Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

“ईयोब, हवे तर तू कुणाला हाक मार.
    पण तुला कुणीही ओ देणार नाही.
    देवदूतांपैकी कुणाकडेही तू वळू शकत नाहीस.
मुर्खाचा अनावर राग त्याला मारुन टाकतो.
    मूर्खाचा संतापच त्याचा घात करतो.
अगदी वैभवात असेल असे ज्याबद्दल वाटले असा एक मूर्ख मला दिसला
    पण अचानक त्याचा घात झाला. [a]
त्याच्या मुलांना कुणीही मदत करु शकले नाही.
    कोर्टात त्यांच्या बाजूने लढायला कुणीही नव्हते.
भुकेल्या माणसांनी त्याची उभी पिके खाऊन टाकली.
    काट्याकुट्यात वाढलेले धान्यही त्यांनी सोडले नाही.
    लोभी माणसांनी सर्व काही नेले.
वाईट दिवस धुळीतून येत नाहीत
    आणि संकटे मातीतून उगवत नाहीत.
अग्रीतून ठिणग्या उडतात
    तशी संकटे झेलण्यासाठीच माणूस जन्माला येतो.
पण ईयोब, मी जर तुझ्या जागी असतो तर देवाकडेच गेलो असतो.
    त्याला माझे गाऱ्हाणे सांगितले असते.
देव ज्या आश्र्चर्यकारक गोष्टी करतो त्या माणसाला समजत नाहीत.
    त्याच्या अद्भुत गोष्टींची सीमा नाही.
10 देव पृथ्वीवर पाऊस आणतो.
    शेतांना पाणी देतो.
11 तो नम्र लोकांना उच्चस्थानी बसवतो
    आणि दु:खी जीवांना खूप आनंदी करतो.
12 देव धूर्तांचे कार्य बंद पाडतो
    आणि त्यांना सफलता मिळू देत नाही.
13 तो विद्वानांना त्यांच्याच कचाट्यात पकडतो त्यामुळे त्यांचे कार्य सिध्दीस जात नाही.
    मसलत फुकट जाते ते दिवसासुध्दा ठेचाळतात.
14 ते धूर्त, भर दिवसासुध्दा अडखळतात.
    भर दुपारच्या वेळेला ते आंधळ्यासारखे त्यांचा रस्ता चाचपडत जातात.
15 देव गरीबांना मरणापासून वाचवतो.
    त्यांची धूर्ताच्या कचाट्यातून मुक्तता करतो.
16 म्हणूनच गरीबांना आशा वाटते.
    देव अन्यायी लोकांना नष्ट करतो.
17 “देव ज्याला चांगल्या मार्गावर आणतो तो नशीबवान होय.
    म्हणून सर्वशक्तिमान देवाच्या शिक्षेबद्दल तक्रार करु नकोस.
18 देव त्याने केलेल्या जखमांवर
    मलमपट्टी करतो.
तो दुखापत करतो
    पण त्याचे हात ती बरी करतात.
19 देव तुला सहा प्रकारच्या संकटांतून तारील.
    आणि सात संकटांत तुला काहीही अपाय होणार नाही.
20 दुष्काळात देव
    तुला मृत्यूपासून वाचवेल
आणि युध्दातही तो तुझे
    मृत्यूपासून रक्षण करेल.
21 लोक त्यांच्या धारदार जिभेने तुझ्याबद्दल वाटेल
    ते बोलतील परंतु देव तुझे रक्षण करेल.
जेव्हा काही वाईट घडेल तेव्हा
    तुला घाबरुन जाण्याची गरज नाही.
22 तू विनाशात व दुष्काळात हसशील.
    तुला रानटी पशूंची भीती वाटणार नाही.
23 तू देवाशी करार केला आहेस तेव्हा मैदानातले खडकही तुझ्या या करारात सहभागी आहेत.
    रानटी पशूही तुझ्याशी सलोखा करतील.
24 तू शांती व समाधानात राहशील
    कारण तुझा तंबू सुरक्षीत आहे.
तू तुझ्या संपत्तीची मोजदाद केलीस तर
    तुला त्यात काही कमतरता आढळणार नाही.
25 तुला खूप मुले असतील.
    पृथ्वीवर जितकी गवताची पाती आहेत तितकी मुले तुला असतील.
26 हंगामाच्या वेळेपर्यंत वाढणाऱ्या गव्हासारखा तू असशील.
    हो तू अगदी म्हातारा होईपर्यंत जगशील.

27 “ईयोब, आम्ही या साऱ्यांचा अभ्यास केला आहे आणि ते सर्व खरे आहे.
    म्हणून तू आमचे ऐक. आणि त्यातून स्वतःसाठी काही शिक.”

Notas al pie

  1. ईयोब 5:3 घात झाला किंवा “त्याच्या घराला अवचित शाप मिळाला.”