A A A A A
Bible Book List

उपदेशक 10 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

10 थोड्या मेलेल्या माशा सगळ्यांत चांगल्या अत्तरालासुध्दा वाईट वास आणतात. त्याचप्रमाणे थोडासा मूर्खपणा खूपशा शहाणपणाचा आणि सन्मानाचा नाश करू शकतो.

विद्वान माणसाचे विचार त्याला योग्य दिशेने नेतात. पण मूर्खाचे विचार त्याला अयोग्य दिशेकडे नेतात. मूर्ख त्याचा मूर्खपणा रस्त्यावरून जात असतानासुध्दा् दाखवतो. तेव्हा तो मूर्ख आहे हे सर्वांना दिसते.

तुमचे वरिष्ठ तुमच्यावर रागावले आहेत म्हणून तुम्ही तुमची नोकरी सोडू नका. जर तुम्ही शांत राहिलात आणि मदत केलीत तर तुम्ही तुमच्या घोडचुकाही [a] दुरुस्त करू शकाल.

मी आयुष्यात जे काही पाहिले त्यात ही एक गोष्ट आहे आणि ती योग्य नाही. राजे लोक करतात तशी ती एक चूक आहे. मूर्खांना महत्वाची जागा दिली जाते आणि श्रीमंतांना बिनमहत्वाच्या जागा दिल्या जातात. जे लोक नोकर व्हायच्या लायकीचे असतात त्यांना घोड्यावरून जाताना मी पाहिले आणि जे लोक राजे व्हायच्या योग्यतेचे होते त्यांना मूर्खाबरोबर गुलामासारखे जाताना मी पाहिले.

प्रत्येक कामात संकटे असतात.

जो माणूस खड्डा खणतो, तो त्याच खड्ड्यात पडू शकतो. जो माणूस भिंत पाडून टाकतो त्याला साप चावण्याची शक्यता असते. जो माणूस मोठ मोठे दगड हलवतो त्याला त्यामुळेच इजा होऊ शकते. आणि जो माणूस झाडे तोडतो तो संकटात असतो. ती झाडे त्याच्याच अंगावर पडण्याची शक्यता असते.

10 पण शहाणपण कुठलेही काम सोपे करते. धार नसलेल्या सुरीने कापणे कठीण असते. पण एखाद्याने जर सुरीला धार लावली तर कापणे सोपे जाते. शहाणपण तसेच आहे.

11 एखाद्याला सापावर ताबा कसा मिळवायचा ते माहीत असते. पण तो माणूस जवळपास नसताना कोणाला साप चावला तर त्या कौशल्याचा उपयोग नसतो. ते कौशल्य निरुपयोगी ठरते. शहाणपणही तसेच आहे.

12 विद्वान माणसाचे शब्द स्तुतीला पात्र ठरतात.
    पण मूर्खाचे शब्द त्याचा नाश ओढवतात.

13 मूर्ख माणूस मूर्ख गोष्टींनी सुरुवात करतो. शेवटी तर तो वेड्यासारख्या गोष्टी सांगायला लागतो. 14 मूर्ख माणूस नेहमी तो काय करणार आहे याबद्दल बोलत असतो. पण भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाच माहीत नसते. नंतर काय घडेल ते कोणीच सांगू शकत नाही.

15 मूर्ख माणूस घरी जाण्याचा रस्ता शोधून काढण्याइतका हुशार नसतो म्हणून
    त्याला आयुष्यभर कष्ट उपसावे लागतात.

कामाचे महत्व

16 राजा जर लहान मुलासारखा असला तर ते देशाच्या दृष्टीने फार वाईट असते. आणि जर राजे लोक आपला सर्व वेळ खाण्यात घालवत असतील तर तेही देशाच्या दृष्टीने वाईट असते. 17 पण राजा जर चांगल्या घराण्यातून [b] आलेला असेल तर ते देशाच्या दृष्टीने चांगले असते. आणि जर राजांनी आपल्या खाण्यापिण्यावर ताबा मिळवला तर तेही देशासाठी चांगले असते. ते राजे सशक्त होण्यासाठी खातात-पितात, नशा चढण्यासाठी नाही.

18 जर एखादा माणूस कामाच्या बाबतीत खूप आळशी असेल
    तर त्याचे घर गळायला लागेल आणि त्याचे छत कोसळून पडेल.

19 लोकांना खायला आवडते, आणि द्राक्षारस (मद्य) आयुष्य आनंदी करतो. पण पैसा अनेक समस्यांची उकल करतो.

अफवा

20 राजाबद्दल वाईट बोलू नका. त्याच्याबद्दल वाईट विचारसुध्दा करू नका. श्रीमंत लोकांबद्दलसुध्दा वाईट बोलू नका. तुम्ही तुमच्या घरात एकटेच असलांत तरी सुध्दा. का? कारण एक छोटासा पक्षी उडून जाईल व त्यांना तुम्ही काय काय बोलला ते सांगेल.

Footnotes:

  1. उपदेशक 10:4 जर तुम्ही … घोडचुकाही चुका शब्दश: “बरे करणारा मोठी पांपेसुध्दा नाहीशी करतो.” बरे करणारा म्हणजे जो क्षमाशील असतो आणि इतरांना मदत करतो असा माणूस.
  2. उपदेशक 10:17 चांगल्या घराण्यातून शब्दश: “स्वतंत्र लोकांचा मुलगा.” जो माणूस कधीच गुलाम आणि त्याचे आईवडिलही कधी गुलाम नव्हते.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes