A A A A A
Bible Book List

एस्तेर 3 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

हामानचा यहुदींच्या संहाराचा बेत

या सर्व घडामोडी झाल्यानंतर राजाने अगागी हामानाचा गौरव केला. अगागी हामान हा हम्मदाथा याचा मुलगा. राजाने हामानला बढती देऊन इतर सर्व अधिकाऱ्यांपेक्षा मानाची जागा त्याला दिली. राजाच्या आज्ञेनुसार राजद्वारावरील राजावे सर्व सेवक हामानपुढे नतमस्तक होऊन त्याला मान देऊ लागले. पण मर्दखयने त्याच्यापुढे मान तुकवण्याचे किंवा त्याला मान द्यायचे नाकारले. तेव्हा प्रवेशद्वारावरील राजाच्या इतर सेवकांनी मर्दखयला विचारले, “हामानला मुजरा करायची राजाची आज्ञा तू का पाळत नाहीस?”

राजाचे सेवक मर्दखयला रोज हेच विचारू लागले तरी हामानला मुजरा करायची राजाज्ञा मर्दखयने पाळली नाहीच. तेव्हा या सेवकांनी हामानला हे सांगितले. हामान आता मर्दखयच्या बाबतीत काय करतो ते त्यांना पाहायचे होते. आपण यहुदी असल्याचे मर्दखयने या सेवकांना सांगितले होते. मर्दखय आपल्याला मुजरा करत नाही किंवा आपली मान तुकवत नाही हे हामानने पाहिले तेव्हा तो संतापला मर्दखय यहूदी आहे हे हामानला कळले होते. पण फक्त मर्दखयला जिवे मारून त्याचे समाधान होणार नव्हते. मर्दखयसारख्या सर्वांना, अहश्वेरोशच्या राज्यातल्या सर्वच्या सर्व यहुदींना कसे मारता येईल याचा विचार तो करु लागला.

राजा अहश्वेरोशच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षातल्या नीसान या पहिल्या महिन्यात हामानने विशेष दिवस आणि महिना निवडण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या. त्यानुसार अदार हा बारावा महिना निवडला. (त्या काळात अशा चिठ्ठ्यांना “पूर” म्हणत.) मग हामान राजा अहश्वेरोशकडे येऊन म्हणाला, “राजा अहश्वेरोश, तुझ्या साम्राज्यात सर्व प्रांतांमध्ये विशिष्ट गटाचे लोक विखुरलेले आहेत. इतर लोकांपेक्षा ते स्वतःला वेगळे ठेवतात. इतरांपेक्षा त्यांचे रीतिरिवाज वेगळे आहेत. शिवाय ते राजाचे कायदे पाळत नाहीत. अशा लोकांना तुझ्या राज्यात राहू देणे हिताचे नाही.

“राजाची मर्जी असल्यास एक सूचना करतो: या लोकांचा संहार करण्याची आज्ञा द्यावी. 10,000 रौप्यमुद्रा मी राजाच्या खजिन्यात [a] जमा करीन या पैशाचा विनियोग ही गोष्ट अंमलात आणणाऱ्या लोकांना मोबदला देण्यासाठी करता येईल.”

10 तेव्हा राजाने आपली राजमुद्रा बोटातून काढून हामानाला दिली. अगागी हामान हम्मदाथा याचा मुलगा होता. तो यहुद्यांचा शत्रू होता. 11 राजा मग हामानला म्हणाला, “हे धन ठेव. त्या लोकांना तुला काय द्यायचे ते दे.”

12 त्यानंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावले गेले. त्यांनी हामानच्या आज्ञा प्रत्येक प्रांताच्या भाषेत लिहून काढल्या. प्रत्येक लोकसमूहाच्या भाषेत त्यांनी त्या लिहिल्या. राजाचे कारभारी, वेगवेगळया प्रांतांचे अधिकारी, आणि वेगवेगळया लोकसमूहांचे नेते यांनाही त्यांनी लिहिले. राजा अहश्वेरोशच्या नावाने त्यांनी ते लिहिले आणि राजमुद्रा उठवून ते आदेश त्यांनी मुद्रांकित केले.

13 जासूदांनी ही पत्रे राजाच्या सर्व प्रांतात नेऊन दिली. सर्व यहुद्यांचा नाश करावा, त्यांना ठार करावे, त्यांचा समूळ उच्छेद करावा असा राजाचा आदेश होता. तरुण व वृध्द माणसे, बायका मुले सगळ्यांचा त्यात समावेश होता. एकाच दिवशी सर्व यहुद्यांना ठार करावे असे त्या आदेशात म्हटले होते. तो दिवस म्हणजे अदार महिन्याचा, बाराव्या महिन्याचा तेरावा दिवस. यहुद्यांची सर्व मालमत्ता काढून घ्यावी असाही आदेश होता.

14 हा आदेश असलेल्या पत्राची प्रत कायदा म्हणून द्यायची होती. प्रत्येक प्रांतात हा कायदा लागू होणार होता आणि राज्यातल्या सर्व लोकांना तो कळवण्यात येणार होता, जेणेकरून त्या दिवशी ते लोक तयार राहिले असते. 15 राजाच्या हुकूमानुसार सर्व जासूद तातडीने निघाले. शूशन राजावाड्यातून हा हुकूम निघाला. राजा आणि हामान पेयपान करायला बसले पण शूशन नगर मात्र चिंत्ताक्रांत झाले.

Footnotes:

  1. एस्तेर 3:9 राजाच्या खजिन्यात ठार मारून हामानने त्यांची मालमत्ता जप्त करुन खुप पैसे गोळा करण्याची आशा धरली होती.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes