A A A A A
Bible Book List

उत्पत्ति 3 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

पापाची सुरवात

परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय धूर्त आणि हुषार होता. त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती. त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला, “स्त्रिये, बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय?”

स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, “नाही. देवाने तसे म्हटले नाही बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो. परंतु असे एक झाड आहे की ज्याचे फळ आम्ही खाता कामा नये देवाने आम्हाला सांगितले, ‘बागेच्या मधोमध असलेल्या झाडाचे फळ तुम्ही मुळीच खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करु नका. नाहीतर तुम्ही मराल.’”

परंतु सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही. कारण देवाला हे माहीत आहे की जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल तर बरे व वाईट काय आहे हे तुम्हांला समजेल आणि तुम्ही देवासारखे व्हाल.”

स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यात सुंदर, त्याचे फळ खाण्यास चांगले व शहाणपण देणारे आहे म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले व खाल्ले. तिचा नवरा तिच्याबरोबर तेथे होता; तेव्हा तिने त्या फळातून त्याला थोडे दिले व त्याने ते खाल्ले.

तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहो असे त्यांस समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपासाठी काही वस्त्रे तयार केली व ती घातली.

संध्याकाळी परमेश्वर बागेत फिरत होता. त्यावेळी आदामाने आणि त्याच्या बायकोने परमेश्वराचा आवाज ऐकला. आणि त्याच्या नजरेस पडू नये म्हणून ती दोघे परमेश्वरापासून बागेच्या झाडात लपली. तेव्हा परमेश्वराने आदामाला हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस?”

10 तो म्हणाला, “बागेत मी तुझ्या चालण्याचा आवाज ऐकला व मला भीती वाटली कारण मी नग्न होतो आणि म्हणून मी लपलो.”

11 परमेश्वर त्याला म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या विशेष झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”

12 आदाम म्हणाला, “तू ही स्त्री माझ्यासाठी मदतनीस म्हणून दिली, तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.”

13 मग परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाला, “तू हे काय केलेस?”

ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घालून फसविले व म्हणून मी ते फळ खाल्ले.”

14 म्हणून परमेश्वर सर्पाला म्हणाला,

“तू हे फार वाईट केलेस म्हणून
    तुझे पण वाईट होईल.
तू हे केलेस म्हणून इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा
    तू अधिक शापित आहेस.
तू पोटाने सरपटत चालशील
    आणि आयुष्यभर तू माती खाशील
15 तू व स्त्री, यांस मी
    एकमेकांचे शत्रु करीन.
तुझी संतती आणि तिची संतती एकमेकाचे
    शत्रू होतील तिच्या संततीच्या पायाची
तू टाच फोडशील पण
    तो तुझे डोके ठेचील.”

16 नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाला,

“तू गरोदर असताना
    तुला त्रास होईल
आणि मुलांना जन्म देते वेळी
    तुला खूप वेदना होतील.
तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील;
    आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.”

17 नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला,

“त्या विशेष झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा दिली होती
    परंतु तू तुझ्या बायकोने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास आणि त्या झाडाचे फळ खाल्लेस.
तेव्हा मी तुझ्यामुळे भूमीला शाप देत आहे.
    तू तिजपासून अन्न मिळविण्यासाठी जन्मभर अतिशय कष्ट करशील;
18 जमीन तुझ्यासाठी काटेकुटे वाढवेल
    आणि शेतातल्या रानटी वनस्पती तुला खाव्या लागतील.
19 तू अतिशय श्रम करुन निढळाच्या घामाने भाकर मिळविशील
    तू मरायच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील.
आणि नंतर तू पुन्हा माती होशील, मी
    तुला मातीतून उत्पन्न केले आहे;
आणि तू मरशील तेव्हा
    परत मातीला जाऊन मिळशील.”

20 आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले. या जगात जन्म घेणाऱ्या सर्व माणसांची ती आई आहे म्हणून आदामाने तिला हे नाव दिले.

21 परमेश्वराने आदाम व त्याची बायको हव्वा यांच्यासाठी जनावराच्या चामड्यांची वस्त्रे केली; आणि ती त्यांना घातली.

22 परमेश्वर म्हणाला, “पाहा, मनुष्य आपल्या सारखा झाला आहे. त्याला बरे व वाईट समजते. तर आता कदाचित जीवनांच्या झाडावरुन तो फळ घेईल आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जीवंत राहील.”

23 तेव्हा परमेश्वराने मनुष्याला ज्या जमिनीतून उत्पन्न केले होते तिची मशागत करण्यासाठी एदेन बागेतून बाहेर घालवून दिले. 24 परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बाग सोडण्याठी भाग पाडले. नंतर परमेश्वराने एदेन बागेची राखण करण्यासाठी बागेच्या पूर्वेकडे करुब देवदूतांना पहारा करण्यास ठेवले. तसेच तेथे जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गचे रक्षण करण्यासाठी गरगर फिरणारी अरनीची एक तलवार ठेवली.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes