Add parallel Print Page Options

24 “एखाद्याला लग्नानंतर आपल्या बायकोच्या संबंधाने एखादी न आवडणारी गुप्त गोष्ट कळाली व ती त्याला आवडेनाशी झाली तर त्याने तिला घटस्फोट लिहून द्यावा. मग तिला घराबाहेर काढावे. त्याच्या घरातून बाहेर पडल्यावर हवे तर तिने दुसरे लग्न करावे. 3-4 त्यातून समजा असे झाले की या नवऱ्याचीही तिच्यावर इतराजी झाली आणि त्याने तिला घटस्फोट दिला तर मात्र त्याने तिला सोडल्यावर पुन्हा पहिल्या नवऱ्याने तिच्याशी लग्न करु नये. किंवा हा दुसरा नवरा वारला तरी पहिल्या नवऱ्याने पुन्हा तिच्याशी लग्न करु नये. कारण ती आता भ्रष्ट झालेली आहे. तिच्याशी पहिल्या नवऱ्याने पुन्हा लग्न करणे हे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने निंद्य आहे. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या या प्रदेशात असे पाप करु नका.

“एखाद्याचे नुकतेच लग्न झाले असेल तर त्याला सैन्यात मोहिमेवर पाठवू नये. तसेच त्याच्यावर विशेष कामगिरी सोपवू नये. नववधूला सुखी ठेवण्यासाठी वर्षभर घरीच राहण्याची मोकळीक त्याला द्यावी.

“कोणाला काही उसने दिल्यास त्याबद्दल जाते किंवा जात्याची तळी तारण म्हणून ठेवून घेऊ नये. नाहीतर त्याच्या तोंडचा घासच काढून घेतल्यासारखे होईल.

“कोणी आपल्या इस्राएली बांधवाला पळवले आणि गुलाम म्हणून त्याची विक्री केली तर त्या पळवणाऱ्या माणसाला ठार करावे व आपल्यामधून अशा दुष्कृत्याचे निर्मूलन करावे.

“कोणाला महारोग झाल्याचे आढळले तर लेवी याजकाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन करा. माझ्या आज्ञेप्रमाणे याजक सांगतील, ते ऐका. मिसरमधून बाहेर पडल्यावर पुढच्या प्रवासात मिर्यामेचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले ते चांगले लक्षात असू द्या.

10 “तुम्ही कोणाला कर्ज द्याल तेव्हा तारण मिळवायला त्याच्या घरात शिरु नका. 11 बाहेरच थांबा. मग तो आत जाऊन गहाण ठेवण्याची वस्तू घेऊन येईल. 12 तो फार गरीब असला तर दुसरे काहीच त्याच्याजवळ गहाण ठेवण्यासारखे नसल्यामुळे आपले गरम कपडे आणील. तर ते रात्रभर तुम्ही स्वतःजवळ ठेवू नका. 13 त्याला रोजच्या रोज संध्याकाळ झाली की देत जा म्हणजे त्याला पुरेसे अंथरुन पांघरुण मिळेल. त्याबद्दल तो तुम्हाला दुवा देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुमचे वागणे न्यायीपणाचे व उचित होय.

14 “तुमच्याकडे काम करणाऱ्या गरीब आणि गरजू नोकरांचे शोषण करु नका. मग तो इस्राएली बांधव असो की तुमच्या गावात राहणारा कोणी परकीय असो. 15 त्याला रोज सूर्यास्तापूर्वी त्याचा रोजगार देत जा. कारण हातावर पोट असल्यामुळे त्याचा उदरनिर्वाह या पैशावरच होतो. तुम्ही मजुरी दिली नाहीत तर तो परमेश्वराकडे आपले गाऱ्हाणे सांगेल आणि तुम्ही पापाचे धनी व्हाल.

16 “मुलांच्या वागणुकीची शिक्षा म्हणून आईवडलांना देहान्तशासन होऊ नये. तसेच आईवडलांच्या दुष्कृत्याची सजा म्हणून मुलांना ठार करु नये. ज्याच्या त्याच्या दुष्कृत्याची सजा ज्याला त्याला मिळावी.

17 “गावातील परकीय आणि अनाथ यांना उचित वागणूक मिळावी. विधवेचा कपडालत्ता गहाण ठेवून घेऊ नये. 18 मिसरमध्ये तुम्ही गरीब गुलाम होतात आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला तेथून सोडवून मुक्त केले हे लक्षात ठेवा. दीन दुबळ्यांशी असे वागा हे मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगत आहे.

19 “शेतातील पीक कापताना एखादी पेंढी तिथेच राहिली तर ती आणायला परत जाऊ नका. अनाथ, उपरे विधवा ह्यांच्यासाठी ती राहू द्या. त्यांना थोडे धान्य मिळाले तर तुम्हांला तुमच्या प्रत्येक कार्यात तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल. 20 जैतून वृक्षांची फळांसाठी झाडणी कराल तेव्हा डहाळ्यांमध्ये कुठे फळे राहिली आहेत का हे पुन्हा पुन्हा तपासू नका. उरलेली फळे अनाथ, परकीय, विधवा यांच्यासाठी राहू द्या. 21 द्राक्षमळ्यातून द्राक्षे खुडताना उरली सुरली द्राक्षेही त्यांच्यासाठीच राहू द्या. 22 तुम्हीही मिसरमध्ये गरीब गुलाम होता म्हणून मी तुम्हाला हे करायला सांगत आहे. त्याची आठवण ठेवा आणि गरिबांसाठी एवढे करा.