A A A A A
Bible Book List

उत्पत्ति 30 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

30 याकोबापासून आपल्याला मुले होत नाहीत हे पाहिल्यावर राहेल आपली बहीण लेआ हिचा मत्सर करु लागली; तेव्हा राहेल याकोबला म्हणाली, “मला मुले देणारी करा नाही तर मी मरेन.”

याकोब राहेलीवर रागावला; तो म्हणाला, “तुला पुत्रवती करायला मी काय देव आहे? देवानेच तुला मुले होऊ नयेत असे करुन ठेवले आहे.”

मग राहेल म्हणाली, “तुम्ही माझी दासी बिल्हा उपपत्नी म्हणून घ्या; तुम्ही तिच्याजवळ निजा; मग ती माझ्या मांडीवर बाळंत होईल व तिजपासून मला मूल मिळेल; तिच्यामुळे मग मलाही मुलगा होईल आणि मी आई होईन.”

तेव्हा राहेलीने बिल्हा आपला नवरा याकोब ह्याला उपपत्नी म्हणून दिली; आणि याकोब तिजपाशी गेला; तेव्हा बिल्हा याकोबापासून गरोदर राहिली व तिला मुलगा झाला.

राहेल म्हणाली, “देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. त्याने मला मुलगा देण्याचे ठरवले;” म्हणून तिने त्याचे नाव दान ठेवले.

बिल्हा पुन्हा गर्भवती झाली व तिला याकोबापासून दुसरा मुलगा झाला; राहेल म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी जिद्दीने स्पर्धा करुन कठीन लढा दिला आहे व जय मिळवला आहे.” तेव्हा तिने त्याचे नाव नफताली ठेवले.

लेआने असे पाहिले की, आता आपल्याला आणखी मुले होणार नाहीत; तेव्हा तिने आपली दासी जिल्पा हीला आपला नवरा याकोब याला उपपत्नी म्हणून दिली. 10 नंतर जिल्पाला मुलगा झाला; 11 तेव्हा लेआ म्हणाली, “मी कितीतरी भाग्यवान आहे;” तेव्हा तिने त्याचे नाव गाद ठेवले. 12 जिल्पाला आणखी एक मुलगा झाला; 13 तेव्हा लेआ म्हणाली, “आता मला खूप आनंद झाला आहे! इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील” मग तिने त्याचे नाव आशेर ठेवले.

14 गव्हाच्या हंगामाच्या दिवसात रुबेन शेतात गेला असता त्याला काही विशेष प्रकारची फुले सांपडली [a] त्याने ती फुले आपली आई लेआ हिच्याकडे आणून दिली; परंतु राहेल लेआला म्हणाली, “तुझा मुलगा रुबेन याने आणलेल्या पुत्रदात्रीच्या फुलातून काही फुले कृपा करुन मला दे.”

15 लेआने उत्तर दिले, “अगोदरच तू माझा नवरा घेतलास तर घेतलास, आणि आता माझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुलेही तू माझ्याकडून घेण्याचा प्रयत्न करतेस काय?”

परंतु राहेल म्हणाली, “जर तुझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुले मला देशील तर त्यांच्या मोबदल्यात आज रात्री तुला याकोबापाशी निजावयाला मिळेल.”

16 याकोब शेतावरुन त्या रात्री घरी आला; लेआने त्याला पाहिले व ती त्याला भेटावयास बाहेर गेली; व ती म्हणाली, “आज रात्री तुम्ही माझ्याजवळ निजणार आहात कारण माझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुले राहेलीस देऊन मी त्यांचा मोबदला भरुन दिला आहे.” तेव्हा याकोब त्या रात्रीं लेआपाशी निजला.

17 तेव्हा देवाने लेआची कूस फलदायी केली व ती पुन्हा गर्भवती होऊन तिला पाचवा मुलगा झाला; 18 लेआ म्हणाली, “देवाने माझ्या कृत्याचे मला बक्षीस दिले आहे कारण मी माझी दासी माझ्या नवऱ्याला दिली.” तेव्हा लेआने आपल्या मुलाचे नाव इस्साखार ठेवले.

19 लेआ पुन्हा गरोदर राहिली व तिला सहावा मुलगा झाला. 20 ती म्हणाली, “देवाने मला उत्तम देणगी दिली आहे; आता मात्र माझा नवरा प्रेमाने माझा स्वीकार करील कारण मी त्याला सहा मुलगे दिले आहेत;” म्हणून लेआने त्याचे नाव जबुलून ठेवले.

21 त्यानंतर लेआला एक मुलगी झाली; तिने तिचे नाव दीना ठेवले.

22 मग देवाने राहेलीची प्रार्थना ऐकली; देवाने तिला मुल होणे शक्य केले; 23 म्हणून राहेल गर्भवती झाली व तिला मुलगा झाला; 24 राहेल म्हणाली, “देवाने माझी लाजीरवाणी स्थिती दूर करुन मला मुलगा दिला आहे.” म्हणून राहेलीने त्याचे नाव योसेफ ठेवले.

याकोब लाबानास फसवितो

25 मग योसेफाच्या जन्मानंतर याकोब लाबानाला म्हणाला, “आता मला माझ्या स्वतःच्या घरी जाऊ द्या. 26 मला माझ्या बायका व माझी मुले द्या; मी कष्टाने तुमची सेवाचाकरी करुन ती मिळवली आहेस, मी चौदा वर्षे तुमची चांगली सेवा केली आहे हे तुम्ही जाणता.”

27 लाबान म्हणाला, “थांब, तुझी इच्छा असेल तर मला थोडे बोलू दे. परमेश्वराने केवळ तुझ्यामुळे मला आशीर्वादित केले आहे हे मी जाणतो. 28 तर मी तुला काय वेतन देऊ हे मला सांग म्हणजे ते मी तुला देईन.”

29 याकोबाने उत्तर दिले, “मी अतिशय कष्टाने तुमची सेवाचाकारी केली आहे हे तुम्ही जाणता; आजपर्यंत मी काळजी घेतल्यामुळे तुमचे कळप वाढले आहेत व ते चांगले पोसलेले आहेत; 30 मी जेव्हा तुमच्याकडे आलो तेव्हा तुम्हापाशी फार थोडी शेरडेमेंढरे होती; परंतु आता तुम्हापाशी किती तरी कळप आहेत; ज्या ज्या वेळी मी तुमच्यासाठी काही केले त्या प्रत्येक वेळी परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे. आता मात्र मी स्वतःसाठी काही करण्याची व माझ्यासाठी घर बांधण्याची वेळ आली आहे.”

31 लाबानेने विचारले, “तर मग मी तुला काय देऊ?”

याकोबाने उत्तर दिले, “तुम्ही मला काही द्यावे असे मला नको आहे. मला फक्त मी केलेल्या सेवाचाकरीचा मोबदला पाहिजे; एकढी एकच गोष्ट करा, म्हणजे मग मी पूर्वीप्रमाणे आपले कळप चारीन व सांभाळीन; 32 परंतु आजच मला तुमच्या सगळ्या कळपात जाऊ द्या म्हणजे त्यांच्यात फिरुन त्यातील मेंढरापैकी ठिबकेदार व पट्टे असलेली मेंढरे व बकरे आणि काळ्या रंगाची मेंढरे तसेच शेरडांपैकी ठिबकेदार व पट्टे असलेली शेरडे मी बाजूला करीन; हेच माझे वेतन असेल. 33 त्यानंतर कधीही तुम्ही पाहाल तर मी प्रामाणिक आहे किंवा नाही हे सहज तुम्हाला दिसेल, तुम्ही कधीही येवून माझे कळप पाहू शकात; जर त्यात तुम्हाला ठिबकेदार व पट्टे नसलेली शेरडे व काळी नसलेली मेंढरे आढळली तर ती मी चोरली असे तुम्हाला समजेल.”

34 लाबानाने उत्तर दिले, “ठीक आहे, हे मी मान्य करतो; तू म्हणतोस तसे आपण करु;” 35 परंतु त्याच दिवशी लाबानाने ठिबकेदार व बांडे एडके तसेच ठिबकेदार व बांड्या शेळ्या आणि मेंढरापैकी काळी मेंढरे कळपातून काढून लपवली; गुपचूप ती आपल्या मुलांच्या हवाली केली व त्यांवर लक्ष ठेवून त्यांना सांभाळण्यास सांगितले; 36 तेव्हा त्याच्या मुलांनी ती ठिबकेदार व पट्टे असलेली सर्व जनावरे घेऊन मजला करीत तीन दिवसांच्या अंतरावरील दुसऱ्या जागी नेली; याकोब मात्र मागे राहून उरलेली म्हणजे ठिबके पट्टे व काळी नसलेली जनावरे सांभाळीत राहिला.

37 मग याकोबाने हिवर व बदाम या झाडांच्या हिरव्या कोवळ्या फांद्या कापून घेतल्या; त्याने त्यांच्या साली, त्याचे आतील पांढरे पट्टे दिसेपर्यंत त्या सोलून काढल्या; 38 त्याने त्या पांढऱ्या काळ्या किंवा पांढरे फोक कळपांच्या समोर पाणी पिण्याच्या पन्हाळात व कुंड्यात ठेवले जेव्हा शेळ्या मेंढ्या पाणी पिण्यास तेथे येत तेव्हा त्यांच्यावर त्याचे नर उडत व त्या फळत 39 तेव्हा त्यांना ठिबकेदार, पांढऱ्या पट्टयांची किंवा काळी करडे कोकरे होत असत.

40 याकोब कळपातील इतर जनावरातून ठिबकेदार, पांढऱ्या पट्टयांची व काळी करडे कोंकरे लाबानाच्या कळपापासून वेगळी करुन ठेवत असे. 41 जेव्हा जेव्हा कळपातील चांगली पोसलेली जनावरे फळत असत तेव्हा तेव्हा याकोब त्या पांढऱ्या फांद्या त्यांच्या नजरे समोर ठेवी आणि मग ती जनावरे त्या फांद्या समोर फळत; 42 परंतु जेव्हा दुर्बल, अशक्त जनावरे फळत तेव्हा याकोब त्यांच्या नजरे समोर त्या झाडांच्या फांद्या ठेवत नसे; म्हणून मग अशक्त नरमाद्यापासून झालेली करडी कोंकरे लाबानाची होत; आणि सशक्त नरमाद्यापासून झालेली करडी कोंकरे याकोबाची होत; 43 अशा प्रकारे याकोब अतिशय श्रीमंत झाला; त्याच्यापाशी शेरडेमेंढरे, उंट, गाढवे व दासदासी हे सर्व भरपूर होते.

Footnotes:

  1. उत्पत्ति 30:14 सांपडली ही फुले खाल्यावर वांझ स्त्रियांना मुले होतात अशी लोकांची समजूत होती; त्यांनाच दुसरे नांव “प्रेमाचे रोपटे” किंवा “पुत्रदात्री.”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes