A A A A A
Bible Book List

अनुवाद 31 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

नवा नेता यहोशवा

31 मग मोशेने सर्व इस्राएलांना ह्या गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “मी आता एकशेवीस वर्षाचा आहे. माझ्याने आता तुमचे नेतृत्व होत नाही. शिवाय ‘यार्देन नदीपलीकडे जायचे नाही असे,’ परमेश्वरानेही मला सांगितले आहे. तुमचा देव परमेश्वर हा तुम्हांला साथ देईल. तुमच्यासाठी तो इतर राष्ट्रांना पराभूत करील. त्यांच्याकडून तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घ्याल. पण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशवा तुमचे नेतृत्व करील.

“अमोऱ्यांचे राजे सीहोन आणि ओग यांचा परमेश्वराने संहार केला. तसेच तो याही वेळी तुमच्यासाठी करील. या राष्ट्रांचा पराभव करण्यात परमेश्वराचे तुम्हाला साहाय्य होईल. पण त्यावेळी, मी सांगितले तसे तुम्ही वागले पाहिजे. शौर्य दाखवा. खंबीर पणाने वागा. त्या लोकांची भीती बाळगू नका! कारण प्रत्यक्ष तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही, तुमची साथ सोडणार नाही”

मग मोशेने यहोशवाला बोलावले. सर्वांसमक्ष त्याला सांगितले, “खंबीर राहा आणि शौर्य गाजव. या लोकांच्या पूर्वजांना परमेश्वराने जी भूमी द्यायचे कबूल केले आहे, तेथे तू त्यांना नेणार आहेस. ती काबीज करायला या इस्राएलांना तू मदत कर. परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्यापुढेच चालणार आहे. तो तुम्हाला सोडून जाणार नाही, तुम्हाला अंतर देणार नाही. तेव्हा खचून जाऊ नका आणि निर्भय व्हा.”

मोशे शिकवण लिहून काढतो

नंतर मोशेने सर्व नियमशास्त्र लिहून याजकांना दिले. हे याजक लेवी वंशातील होते. परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश वाहण्याचे काम त्यांचे होते. इस्राएलच्या वडिलधाऱ्या लोकांनाही मोशेने हे नियमशास्त्र दिले. 10 मग मोशे वडीलधाऱ्या लोकांशी बोलला. तो म्हणाला, “दर सात वर्षांच्या अखेरीला म्हणजेच कर्ज माफीच्या ठराविक वर्षी मंडपाच्या सणाच्या वेळी ही शिकवण तुम्ही सर्वांना वाचून दाखवा. 11 यावेळी सर्व इस्राएलांनी तुमचा देव परमेश्वर ह्याने त्याच्यासाठी निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जमावे. तेव्हा त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने तुम्ही हे नियमशास्त्र वाचून दाखवावे. 12 पुरुष, बायका, लहान मुले, गावातील परकीय अशा सर्वांना यावेळी एकत्र आणावे. त्यांनी ही शिकवण ऐकावी, परमेश्वर देवाचा आदर करावा. शिकवणीचे जीवनात आचरण करावे. 13 ज्या पुढच्या पिढीला ही शिकवण माहीत नव्हती त्यांना ती माहीत होईल. लौकरच तुम्ही जो देश आपलासा करायला चालला आहात तेथे ही मुलेबाळेही तुमचा देव परमेश्वर ह्यच विषयी आदर बाळगतील.”

परमेश्वराचे मोशे व यहोशवाला बोलावतो

14 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा मृत्यू आता समीप आला आहे. यहोशवाला घेऊन दर्शनमंडपात ये. म्हणजे मी त्याला आज्ञा देईन.” तेव्हा मोशे व यहोशवा दर्शन मंडपात गेले.

15 दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वारी असलेल्या मेघस्तंभात परमेश्वर प्रगट झाला. 16 तो मोशेला म्हणाला, “तू आता लौकरच मरण पावशील व आपल्या पूर्वजांना भेटशील. तेव्हा हे लोक माझ्यापासून परावृत्त होतील. ते माझ्याशी केलेला पवित्र करार मोडतील. माझी साथ सोडून त्या देशातील इतर खोट्या दैवतांची पूजा करायला लागतील. 17 तेव्हा माझा त्यांच्यावर कोप होऊन मी त्यांना सोडून जाईन. मी त्यांना मदत करायचे नाकारल्याने त्यांचा नाश होईल. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यांच्यावर संकटे कोसळतील. तेव्हा ते म्हणतील की आपल्याला परमेश्वराची साथ नाही म्हणून आपल्यावर आपत्ती येत आहेत. 18 पण त्यांनी इतर दैवतांची पूजा केल्याने, दुष्कृत्ये केल्यामुळे मी त्यांना मदत करणार नाही.

19 “तेव्हा तुम्ही हे गीत लिहून घ्या व इस्राएल लोकांना शिकवा. त्यांच्याकडून ते तोंडपाठ करुन घ्या. म्हणजे इस्राएल लोकांविरुद्ध ही माझ्याबाजूने साक्ष राहील. 20 त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या भूमीत मी त्यांना नेणार आहे. ही भूमी दुधामधाने समृद्ध आहे. तेथे त्यांची अन्नधान्याची चंगळ होईल. ते संपन्न जीवन जगतील. पण मग ते इतर दैवतांकडे वळतील व त्यांची पूजा करतील. माझ्यापासून ते परावृत होतील व कराराचा भंग करतील. 21 त्यामुळे त्यांच्यावर आपत्ती कोसळतील. त्यांना अनेक अडचणी येतील. त्याही वेळी हे गीत त्यांच्यामुखी असेल आणि त्यांच्या चुकीची साक्ष त्यांना पटेल. मी त्यांना त्या भूमीत अजून नेलेले नाही. पण त्यांच्या मनात तेथे गेल्यावर काय काय करायचे या बद्दल जे विचार चालू आहेत ते मला अगोदरच माहीत आहेत.”

22 तेव्हा त्याचदिवशी मोशेने ते गीत लिहून काढले, आणि इस्राएल लोकांना ते शिकवले.

23 मग नूनचा मुलगा यहोशवा याला परमेश्वर म्हणाला, “हिंमत धर, खंबीर राहा. मी वचनपूर्वक देऊ केलेल्या प्रदेशात तू या इस्राएलांना घेऊन जाशील. मी तुझ्याबरोबर राहील.”

मोशे इस्राएलांना सावध करतो

24 मोशेने सर्व शिकवण काळजीपूर्वक लिहून काढल्यावर 25 लेवींना आज्ञा दिली. (लेवी म्हणजे परमेश्वर कराराचा कोश वाहणारे लोक.) मोशे म्हणाला, 26 “हा नियमशास्त्राचा ग्रंथ घ्या आणि परमेश्वराच्या कराराच्या कोशात ठेवा. तुमच्याविरुद्ध हा साक्ष राहील. 27 तुम्ही फार ताठर आहात हे मला माहीत आहे. तुम्ही आपलाच ठेका चालवता. मी तुमच्याबरोबर असतानाही तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड केले आहे. तेव्हा माझ्यामागेही तुम्ही तेच कराल. 28 तुमच्या कुळातील अंमलदार व महाजन यांना येथे बोलवा. स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने त्यांना मी चार गोष्टी सांगीन. 29 माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दुराचरण करणार आहात हे मला माहीत आहे. मी सांगितलेल्या मार्गापासून तुम्ही ढळणार आहात. त्यामुळे भविष्यात तुमच्यावर संकटे कोसळतील. कारण परमेश्वराने निषिद्ध म्हणून सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करणार आहात. तुमच्या दुष्कृत्याने तुम्ही परमेश्वराचा राग ओढवून घ्याल.”

मोशेचे गीत

30 सर्व इस्राएल लोक एकत्र जमल्यावर मोशेने हे संपूर्ण गीत त्यांच्यासमोर म्हटले

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes