A A A A A
Bible Book List

उत्पत्ति 35 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

बेथेलमध्ये याकोब

35 देव याकोबाला म्हणाला, “तू बेथेल या नगरात जाऊन राहा; आणि तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना त्या ठिकाणी ज्याने तुला दर्शन दिले त्या ‘एल’ (म्हणजे इस्राएलाचा देव) याची आठवण कर व त्याच देवाची उपासना करण्यासाठी तेथे एक वेदी बांध.”

तेव्हा याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्याबरोबरच्या सगळ्या दासांना म्हणाला, “तुमच्या जवळ असलेले लाकडांचे व धातूंचे परके देव फोडून तोडून टाका; तुम्ही स्वतःला शुद्ध करा; स्वच्छ कपडे घाला; आपण येथून निघून बेथेलास जाऊ; मी त्रासात व संकटात असताना ज्याने मला मदत केली त्या देवासाठी मी तेथे तेथे माझ्याबरोबर असत आला आहे.”

तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या जवळ असलेले सर्व परके देव आणून याकोबाला दिले आणि त्यांनी आपल्या कानातील कुंडलेही काढून दिली; तेव्हा याकोबाने त्या सर्व वस्तू शखेम नावाच्या नगराजवळील एका एला झाडाच्या खाली पुरुन टाकल्या.

याकोब व त्याची मुले यांनी ठिकाण सोडले. त्या भागात राहाणाऱ्या लोकांना त्याचा पाठलाग करुन त्यांना ठार मारावयास पाहिजे होते परंतु त्यांना फार भीती वाटली [a] म्हणून त्यांनी याकोबाचा पाठलाग केला नाही. अशा रीतीने याकोब व त्याचे लोक कनान देशात लूज येथे पोहोंचले; त्यालाच आता बेथेल म्हणतात. याकोबाने तेथे एक वेदी बांधली, व त्या ठिकाणाचे नाव “एल बेथेल” असे ठेवले; याकोबाने या जागेसाठी हे नाव निवडले कारण आपला भाऊ एसाव याजपासून पळून जाताना ह्याच जागी प्रथम देवाने त्याला दर्शन दिले होते.

रिबकेची दाई दबोरा ह्या ठिकाणी मरण पावली तेव्हा त्यांनी तिला बेथेल येथे एका एला झाडाच्या खाली पुरले; त्या जागेचे नाव त्यांनी अल्लोन बाकूथ असे ठेवले.

याकोबाचे नवे नांव

पदन अराम येथून याकोब परत आल्यावर देवाने त्याला पुन्हा दर्शन देऊन आशीर्वाद दिला. 10 देव याकोबाला म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे मी ते बदलतो; तुला आता याकोब म्हणणार नाहीत तर तुझे नवे नाव इस्राएल असे असेल;” आणि म्हणून देवाने त्याला इस्राएल हे नाव दिले.

11 देव त्याला म्हणाला, “मी सर्व शक्तिमान देव आहे; तुला भरपूर संतती होवो आणि त्यांची वाढ होऊन त्यांचे एक महान राष्ट्र बनो. तसेच तुझ्यातून इतर राष्ट्रे व राजे निर्माण होवोत; 12 मी अब्राहाम व इसहाक यांना जो काही विशिष्ट देश दिला, तो आता मी तुला व तुझ्यामागे राहणाऱ्या तुझ्या संततीला देतो.” 13 मग देव तेथून निघून गेला. 14-15 मग याकोबाने तेथे स्मारक म्हणून दगडाचा एक स्तंभ उभा केला त्याने त्यावर पेयार्पण म्हणून द्राक्षारस व तेल ओतून तो पवित्र केला. तेव्हा हे एक विशेष ठिकाण झाले कारण येथेच देव याकोबाशी बोलला आणि म्हणून याकोबाने त्या ठिकाणाचे नाव बेथेल ठेवले.

प्रसूत होऊन राहेल मरते

16 याकोब व त्याच्या बरोबराचा लवाजमा म्हणजे त्याची, घरची मंडळी व इतर माणसे हे सर्व बेथेल येथून निघाले, ते इफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाच्या अगदी जवळ आले असताना तेथे पोहोंचण्यापूर्वी राहेलीस प्रसूती वेदना सुरु झाल्या. 17 परंतु राहेलीस यावेळी प्रसूती वेदनांचा अतिशय त्रास होत होता; त्याचवेळी राहेलीची सुईण तिची कठीण अवस्था पाहून तिला म्हणाली, “भिऊ नकोस राहेल, तू आणखी एका मुलास जन्म देत आहेस.”

18 त्या मुलास जन्म देताना राहेल मरण पावली परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव “बेनओनी” असे ठेवले; परंतु याकोबाने त्याचे नांव “बन्यामीन” असे ठेवले.

19 एक्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाला जाणाऱ्या वाटेजवळ राहेलीस पुरले 20 आणि याकोबाने तिच्या सन्मानाकरिता तिचे स्मारक म्हणून तिच्या कबरेवर एक दगडी स्तंभ उभा केला; तो स्तंभ आजपर्यंत तेथे कायम आहे. 21 त्यानंतर इस्राएलाने (याकोबाने) आपला पुढचा प्रवास चालू केला; आणि एदेर बुरुजाच्या अगदी दक्षिणे कडे आपला तळ दिला.

22 इस्राएल तेथे थोडा काळ राहिला, त्यावेळी रऊबेन, इस्राएलाची म्हणजे आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी निजला या विषयी इस्राएलाने ऐकले तेव्हा तो अतिशय संतापला.

इस्राएलाचे कुटुंब

याकोब (इस्राएल) यास बारा मुलगे होते.

23 लेआ हिचे मुलगे-याकोबाचा पाहिला मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहुदा, इस्साखार व जबुलून;

24 राहेल हिचे मुलगे-योसेफ व बन्यामीन;

25 राहेलीची दासी बिल्हा हिचे मुलगे-दान व नफताली;

26 आणि लेआची दासी जिल्पा हिचे मुलगे गाद आशेर पदन अरामात झाले.

27 याकोब मग “किर्याथ अरबा” (म्हणजे “हेब्रोन”) येथीन मम्रे या ठिकाणी आपला बाप इसहाक याजकडे गेला. येथेच अब्राहाम व इसहाक हे राहिले होते. 28 इसहाक एकशे ऐंशी वर्षे जगला. 29 आणि दीर्घ आयुष्यानंतर तो अशक्त होऊन मरण पावला. त्याचे मुलगे एसाव व याकोब यांनी त्याला त्याच्या बापाला पुरले होते त्याच जागी पुरले.

Footnotes:

  1. उत्पत्ति 35:5 भीती वाटली देवाकडच्या भीतीचा त्यांच्यावर वर्षाव झाला.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes