A A A A A
Bible Book List

उत्पत्ति 4 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

पहिले कुटुंब

आदाम आणि त्याची बायको हव्वा यांचा लैगिक संबंध आला; हव्वा गर्भवती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव काइन असे ठेवले. तेव्हा हव्वा म्हणाली, “परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुषसंतान लाभले आहे.”

त्यानंतर हव्वेने आणखी एका बाळाला जन्म दिला. हा मुलगा म्हणजे काइनाचा भाऊ हाबेल होता. हाबेल मेंढपाळ झाला; काइन शेतकरी झाला.

पहिला खून

काही काळानंतर हंगामाचे वेळी काइनाने परमेश्वराला आदराने दान देण्यासाठी आपल्या शेतातील उत्पन्नातून काही अर्पण आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील काही मेंढरे देवाला अर्पण म्हणून आणली. त्याने मेंढरांचे सर्वात उत्तम भाग आणले.

परमेश्वराने हाबेलाचे अर्पण स्वीकारले. परतुं काइन आणि त्याचे अर्पण स्वीकारले नाही. यामुळे काइन फार दु:खी झाला व त्याला फार राग आला परमेश्वराने काइनाला विचारले, “तू का रागावलास? तुझा चेहरा दु:खी का दिसत आहे? तू जर चांगल्या गोष्टी करशील तर तुझे माझे संबंध चांगले राहतील, मग मी तुझा स्वीकार करीन; परंतु तू जर वाईट रीतीने चालशील तर ते पाप तुझ्यात राहील व ते पाप तुझ्यावर सत्ता चालवू पाहील; पण तू त्या पापावर सत्ता चालवली पाहिजेस.”

काइन आपला भाऊ हाबेल यास म्हणाला, “चल, आपण जरा शेतात जाऊ या.” तेव्हा काइनाने हाबेलाला बाहेर शेतात नेले. तेव्हा काइनाने आपला भाऊ हाबेल यावर हल्ला केला व त्याला ठार मारले.

काही वेळाने परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?”

काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; माझ्या भावावर नजर ठेवणे व त्याची काळजी घेणे हे माझे काम आहे काय?”

10 नंतर परमेश्वर म्हणाला, “तू हे काय केलेस? 11 तू तुझ्या भावाला ठार केलेस. त्याचे रक्त मला जमिनीतून हाका मारीत आहे; त्याचे रक्त तुझ्या हातातून घेण्यास भूमीने आपले तोंड उघडले आहे. ह्याच कारणाने तू शापित आहेस. भूमी तुला नकारेल. 12 पूर्वी तू जमिनीची मशागत केलीस आणि तिने तुला चांगले पीक दिले. पण आता तू मशागत करशील तरी ती भूमी तुला पीक देणार नाही. तू पृथ्वीवर एका ठिकाणी घर करुन राहणार नाहीस तर तू भटकत राहशील व परागंदा होशील.”

13 मग काइन म्हणाला, “ही शिक्षा मी सहन करु शकणार नाही इतकी भारी आहे. 14 पहा तू मला ह्या माझ्या भूमिवरुन दूर पाठवीत आहेस, मी तुला पाहू शकणार नाही किंवा तुझ्या जवळ मला येता येणार नाही; मला घरदार असणार नाही. या पृथ्वीवर तू मला ठिकठिकाणी भटकणे व परागंदा होणे लादले आहेस. मी जर कोणाच्या हाती सापडेन तर तो मला ठार मारुन टाकेल.”

15 मग परमेश्वर काइनास म्हणाला, “मी असे घडू देणार नाही. कारण तुला जर कोणी ठार मारील तर त्याला मी कितीतरी अधिक पटीने शिक्षा देईन.” मग काइनाला कोणी मारु नये म्हणून परमेश्वराने त्याच्यावर एक विशिष्ठ खूण केली.

काइनाचे घराणे

16 काइन परमेश्वरा समोरुन निघून गेला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात जाऊन राहिला.

17 काइन आपल्या पत्नीजवळ जाऊन निजला तेव्हा ती गर्भवती होऊन तीने हनोख नावाच्या मुलाला जन्म दिला; काइनाने एक नगर बांधले तेव्हा त्याने त्या नगराला आपल्या मुलाचेच हनोख हे नाव दिले.

18 हनोखाला हराद नावाचा मुलगा झाला; हरादाला महूयाएल झालां महूयाएलास मथुशाएल झाला; आणि मथुशाएलास लामेख झाला.

19 लामेखाने दोन बायका केल्या. पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला. 20 आदाने याबालास जन्म दिला; तो तंबूत राहाणाऱ्या व गुरेढोरे पाळणाऱ्या लोकांचा मूळ पुरुष झाला. 21 आदाला आणखी एक मुलगा झाला. (त्याचे नाव युबाल; हा याबालाचा भाऊ); युबाल तंतुवाद्दे, व वायुवाद्दे म्हणजे वीणा व बासरी वाजविणाऱ्या कलावंताचा मूळ पुरुष झाला. 22 सिल्ला हिला तुबल-काइन झाला; तो तांब्याची व लोखंडाची कामे करणाऱ्या लोकांचा मूळ पुरुष झाला. तुबल काइनास नामा नावाची बहीण होती.

23 लामेख आपल्या बायकांना म्हणाला,

“आदा आणि सिल्ला माझी वाणी ऐका;
    लामेखाच्या बायकांनो, मी ज्या गोष्टी बोलतो तिकडे कान द्या;
एका माणसाने मला जखमी केले, तेव्हा मी त्याला ठार मारले,
    एका तरुणाने मला मारले म्हणून मी त्याला ठार केले.
24 काइनाला मारणाऱ्याला खूप खूप शिक्षा होईल
    तर मग मला मारणाऱ्याला त्याहीपेक्षा आधिकात अधिक शिक्षा होईल.”

25 आदाम पुन्हा पत्नीजवळ गेला. आणि तिला मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव शेथ असे ठेवले हव्वा म्हणाली, “काइनाने हाबेलास ठार केले म्हणून देवाने मला दुसरा मुलगा दिला.” 26 शेथलाही मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करु लागले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes