A A A A A
Bible Book List

अनुवाद 3 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

बाशानातील लोकांशी संघर्ष

“मग आपण वळसा घेऊन बाशानच्या वाटेने निघालो. तेव्हा एद्राई येथे बाशानचा राजा ओग आणि त्याची सेना युद्धासाठी सामोरी आली. परमेश्वर मला म्हणाला, ‘ओगला भिऊ नका. तो, त्याची प्रजा आणि त्याची भूमी मी तुमच्याच हाती सोपवणार आहे. हेशबोनवर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सीहोन याचा पराजय केलात तसाच याचाही कराल.’

“आमचा देव परमेश्वर ह्याने बाशानचा राजा ओग आणि त्याची प्रजा आमच्या हाती दिली. आम्ही त्यांचा असा समाचार घेतला की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिले नाही. मग ओगच्या अखत्यारीतील सर्वच्या सर्व साठ नगरे म्हणजे अर्गेाबचा सारा प्रदेश घेतला. बाशानातले ओगचे राज्य ते हेच. या सर्व नगरांना भक्कम तटबंदी होती. त्यांना उंच भिंती, वेशी, मजबूत अडसर होते. याशिवाय तट नसलेली गावे पुष्कळच होती. हेशबोनच्या सीहोन राजाच्या नगरांप्रमाणेच येथेही आम्ही संहार केला. पुरुष, बायका, मुलंबाळं-कोणालाही म्हणून शिल्लक ठेवल नाही. गुरंढोरं आणि किंमती लूट मात्र घेतली.

“अशाच पद्धतीने अमोऱ्यांच्या दोन राजांच्या ताब्यातला प्रदेशही आपण घेतला. तो म्हणजे यार्देनच्या पूर्वेकडचा, आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा. (सीदोनी लोक या हर्मोन पर्वताला सिर्योन म्हणतात. पण अमोरी लोक सनीर म्हणतात.) 10 माळावरील सर्व नगरे, सगळा गिलाद प्रांत तसेच बाशानच्या ओगच्या राज्यातील सलका व एद्रई सकट सर्व प्रांत आपण काबीज केला.”

11 (रेफाईम लोकांपैकी बाशानचा राजा ओग तेवढा अजून जिवंत होता. त्याचा पलंग लोखंडाचा होता. तो पलंग तेरा फूट लांब आणि सहा फूट रुंद होता. अम्मोन्यांच्या रब्बा नगरात तो अजूनही आहे.)

यार्देन नदीच्या पूर्वेकडील वस्ती

12 “तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली. रऊबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला. तो असा-आर्णोन खोऱ्यातल अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे. 13 गिलादाचा उरलेला अर्धा भाग आणि संपूर्ण बाशान मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले.”

(बाशान म्हणजे ओगचे राज्य. त्याच्या एका भागाला अर्गोब म्हणतात. ह्यालाच रेफाईचा देशही म्हणतात. 14 मनश्शेचा मुलगा याईर याने गशूरी आणि माकाथी ह्यांचा सीमेपर्यंतचा अर्गोबचा सर्व प्रदेश हस्तगत केला. त्याच्या नावानेच तो भाग ओळखला जात असे. म्हणून आजही लोक त्याला याईरची नगरेच म्हणतात.)

15 “आणि गिलाद मी माखीराला दिला. 16 त्याचा पुढचा प्रदेश रऊबेनी आणि गादी यांना दिला. आर्णोन खोऱ्याच्या मध्यभागापासून अम्मोन्यांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत त्याची सरहद्द ठरवली. 17 पश्चिमेला यार्देन नदी. उत्तरेला गालिल सरोवर, पूर्वेला पिसागाची उतरण व त्याच्या तळाशी दक्षिणेला मृत समुद्र म्हणजेच क्षार समुद्र.

18 “त्यावेळी मी त्या सर्वांना आज्ञा दिली की यार्देन नदीच्या अलीकडचा हा प्रदेश तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हवाली केला आहे. पण तुमच्यापैकी सर्व लढाऊ पुरुषांनी पुढाकार घेऊन, हत्यारबंद होऊन आपल्या इस्राएली भाऊबंदाना पलीकडे घेऊन जावे. 19 तुमच्या बायका, मुलेबाळे आणि गायीगुरे (ती बरीच आहेत हे मला माहीत आहे) इथेच मी दिलेल्या प्रदेशात राहतील. 20 यार्देन नदी पलीकडचा प्रदेश इस्राएली बांधवांनी ताब्यात घेईपर्यंत त्यांना मदत करा. परमेश्वराच्या कृपेने ते तुमच्या प्रमाणे स्थिरस्थावर झाले की मग तुम्ही आपापल्या प्रदेशात परत या.

21 “मग मी यहोशवाला सांगितले, ‘या दोन राजांचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले हे तू पाहिलेच. पुढेही ज्या ज्या राज्यात तू जाशील त्या सर्वांचे परमेश्वर असेच करील. 22 तेथील राजांना घाबरु नका. कारण युद्धात तुमचा देव परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे.’

कनानमध्ये मोशेला प्रवेशबंदी

23 “मग मी माझ्यासाठी काहीतरी विशेष करण्यासाठी परमेश्वराची आळवणी केली. मी म्हणालो, 24 ‘परमेश्वरा, मी तुझा दास आहे. तुझ्या थक्क करुन टाकणाऱ्या पराक्रमाची तू मला फक्त चुणूक दाखवली आहेस. तुझ्यासारखे थोर प्रताप करणारा स्वर्गात किंवा पृथ्वीवर दुसरा कोण आहे? 25 तेव्हा कृपा करुन मला यार्देन नदी पलीकडची सुपीक भूमी, चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन पाहू दे.’

26 “पण तुमच्यापायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला होता. त्याने माझे म्हणणे ऐकले नाही. तो म्हणाला, ‘पुरे, आता एक शब्दही बोलू नको. 27 पिसगाच्या शिखरावर जा. आणि तेथून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारी दिशांना बघ. तेथून तुला सर्व काही दिसेल पण यार्देनच्या पलीकडे तू पाऊल ठेवू शकणार नाहीस. 28 यहोशवाला मात्र तू सूचना दे. त्याला उत्तेजन देऊन समर्थ कर. कारण तोच लोकांना पलीकडे नेईल. तू तो देश पाहशील पण यहोशवाच त्यांना ती जमीन राहाण्यासाठी मिळवून देईल.’

29 “आणि म्हणून आम्ही बेथ-पौराच्या समोरच्या खोऱ्यात राहिलो.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes