचा बेत हामानने आखला होता.

मग राजाने आपला सोन्याचा राजदंड एस्तेरपुढे केला. एस्तेर उठली आणि राजापुढे उभी राहिली. मग ती म्हणाली, “राजा, तुला मी आवडत असेन आणि तुझ्या मनास येत असेल तर कृपया माझ्यासाठी एवढे कर. तुला ही कल्पना चांगली वाटत असेल तर कृपया तू असे कर. तुझी माझ्यावर मर्जी असल्यास हामानने पाठवलेला आदेश रद्द करणारा आदेश लिही. राजाच्या अंमलाखाली असलेल्या सर्व प्रांतांतील यहुद्यांच्या संहाराचा कट अगागी हामानने केला होता. आणि तो अंमलात आणण्यासाठी त्याने तशा आज्ञा पाठवल्या होत्या. माझ्या लोकांवर ही भयंकर आपत्ती आलेली मला पाहवणार नाही. माझ्या लोकांची हत्या माझ्याने पाहवणार नाही.”

राजा अहश्वेरोशने राणी एस्तेर आणि मर्दखय यांना उत्तर दिले. राजा त्यांना म्हणाला, “हामान यहुद्यांविरुध्द होता म्हणून त्याची मालमत्ता मी एस्तेरला दिली. आणि माझ्या शिपायांनी त्याला वधस्तंभावर फाशी दिले आहे. आता राजाच्या अधिकारात दुसरा आदेश लिहा. तुम्हाला सर्वात उत्तम वाटेल अशा पध्दतीने यहुद्यांना साहाय्यकारी होईल असा तो असू द्या. मग राजाच्या विशेष मुद्रेने त्या हुकामावर शिक्का उठवा. राजाच्या अधिकारात लिहिलेले आणि राजमुद्रेने मुद्रित केलेले राज्यकारभार विषयक पत्र कोणालाही रद्द करता येत नाही.”

राजाच्या लेखकांना ताबडतोब बोलवण्यात आले. तिसऱ्या म्हणजे शिवान महिन्याच्या तेविसाव्या दिवशी हे झाले. सर्व यहुदी आणि हिंन्दूस्तानपासून कूशपर्यंतच्या एकशेसत्तावीस प्रांतांमधील अधिपती, अधिकारी आणि सरदार यांना उद्देशून मर्दखयने दिलेले सर्व आदेश त्या लेखकांनी लिहून काढले. प्रत्येक प्रांताच्या भाषेत ते लिहिण्यात आले. प्रत्येक भाषिक गटाच्या भाषेत त्यांचा अनुवाद करण्यात आला. यहुद्यांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत ते आदेश लिहिले गेले. 10 मर्दखयने राजा अहश्वेरोशच्या नावाने आदेश काढले. मग ते राजाच्या मुद्रेने मुद्रांकित केले. आणि जासूदांकरवी घोड्यावरुन पाठवले. खास राजासाठी जोपासलेल्या वेगवान घोड्यांवरुन हे जासूद गेले.

11 त्या पत्रांमधील राजाचे आदेश असे होते: प्रत्येक नगरातील यहुद्यांना स्वसंरक्षणासाठी एकत्र जमण्याचा अधिकार आहे. कोणत्याही प्रांतातील कोणतेही सैन्य त्यांच्यावर आणि त्यांच्या बायकामुलांवर चालून आले तर त्या सैन्याला ठार करण्याचा, त्याला पुरते नेस्तनाबूत करण्याचा हक्क त्यांना आहे. आपल्या शत्रूची मालमत्ता ताब्यात घ्यायचा, तिची नासधूस करायचा यहुद्यांना अधिकार आहे.

12 अदारच्या म्हणजे बाराव्या महिन्यातल्या तेराव्या दिवशी यहुद्यांवर कारवाई करायची असे ठरले होते. त्यामुळे यहुद्यांना राजा अहश्वेरोशच्या सर्व प्रांतांत असा प्रतिकार करायची मुभा होती. 13 राजाच्या आज्ञापत्राची प्रत पाठवायची होती. हे आज्ञापत्र म्हणजे कायदाच होता. प्रत्येक प्रांतात तो कायदा लागू होता. राजाच्या साम्राज्यातील सर्व प्रदेशांमध्ये तो जाहीर केला गेला. यहूद्यांनी या विशिष्ट दिवशी तयार राहावे, त्यांना शत्रूला शह देता यावा म्हणून हा आदेश पाठवला गेला. 14 राजाच्या घोड्यांवर स्वार होऊन जासूद तातडीने निघाले. राजानेच त्यांना वेळ न गमावता जायला लावले. हाच आदेश शूशन राजधानीतही दिला गेला.

15 मर्दखय राजाकडून निघाला. त्याने राजाकडचा विशेष पोषाख घातला होता. त्याचे कपडे निळया आणि पांढऱ्या रंगाचे होते. मोठा सोन्याचा मुकुट त्याने घातला होता. तलम सणाचा जांभळा झगा त्याने वर चढवला होता. शूशनमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. लोक अतिशय आनंदात होते. 16 यहूद्यांच्या दृष्टीने ती पर्वणी होती. त्यामुळे त्यादिवशी जल्लोषाचे वातावरण होते.

17 ज्या ज्या प्रांतात आणि नगरात राजाची आज्ञा पोचे तिथे तिथे यहुद्यांमध्ये आनंद आणि उल्हास पसरे. त्यांनी भोजनसमारंभ केले. इतरांमधले बरेच लोकही यहूदी बनले. कारण त्यांना यहूद्यांची भीती वाटू लागली.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes