Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

मर्दखय मध्यस्थीसाठी एस्तेरला राजी करतो

जे काही झाले ते मर्दखयच्या कानावर आले. यहुद्यांविरुध्द राजाने काढलेला हुकूम त्याला समजला तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली. शोकाची वस्त्रे परिधान करून डोक्याला राख फासून तो नगरातून मोठयाने आक्रोश करत आणि रडत निघाला. पण तो फक्त राजाच्या प्रवेश द्वारापर्यंतच पोचू शकला. शोकाची वस्त्रे घातलेल्या कोणालाही तिथून आत जाण्यास मनाई होती. राजाचा हुकूम ज्या प्रांतात पोचला तिथे तिथे यहुद्यांमध्ये शोककळा पसरली आणि ते आक्रोश करु लागले. उपवास करून आणि मोठयाने ते आकांत करु लागले. डोक्यात राख घालून आणि शोकवस्त्रे घालून बहुतेक यहुदी राखेत पडून राहिले.

एस्तेरच्या दासी आणि खोजे तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला मर्दखयविषयी सांगितले. तेव्हा राणी एस्तेर अतिशय दु:खी आणि नाराज झाली. शोकाच्या वस्त्रांऐवजी घालायला तिने मर्दखयकडे चांगली वस्त्रे पाठवली. पण तो ती घेईना. एस्तेरने मग हथाकला बोलावले. हथाक हा तिच्या सेवेसाठी निवडलेला राजाच्या खोजांपैकी एक जण होता. मर्दखय एवढा कशाने त्रस्त झाला आहे हे शोधून काढायची एस्तेरने त्याला आज्ञा दिली. राजद्वारासमोरच्या नगरातल्या मोकळया जागेत मर्दखय होता तिथे हथाक गेला. मर्दखयने मग हथाकला त्याच्या बाबतीत जे जे झाले ते सर्व सांगितले. यहुद्यांचा वध करण्याबद्दल राजाच्या खजिन्यात नेमकी किती रक्कम जमा करायचे हामानने वचन दिले आहे ते ही त्याने हथाकला सांगितले. यहूद्यांच्या वधाच्या राजाज्ञेची प्रतही मर्दखयने हथाकला दिली. हा हुकूम शूशन नगरात सर्वत्र दिला गेला होता. हथाकने एस्तेरला तो हुकूम दाखवून सर्व काही तिला सांगावे अशी त्याची इच्छा होती. एस्तेरने राजाकडे जाऊन मर्दखय आणि तिचे लोक यांच्यासाठी दयेची याचना व मदत करण्यास हथाकने तिला प्रवृत्त करावे असेही त्याने सांगितले.

हथाकने एस्तेरकडे येऊन तिला, मर्दखय म्हणाला ते सगळे सांगितले.

10 मग मर्दखयसाठी एस्तेरने हथाकजवळ निरोप दिला: 11 “मर्दखय, राजाचे सर्व अधिकारी आणि राजाच्या प्रदेशातील सर्व लोक हे जाणून आहेत की न बोलावता जो राजाकडे जाईल त्या व्यक्तीसाठी मग तो पुरुष असो की स्त्री राजाचा एकच कायदा आहे तो म्हणजे मृत्युदंड. मात्र राजाने आपला सुवर्ण राजदंड त्या व्यक्तीपुढे केल्यास हा कायदा अंमलात आणला जात नाही. राजाच्या तेवढ्या कृतीने त्या माणसाला जीवदान मिळते. आणि मला तर राजाकडून गेल्या तीस दिवसात बोलावणे आलेले नाही.”

12-13 मग एस्तेरचा हा निरोप मर्दखयला मिळाला. मर्दखयला तिचा निरोप मिळाल्यावर त्याने आपले उत्तर पाठवले. “राजमहालात राहतेस म्हणून तू यातून सुटशील असे समजू नकोस. 14 तू आत्ता गप्प बसलीस तर यहुद्यांना दुसऱ्या ठिकाणाहून मदत आणि स्वातंत्र्य मिळेल. पण तू आणि तुझे पितृकुळ यांचा मात्र नाश होईल. आणि कोणी सांगावे, या अशा काळासाठीच कदाचित तुझी राणी म्हणून निवड झाली असेल.”

15-16 तेव्हा एस्तेरने मर्दखयला हे उत्तर पाठवले: “मर्दखय, शूशन मधील सर्व यहुद्यांना एकत्र घेऊन ये आणि माझ्यासाठी सर्वजण उपास करा. तीन दिवस आणि तीन रात्र काहीही खाऊ पिऊ नका. मी तुमच्यासारखाच उपास करीन, तसेच माझ्या दासीदेखील करतील. आपल्या उपवासानंतर मी राजाकडे जाईन. राजाने मला बोलावलेले नसताना त्याच्याकडे जाणे नियमाविरुध्द आहे हे मला माहीत आहे. पण तरी मी जाईन. मग मी मेले तर मेले.”

17 तेव्हा मर्दखय निघून गेला. एस्तेरने त्याला जे करायला सांगितले तसे त्याने केले.