A A A A A
Bible Book List

उपदेशक 3 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

वेळ आहे

सगळ्या गोष्टी करण्यासाठी योग्य वेळ असते. आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टी योग्य वेळेलाच होतील.

जन्माला येण्याची
    आणि मरण्याचीही वेळ असते.
रोप लावण्याची आणि
    ते उपटून टाकण्याचीही वेळ असते.
ठार मारण्याची आणि
    बरे करण्याची पण वेळ असते.
सगळ्याचा नाश करण्याची
    आणि पुन्हा परत सर्व उभारायचीही वेळ असते.
रडण्याची आणि
    हसण्याचीही वेळ असते.
दु:खी होण्याची आणि
    आनंदाने नाचायचीही वेळ असते.
हातातली शस्त्रे खाली टाकण्याची वेळ असते
    आणि ती पुन्हा उचलण्याची ही वेळ असते. [a]
कुणाला तरी मिठी मारण्याचीही वेळ असते
    आणि ती मिठी सैल करण्याचीही योग्य वेळ असते.
काहीतरी शोधण्याचीही वेळ यावी लागते
    आणि ते हरवले आहे हे जाणण्याचीही वेळ असते.
गोष्टींचा संग्रह करण्याची वेळ असते
    आणि त्या फेकून देण्याचीही वेळ असते.
वस्त्र फाडण्याचीही वेळ असते.
    आणि ते शिवण्याचीही वेळ असते.
गप्प बसण्याचीही वेळ असते
    आणि बोलण्याचीही वेळ असते.
प्रेम करण्याचीही वेळ असते
    आणि द्वेष करण्याचीही वेळ असते.
युध्द् करण्याची वेळ असते
    आणि शांतीचीही वेळ असते.

देव त्याच्या जगावर सत्ता गाजवतो

खूप कष्ट केल्यानंतर माणसाला खरोखरच काही मिळते का? नाही. 10 देवाने आपल्याला जे कष्ट करायला लावले ते सगळे मी पाहिले. 11 देवाने आपल्याला या जगाबद्दल [b] विचार करण्याची शक्ती दिली. पण देव जे काही करतो ते आपण पूर्णपणे कधीही समजून घेऊ शकणार नाही. आणि तरीही देव सारे काही अगदी योग्य वेळी करीत असतो.

12 मला समजलेली आणि लोकांनी करण्यासारखी अशी योग्य गोष्ट म्हणजे सुखी असणे, आणि आयुष्य असे पर्यंत आनंद लुटणे. 13 प्रत्येक माणसाने खावे. प्यावे आणि कामाचा आनंद लुटावा असे देवाला वाटते. या देवाने दिलेल्या भेटी आहेत.

14 देव जे काही करतो ते सदैव राहणार आहे असे मी समजतो. देवाच्या कामात लेक आणखी काही मिळवू शकणार नाहीत आणि ते देवाच्या कामातून काही वजाही करू शकणार नाहीत. लोकांनी त्याला मान द्यावा म्हणून देवाने हे सारे केले आहे. 15 पूर्वी ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या. आपण त्या आता बदलू शकत नाही. आणि पुढेही जे काही घडणार आहे ते आपण बदलू शकणार नाही. पण ज्या लोकांना वाईट वागणूक मिळते त्यांना मदत करायची देवाची इच्छा आहे. [c]

16 मीही आयुष्यात या गोष्टी बघितल्या. मी पाहिले की न्यायालये न्यायाने आणि चांगुलपणाने भरलेली पाहिजेत. पण आता तेथे दुष्ट प्रवृत्ती आहेत. 17 म्हणून मी स्वतःशीच म्हटले, “देवाने सगळ्या गोष्टींची वेळ ठरवली आहे आणि त्याने लोक ज्या गोष्टी करतात त्यांचा न्याय करण्यासाठी ही योग्य वेळ ठरवली आहे. देव चांगल्या आणि वाईट लोकांचा न्याय करील.”

लोक खरोखरच पशूसारखे आहेत का?

18 लोक एकमेकांना ज्या गोष्टी करतात त्यांचा मी विचार केला आणि मी स्वतःशीच म्हणालो, “आपण पशूंसारखे आहोत, हे लोकांना कळावे असे देवाला वाटते. 19 माणूस पशूपेक्षा चांगला आहे का? नाही! का? कारण सर्वच निरर्थक आहे. पशूंच्या आणि माणसांच्या बाबतीत सारख्याच गोष्टी घडतात. ते दोघे ही मरतात. माणूस आणि पशू यांचा श्वास सारखाच आहे. मेलेला पशू मेलेल्या माणसापेक्षा वेगळा आहे का? 20 माणसांच्या आणि पशूंच्या शरीराचा नाश सारख्याच प्रकारे होतो. ते जमीनीतून आले आणि शेवटी ते तिथेच जातील. 21 माणसाच्या आत्म्याचे काय होते हे कोणाला माहीत आहे? माणसाचा आत्मा वर देवाकडे जातो की पशूचा आत्मा खाली जमिनीत जातो हे कुणाला माहीत आहे?”

22 म्हणून मी पाहिले की माणूस जे काही करतो ते त्याने आनंदाने करावे हे उत्तम. त्याच्याकडे फक्त तेच आहे. माणसाने भविष्याची मुळीच चिंता करू नये. का? कारण भविष्यात काय घडणार आहे ते पहाण्यासाठी माणसाला कुणीही मदत करू शकणार नाही.

Footnotes:

  1. उपदेशक 3:5 हातातली … वेळ असते शब्दश: “दगड फेकून देण्याची आणि गोळा करण्याचीही वेळ असते.”
  2. उपदेशक 3:11 देवाने … जगाबद्दल किंवा “भविष्य जाणून घेण्याची इच्छा.”
  3. उपदेशक 3:15 15 वे कडवे किंवा “आता जे घडते ते पूर्वीही घडले. भविष्यात ज्या गोष्टी घडणार आहेत त्या पूर्वी घडून गेल्या आहेत. देव या गोष्टी पुन्हा पुन्हा घडवतो.”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes