Add parallel Print Page Options

एस्तेरला राणीपद मिळते

काही काळानंतर राजा अहश्वेरोशचा राग शमला. त्याला वश्तीची आणि तिच्या वागण्याची आठवण झाली. तिच्याविषयी आपण दिलेल्या आज्ञा आठवल्या. तेव्हा राजाच्या व्यक्तिगत सेवेतील सेवकांनी सुचवले, “राजासाठी तरुण, सुंदर कुमारीकांचा शोध घ्यावा. आपल्या राज्यातील प्रत्येक प्रांतातून राजाने एकेक अधिकारी निवडावा. त्या अधिकाऱ्यांनी सर्व सुरेख, सुकुमार कुमारीकांना शूशन या राजधानीत घेऊन यावे. त्यांना अंतःपुरात ठेवावे. तेथे अंतःपुराचा प्रमुख व हेगे या खोजाच्या निगराणीखाली त्यांना ठेवावे. त्याने त्यांना तेल आणि सुगंधित द्रव्य देऊन त्यांच्यावर सौंदर्य उपचार करावेत. त्यांच्यामधून मग जी मुलगी राजाला पसंत पडेल तिला वश्तीच्या ऐवजी राणीपद मिळावे.” राजाला ही सूचना आवडली आणि त्याने ती मान्य केली.

यावेळी बन्यामीनच्या घराण्यातील मर्दखय नावाचा एक यहुदी शूशन या राजधानीच्या शहरात होता. मर्दखय हा याईरचा मुलगा आणि याईर शिमईचा मुलगा आणि शिमई कीशचा मुलगा होता. बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने यहुदाचा राजा यखन्या याचा पाडाव करून त्याला यरुशलेमेहून नेले तेव्हा त्या लोकांमध्ये मर्दखय होता. त्याला हदस्सा नावाची एक चुलत बहीण होती. तिला आईवडील नसल्यामुळे मर्दखयनेच तिचा सांभाळ केला होता. तिचे आईवडील वारलें तेव्हा मर्दखयने तिला आपली मुलगी मानून तिला वाढवले. हदस्सालाच एस्तेर म्हणत. ती अतिशय रुपवती आणि सुरेख होती.

राजाची आज्ञा लोकांपर्यंत पोचल्यावर पुष्कळ मुलींना राजधानी शूशन येथे आणले गेले. त्यांना हेगेच्या देखभालीखाली ठेवण्यात आले. त्या मुलींमध्ये एस्तेरही होती. एस्तेरलाही राजवाड्यात हेगेकडे सोपवले गेले. हेगे राजाच्या जनानखान्याचा प्रमुख होता. हेगेला एस्तेर आवडली. तिच्यावर त्याची मर्जी बसली. त्यामुळे त्याने तिला ताबडतोब सौंदर्योपचार आणि खास आहार दिला. राजवाड्यातील सात दासींची हेगेने निवड केली आणि एस्तेरच्या दिमतीला त्यांना नेमले. एस्तेरला आणि त्या सात दासींना त्याने अंतःपुरातील सगळ्यात चांगल्या जागी हलवले. 10 आपण यहुदी आहोत हे एस्तेरने कुणालाही सांगितले नव्हते. मर्दखयने बजावल्यामुळे तिने आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी कोणालाही सांगितली नव्हती. 11 एस्तेरची खबरबात जाणून घेण्यासाठी मर्दखय रोज अंतःपुराच्या अवतीभवती फेऱ्या घाली.

12 राजा अहश्वेरोशकडे जाण्याची पाळी येण्यापूर्वी प्रत्येक मुलीला पुढील सोपस्कारातून जावे लागे. तिला बारा महिने सौदर्योपचार घ्यावे लागत. त्यापैकी सहा महिने गंधरसाच्या तेलाचे व सहा महिने सुंगधी द्रव्ये आणि प्रसाधने यांचे उपचार होत. 13 आणि राजाकडे जायच्या वेळी अशी पध्दत होती: अंतःपुरातील जी गोष्ट हवी ती तिला मिळत असे. 14 संध्याकाळी ती राजाकडे जाई. सकाळी ती दुसऱ्या अंतःपूरात परत येत असे. तिथे शाशगज नांवाच्या खोजाकडे तिला हवाली केले जाई. शाशगज हा राजाच्या उपपत्न्यांची देखरेख करणारा खोजा होता. राजाला जी मुलगी पसंत पडेल तिला तो नांव घेऊन बोलवे. एरवी या मुली पुन्हा राजाकडे जात नसत.

15 एस्तेरची राजाकडे जायची पाळी आली तेव्हा तिने काहीही मागून घेतले नाही. राजाच्या अंतःपुराचा प्रमुख खोजा हेगे याने जे सुचवले ते पाळण्याची तिची इच्छा होती. (मर्दखयचा काका अबीहइल याची ती मुलगी. मर्दखयने तिला आपली मुलगी मानली होती) ज्या कोणी एस्तेरला पाहीली त्यांना ती आवडली. 16 तेव्हा अहश्वेरोश राजाच्या महालात एस्तेरची रवानगी झाली. तो राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातला दहावा म्हणजे तेबेथ महिना होता.

17 इतर सर्व मुलींपेक्षा राजाला एस्तेर आवडली. तिच्यावर त्याचा लोभ जडला. इतर सर्व कुमारींहून त्याला ती पसंत पडली. तेव्हा राजा अहश्वेरोशने एस्तेरच्या मस्तकावर राजमुकुट चढवून वश्तीच्या जागी तिला राणी केले. 18 आपले सर्व प्रमुख अधिकारी सेवक यांना त्याने एस्तेरसाठी मोठी मेजवानी दिली. सर्व प्रांतांमध्ये त्याने सुट्टी जाहीर केली. आपल्या उदारत्वामुळे त्याने लोकांना बक्षीसे दिली.

मर्दखयला कटाचा सुगावा लागतो

19 सर्व मुली दुसऱ्यांदा एकत्र जमल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता. 20 एस्तेरने आपण यहुदी असल्याचे अजूनही गुपित ठेवले होते. आपली कौंटुबिक पार्श्वभूमी तिने कोणाला कळू दिली नव्हती. मर्दखयनेच तिला तसे बजावले होते. तो तिचा सांभाळ करत असताना ती त्याचे ऐकत असे तशीच ती अजूनही त्याच्या आज्ञेत होती.

21 मर्दखय राजद्वारी बसलेला असताना, बिग्थान व तेरेश प्रवेशद्वारा वरील राजाचे पहारेकरी, राजावरील रागाने, राजा अहश्वेरोशला मारून टाकण्याचा कट करु लागले. 22 पण मर्दखयाला त्यांचा बेत कळल्यामुळे त्याने राणी एस्तेरला खबर दिली. राणी एस्तेरने मर्दखयला या कटाचा सुगावा लागला असे राजाला सांगितले. 23 मग या बातमीचा तपास करण्यात आला. मर्दखयची खबर खरी असल्याचे आढळून आले. ज्या पहारेकऱ्यांनी राजाच्या खुनाचा कट केला होता त्यांना फाशी देण्यात आली. या सर्व गोष्टी राजासमक्ष राजांच्या इतिहासग्रंथात नोंदवून ठेवण्यात आल्या.