A A A A A
Bible Book List

ईयोब 29 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

ईयोब त्याचे बोलणे चालू ठेवतो

29 ईयोबाने बोलणे सुरु ठेवले तो म्हणाला:

“काही महिन्यांपूर्वी देव जसा माझ्यावर लक्ष ठेवून होता आणि माझी काळजी घेत होता,
    तसेच माझे आयुष्य आताही असते तर किती बरे झाले असते.
तेव्हा देवाचा प्रकाश माझ्यावर प्रकाशत होता आणि मला अंधारातून चालताना प्रकाश दाखवत होता.
    तसेच आताही असायला हवे होते असे मला वाटते.
मी जेव्हा यशस्वी होतो आणि देव माझा मित्र होता त्या दिवसांची मी आशा करतो.
    त्या दिवसात माझ्यावर देवाचे कृपाछत्र होते.
जेव्हा सर्वशक्तिमान देव माझ्याबरोबर होता
    आणि माझी मुले माझ्या जवळ होती त्या दिवसांची मी आशा धरतो.
त्या दिवसांत माझे आयुष्य अतिशय चांगले होते.
    मी माझे पाय मलईत धूत असे.
    माझ्याकडे उत्तम प्रकारची पुष्कळ तेले होती.

“त्या दिवसांत मी नगराच्या वेशीपर्यंत जात असे
    आणि नगरातल्या वृध्दांबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसत असे.
सगळे लोक मला मान देत.
मला येताना बघून तरुण माझ्या वाटेतून बाजूला होत आणि वृध्द उठून उभे राहात.
    मला आदर देण्यासाठी ते उठून उभे राहात असत.
लोकप्रमुख बोलणे थांबवीत
    आणि इतरांना शांत राहाण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत.
10 महत्वाचे लोक सुध्दा बोलताना त्यांचा आवाज लहान करीत.
    होय, तेव्हा त्यांची जीभ टाळूला चिकटण्यासाखी वाटे.
11 लोक माझ्या बोलण्याकडे लक्ष देत.
    आणि माझ्याबद्दल चांगले बोलत असत.
    मला भेटणारा प्रत्येकजण माझी स्तुती करी.
12 का? कारण जेव्हा एखादा गरीब मदतीची याचना करायचा तेव्हा मी त्याला मदत करीत असे
    आणि पोरक्या मुलाकडे लक्ष द्यायला कुणी नसले तर मी मदत करीत असे.
13 मृत्युपंथाला लागलेला माणूस मला आशीर्वाद देत असे.
    मी गरजू विधवांना मदत करीत असे.
14 सत्याने जगणे म्हणजे जणू माझे वस्त्र होते.
    माझे योग्य वागणे म्हणजे माझा अंगरखा आणि डोक्यावरची पगडी होती.
15 मी आंधळ्यांची दृष्टी होतो. त्यांना जिथे जायचे असेल तिथे मी नेत असे.
    मी अपंगांचे पाय होतो त्यांना हवे तिथे मी उचलून नेत असे.
16 गरीब लोकांना मी वडिलांसारखा वाटत असे.
    मला माहीत नसलेल्या लोकांनादेखील मी मदत करीत असे.
    मी कोर्टात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करीत असे.
17 मी दुष्ट लोकांचे सामर्थ्य नष्ट केले.
    मी निरपराध लोकांचा त्यांच्यापासून बचाव केला.

18 “मला नेहमी वाटायचे मी खूप वर्षे जगेन,
    मला स्वतःच्या घरातच मृत्यू येईल.
19 मी खूप पाणी शोषून घेऊ शकणारी मुळे असलेल्या व ज्याच्या फांद्या दवाने ओल्या झालेल्या आहेत
    अशा झाडासारखा असेन, असे मला वाटत असे.
20 मला रोज नवतरुण झाल्यासारखे वाटत असे.
    रोज नवीन बाण सोडण्याइतकी शक्ती आपल्यात आहे असे मला वाटत असे.

21 “पूर्वी लोक माझे ऐकत असत
    माझ्या उपदेशाची वाट पाहात ते शांत बसत.
22 मी माझे बोलणे संपवल्यानंतर ऐकणाऱ्यांना आणखी काही बोलायचे नसे.
    माझे शब्द त्यांच्या कानावर हळूवारपणे पडत.
23 पावसाची वाट पाहिल्यासारखी ते माझ्या बोलण्याची वाट पाहात.
    वसंतातल्या पावसासारखे ते माझे शब्द पिऊन टाकत.
24 काही लोकांनी आशा सोडून दिली होती.
    त्यांचे धैर्य खचले होते.
परंतु मी त्यांच्याबरोबर हसलो.
    माझ्या हास्याने त्यांना बरे वाटले.
25 मी त्यांचा प्रमुख असूनही त्यांच्याबरोबर राहाण्याचे ठरवले.
    आपल्या सैन्याबरोबर तळ ठोकून बसलेल्या राजासारखा दु:खी असलेल्यांचे सांत्वन करणाऱ्या राजासारखा मी होतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes